Uncategorized

‘वेट अँड वॉच,’ संजय राऊत यांचे ट्विट

मुंबई : शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी काल शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेऊन ईडी आणि पीएमसी बँक घोटाळ्यावर गौप्यस्फोट केला. त्यानंतर आज सकाळी ट्विट करत ‘वेट अँड वॉच, बाप बेटे जेलमध्ये जाणार!’ असं म्हटलं आहे. हे कुणाला उद्देशून म्हटलं आहे हे जरी स्पष्ट नसलं तरी या ट्विटचा रोख किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या यांच्याकडे असल्याचे बोलले जात आहे. संजय राऊत यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, वेट अँड वॉच! बाप बेटे जेलमध्ये जाणार! कोठडीचे सॅनिटायझेशन सुरू आहे. जय महाराष्ट्र!.

काल संजय राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर सडकून टीका केली. पंजाब अ‍ॅण्ड महाराष्ट्र बँक घोटाळ्यातील आरोपी वाधवान याच्यासोबत किरीट सोमय्या यांचा मुलगा निल किरीट सोमय्याची भागिदारी असल्याचा आरोप केला होता. पीएमसी बँक घोटाळ्याचा पैसा हा निल सोमय्यांच्या व्यवसायात वापरला असल्याचेही राऊत यांनी म्हटलं होतं.

संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या, मुंबई महापालिका नगरसेवक नील किरीट सोमय्या, भाजपचा माजी पदाधिकारी मोहित, अमोल काळे, पीएमसी बँक घोटाळ्यातील आरोपी राकेश वाधवान यांच्यासह जितेंद्र नवलानी, देवेंद्र लधानी यांची नावे घेतली होती.

संजय राऊत यांनी या पत्रकार परिषदेआधी भाजपचे साडेतीन नेते तुरुंगात धाडणार असल्याचे वक्तव्य केले होते. त्यामुळे राऊत कोणाची नावं घेणार याकडे अनेकांचे लक्ष होते. मात्र, राऊत यांनी ही नावे घेतली नव्हती. बुधवारपासून यातील प्रत्येक एका नेत्याचे नाव घेणार असून आगामी पत्रकार परिषदेत व्हिडिओही दाखवणार असल्याचे राऊत यांनी सांगितले होते. त्यामुळं आता संजय राऊत आणखी काय गौप्यस्फोट करणार याकडे लक्ष लागून आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button