Top Newsराजकारण

‘एअर इंडिया’ची आज घरवापसी; टाटा समूहच ठरला तारणहार

नवी दिल्ली : जवळपास ६८ वर्षांनंतर तोट्यात चालणारी सरकारी विमान कंपनी एअर इंडिया पुन्हा टाटा समूहाच्या मालकीची होत आहे. भारत सरकारची विमान कंपनी असलेल्या एअर इंडियामध्ये आजपासून टाटा समूह आपली सेवा सुरू करणार आहे. एअर इंडियाचा मालकी हक्क टाटा समूहाकडे सोपवताच निर्गुंतवणुकीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. एअर इंडियाचे संचलन टाटा समूह करणार असून लवकरच इतर औपचारिक कागदपत्रांची प्रक्रिया पूर्ण होणार आहे.

केंद्र सरकारने तोट्यात असणाऱ्या एअर इंडियाच्या खासगीकरणाचा निर्णय घेतला होता. त्यानंतर एअर इंडियासाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात आली. केंद्र सरकारने निविदा प्रक्रियेनंतर ८ ऑक्टोबर २०२१ रोजी १८ हजार कोटी रुपयांमध्ये टाटा समूहाच्या ‘टॅलेस प्राइव्हेट लिमिटेड कंपनी’ला एअर इंडियाची विक्री करण्याचा निर्णय घेतला. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एअर इंडियाच्या हस्तांतरणाची प्रक्रिया पार पडली असून गुरुवारपासून टाटा समूह एअर इंडियामध्ये आपली सेवा सुरू करणार आहे.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, टाटा समूह गुरुवारपासून मुंबईहून उड्डाण घेणाऱ्या चार विमानांमध्ये जेवणाची सेवा पुरवणार आहे. या द्वारे टाटा समूह एअर इंडियामध्ये आपल्या सेवेची सुरुवात करणार आहे. मात्र, एअर इंडियाची उड्डाणे ही टाटा समुहाच्या नावाखाली होणार नाहीत.

टाटा समुहाकडून संचलित होणाऱ्या विमान सेवेची तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार असून कर्मचाऱ्यांना त्याबाबत कल्पना देण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. येत्या काही दिवसात टाटा समूह पूर्णपणे एअर इंडियाची विमान सेवा संचलित करण्याची शक्यता आहे. केंद्र सरकार आणि ‘टाटा’मधील करारानुसार टाटा समूहाला एअर इंडिया एक्सप्रेस आणि ग्राउंड हँडलिंग आर्म एअर इंडिया सॅट्समधील ५० टक्के भागभांडवलही सुपूर्द केले जाणार आहे. एअर इंडियाचा संपूर्ण ताबा आल्यानंतर टाटा समुहाकडे तीन एअरलाइन्स कंपन्या असणार आहेत. टाटा समुहाकडे विस्तारा आणि एअर एशिया या विमान कंपन्या आहेत.

टाटा सन्सने एअर इंडियासाठी १८,००० कोटी रुपयांची बोली जिंकली. विशेष म्हणजे रतन टाटांनीही त्यावेळी ट्विट करत यावर भाष्य केलं. टाटा समूहाच्या ताब्यात पुन्हा एकदा एअर इंडिया आली, ही एक चांगली बातमी आहे. आता एअर इंडियाला पुन्हा उभे करण्यासाठी प्रचंड मेहनत खर्ची करावी लागणार आहे. तसेच विमान उद्योगात टाटा समूहाला एअर इंडियाच्या माध्यमातून एक चांगली संधी मिळेल, अशी अपेक्षा असल्याचंही टाटांनी सांगितले होते.

एअर इंडियाची स्थापना १९३२ मध्ये टाटा एअर सर्व्हिसेस म्हणून झाली होती, ज्याचे नंतर टाटा एअरलाईन्स असे तिचे नामकरण करण्यात आले. भारतीय व्यावसायिक असलेल्या जेआरडी टाटा यांनी ही विमान सेवा सुरू केली होती. एप्रिल १९३२ मध्ये टाटाने इंपिरियल एअरवेजसाठी मेल घेऊन जाण्याचा करार जिंकला. यानंतर टाटा सन्सने दोन सिंगल इंजिन विमानांसह आपला हवाई वाहतूक विभाग तयार केला. १५ ऑक्टोबर १९३२ रोजी टाटाने कराचीहून मुंबईला हवाई मेल विमान उड्डाण केले. हे विमान मद्रासला गेले, ज्याचे पायलट रॉयल फोर्सचे माजी पायलट नेव्हिल व्हिन्सेंट यांनी केले, जे टाटाचे मित्रही होते. सुरुवातीला कंपनीने साप्ताहिक हवाई मेल सेवा चालवली, जी कराची आणि मद्रासदरम्यान आणि अहमदाबाद आणि मुंबई मार्गे चालवली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button