Top Newsफोकस

अवकाळी पावसाचा जोर वाढला; पालघर, नाशिक, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांना ‘ऑरेंज अलर्ट’

मुंबई : आग्नेय अरबी समुद्र आणि लगतच्या लक्ष्यद्वीप बेट समूह ते उत्तर महाराष्ट्र किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे संपूर्ण कोकण , मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी जोरदार ते मध्यम स्वरुपाचा पाऊस सुरु आहे. आज दिवसभरात राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसंच उत्तर कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला आहे. आज कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात सर्व ठिकाणी पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. आजपासून राज्यात आणखी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. आज पालघर, नाशिक, धुळे आणि नंदुरबार या चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर जळगाव, औरंगाबाद, अहमदनगर, बीड, उस्मानाबाद, ठाणे, मुंबई, पुणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि सातारा या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे.

या पावसामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्याचवेळी थायलंड परिसरात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र बंगालच्या उपसागर आणि अंदमान समुद्रात आले असून त्याचे येत्या दोन दिवसात चक्रीवादळात रुपांतर होण्याची शक्यता आहे. ते चक्रीवादळ ४ डिसेंबर रोजी आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीलगत धडकण्याची शक्यता आहे.

पुढील दोन दिवस राज्यात मेघगर्जनेसह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याने येत्या तीन दिवसांसाठी कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा परिसरात बहुतांशी ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. हवामान खात्याने आज एकूण १७ जिल्ह्यांना हाय अलर्ट जारी केला आहे. यामध्ये पालघर, नाशिक, धुळे आणि नंदुरबार या चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. संबंधित जिल्ह्यात बहुतांशी ठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तर काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा अंदाजही हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

मुंबईसह कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भातल्या काही भागात चांगलाच पाऊस बरसतोय. मुंबई शहर आणि परिसरात रात्रभर पाऊस झालाय. ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, वसई-विरारला काल संध्याकाळपासून पावसानं चांगलंच झोडपून काढलंय. नवी मुंबईतील खारघर, बेलापूर, कळंबोली आणि पनवेल भागातही सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार सरी अधूनमधून हजेरी लावताहेत. काल संध्याकाळपासून अवकाळीनं मुंबईसह एमएमआरडीए भागात विश्रांती घेतलेली नाही.

उद्याही राज्यात पाऊस

३ डिसेंबर रोजी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, औरंगाबाद, बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भातही तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळं महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणावर होत आहे. मुंबई मध्ये पहाटे वेळी हळूहळू पाऊस अनेक ठिकाणी सुरु होता. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार दक्षिण पूर्व अरबी समुद्र आणि मालदीव लक्षद्वीपच्या परिसरात चक्रीवादळ मुळे पाऊस पडत आहे.

सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात रात्री ८ वाजल्यापासून मुसळधार

हवामान खात्याने दिलेल्या मुसळधार पावसाच्या अंदाजानुसार सातारा जिल्ह्यात आज दिवसभर ढगाळ वातावरण तसेच काही भागात तुरळक पावसाच्या सरी पहायला मिळाल्या मात्र जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये तीन तासापासून मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. या पावसामुळे ओढे नाले भरून वाहू लागले आहेत. पश्चिम भागातील महाबळेश्वर, वाई ,जावली, सातारा, पाटण, कराड याठिकाणीही मुसळधार पाऊस सुरू आहे या अवेळी पडत असलेल्या पावसामुळे स्ट्रॉबेरीसह गहू हरभरा ज्वारी या पिकांना फटका बसणार आहे.

ऐन हिवाळ्यात या अवकाळी पावसाचा ग्रामीण भागाला मोठा फटका बसलाय. उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, नंदुरबार जिल्ह्यात शेतपिकं, फळबागांचे अतोनात नुकसान झाले आहे. कांदा, द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याला या पावसानं धडकीच भरली. सातारा शहर आणि महाबळेश्वरमध्येही अवकाळी पावसानं हजेरी लावलीय. त्यामुळे स्ट्रॉबेरीचं पीक धोक्यात आलं. तिकडे कोकणातील रत्नागिरीतल्या चिपळूण, गुहागर, खेड, दापोलीतही सरी बरसल्यात. त्यामुळे आंबा पीक संकटात सापडलंय. राज्यात पुढील दोन ते तीन दिवस पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळं शेतकरी पुन्हा एकदा चिंतेत सापडलाय.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button