भारतात नवीन पालीच्या प्रजातीचा शोध
सातारा (जावेद खान) : नुकतेच राजगड किल्ल्यावरुन एका नवीन प्रजातीच्या पालीचा शोध लागला आहे. वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन अँड रिसर्च सोसायटी चे वन्यजीव संशोधक अमित सय्यद हे गेली 20 वर्षे वन्यजीव संशोधन तसेच वन्यजीव संवर्धनात कार्यरत असून, गेल्या 10 वर्षांपासून ते पालीच्या एका विशिष्ट कुळावर (निमॅस्पिस) अभ्यास करीत आहेत निमास्पिस’या कुळातील पालींना ‘ड्वार्फ गेको’ असे म्हणतात. त्यांच्या गोल आकाराच्या बुबुळांच्या वैशिष्ट्यामुळे या कुळातील पाली भारतात आढळणाऱ्या इतर पालींपासून सहज वेगळ्या ओळखून येतात.
भारतातील इतर पालीची बुबुळे उभी असतात. देशात सर्वसाधारणपणे आढळणाऱ्या पाली निशाचर आहेत. परंतु, ‘निमास्पिस’ कुळातील पाली मुख्यत्वे दिनचर तसेच निशाचर असल्याचे आढळून येते. त्यांना ‘डे गेको’ असेही संबोधले जाते. त्यांचे मुख्य खाद्य हे कीटक असून त्या नैसर्गिक अन्नसाखळीचा महत्वाचा भाग आहेत.याच अभ्यासाच्या अनुषंगाने ते संपूर्ण भारतातील विविध जंगलात संशोधन करीत आहेत . गेल्या वर्षी वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन अँड रिसर्च सोसायटी च्या संशोधन मोहिमेच्या माध्यमातून जैवविविधतेच्या दृष्टिकोणातून महाराष्ट्रातील विविध किल्ल्यांवर शोध मोहिम राबवण्यात आल्या.याच शोध मोहिमेतुन गेल्या वर्षी रांगणा किल्ल्यावरून एका पालीचा शोध लावण्यात आला या दरम्यान अनिष परदेशी हे गडकिल्ले प्रेमी असल्याने ते गडकिल्ले फिरत असताना त्यांना राजगडावर एक पाल आढळून आली. त्यानंतर त्यांनी त्या पालीचा फोटो काढून अमित सय्यद यांना पाठवले . त्यानंतर अमित सय्यद व टीम ने राजगडावर शोधमोहीम सुरू केली व आज राजगड किल्ल्यावरून या एका नवीन पालीचा शोध लावण्यात आला तसेच महाराष्ट्रातील गड किल्ले हे जैवविविधतेने संपन्न असल्याचेही अमित सय्यद यांनी सांगितले.
सदर शोधनिबंध ईवोलुशनरी सिस्टीमॅटिक्स या जर्मनी देशातील आंतरराष्ट्रीय संशोधन पत्रिकेत आज प्रकाशित झाला असून या नवीन प्रजातीच्या पालीला निमॅस्पिस राजगडांसिस असे नाव देण्यात आले , या पालीचे वैशिष्ट्य म्हणजे या पालीचे पोटखवल्यांना उंचवटे असून ही पाल लांबीला फक्त २७ mm असल्याने भारतातील सर्वात लहान पाल म्हणूनही हिची नोंद झाली आहे. महाराष्ट्र हे गडकिल्ल्यांचे राज्य म्हणून ओळखले जाते. आणि प्रत्येक किल्ला हा डोंगर रांगा तसेच जंगलांनी वेढलेला आहे. किल्ले व किल्ल्यांच्या आसपास चा परिसर जैवविविधतेने संपन्न असल्याचे या संशोधनातुन सिद्ध झाले आहे. किल्ल्यावरून अजूनही प्राण्यांच्या नवीन प्रजातीचा शोध लागत असल्याने, सर्व किल्ल्यांचे व किल्ल्यांच्या आसपासच्या परिसराचे संरक्षण व संवर्धन होणे गरजेचे आहे . शासनाने गडकिल्ल्यांचे अस्तित्व राखण्याच्या दृष्टिकोणातून प्रयत्न केलेच पाहिजेत असेही अमित सय्यद यांनी सांगितले आहे .
या शोध मोहिमेत पालीचा सखोल शास्त्रीय अभ्यास हा अमित सय्यद यांनी पहिला असून , जनुकीय अभ्यास हा शौरी शूलाखे यांनी पहिला आहे ते इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरल हिस्टरी एज्युकेशन अँड रिसर्च या पुण्याच्या संस्थेचे सह संस्थापक आहेत, विवेक फिलिप हे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स चे PhD स्टुडंट असून अनिश परदेशी, अभिजित नाळे, किरण अहिरे, महेश बंडगर, ऋषिकेश आवळे, विकास जगताप अयान सय्यद व मासूम सय्यद हे WLPRS चे सदस्य असून या संशोधनाचे वाटेकरी आहेत.