आता कोणत्याही एजन्सीकडून गॅस सिलिंडर घेणे शक्य

नवी दिल्लीः आतापर्यंत ग्राहक संबंधित गॅस एजन्सीवर एलपीजी सिलिंडर घेण्यास आणि ते पुन्हा भरून देण्यासाठी अवलंबून होते, परंतु लवकरच सरकार या नियमात मोठे बदल करू शकते. त्याअंतर्गत ग्राहक येत्या काही दिवसांत कोणत्याही एजन्सीकडून एलपीजी सिलिंडर घेऊ शकणार आहे किंवा त्या एजन्सीकडून ते सिलिंडर पुन्हा भरू शकतात. त्यासाठी सरकार आणि तेल कंपन्या एकत्रित प्लॅटफॉर्म तयार करण्याचे काम करीत आहेत.
एलपीजी गॅस बुकिंग आणि रिफिलची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी सरकार नियम बदलण्याचा विचार करीत आहे. याद्वारे ग्राहकांना बुकिंगनंतर रिफीलसाठी तासांची प्रतीक्षा करावी लागणार नाही. या व्यतिरिक्त सर्व काही सहजशक्य होणार आहे. सरकारला स्वच्छ ऊर्जेला प्रोत्साहन द्यायचे आहे, यासाठी देशातील १०० टक्के घरात एलपीजी सिलिंडर वितरीत करण्याचं उद्दिष्ट आहे. म्हणूनच सरकार देशातील तीन मोठ्या तेल कंपन्या इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम (बीपीसीएल) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम (एचपीसीएल) यांच्याशी चर्चा करीत आहे. या तिन्ही कंपन्या लवकरच एकत्र एक विशेष व्यासपीठ तयार करतील.
सध्या गॅस ग्राहकाने ज्या कंपनीकडून वा गॅस एजन्सीकडून कनेक्शन घेतले आहे, केवळ त्याच कंपनीचे सिलिंडर घेऊ शकत आहेत. परंतु नवीन नियमानुसार, ग्राहक कोणत्याही कंपनीचे सिलिंडर मिळवू शकतात किंवा ते पुन्हा भरू शकतात. याद्वारे लोक जवळच्या गॅस एजन्सीकडून त्यांचे बुकिंग करून घेऊ शकतात.
इतर शहर किंवा परिसरात राहणाऱ्यांना गॅस सिलिंडर मिळण्यास स्थलांतर करणार्यांना अडचणी येत नाही, अशा परिस्थितीत ५ किलो शॉर्ट-सिलिंडरचा पर्याय सादर केला गेलाय. हे गॅस कनेक्शन पत्त्याच्या पुराव्यांशिवाय घेतले जाऊ शकते. ग्राहकाला फक्त त्यांचा आयडी प्रूफ दाखवणे आवश्यक आहे. ते देशातील कोणत्याही ठिकाणी विक्री किंवा वितरणाच्या ठिकाणी सिलिंडर पुन्हा भरू शकतात.




