
मुंबई: मुंबईत सकाळपासून पडत असणाऱ्या मुसळधार पावसामुळे मध्य आणि हार्बर रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. राज्यातील लॉकडाऊनचे निर्बंध शिथील झाल्यानंतर लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली होती. मात्र, आज पहिल्याच पावसात कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांना मध्य रेल्वे ठप्प झाल्याने गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे.
मुंबई शहर आणि उपनगरात मध्यरात्रीपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. अनेक सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. ठाणे, कल्याण, डोंबिवली, वसई आणि पालघरमध्ये देखील मुसळधार पाऊस पडत आहे. मुसळधार पावसाच्या फटका हा रस्ते वाहतुकीला बसला आहे. सखल भागांमध्ये पाणी साचल्यानं रस्ते वाहतुकीचा वेगदेखील मंदावला आहे.
Mumbai Local train services b/w Kurla & CSMT halted as water is flowing over tracks b/w Kurla & Sion stations. Traffic stopped at 9.50 am, decision taken as a precautionary measure to avoid any untoward incident. Traffic will resume as soon as water recedes: Central railway CPRO
— ANI (@ANI) June 9, 2021
मध्य रेल्वेने ट्विट करुन यासंदर्भात माहिती दिली आहे. सकाळपासून पाऊस पडत असल्याने कुर्ला आणि सीएसएमटी या रेल्वे स्थानकांदरम्यानच्या रेल्वे ट्रॅकवर पाणी साचले आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून ९ वाजून ५० मिनिटांनी अप मार्गावरील रेल्वेसेवा थांबवण्यात आली. ट्रॅकवरील पाणी ओसरल्यानंतर ही रेल्वे सेवा पुन्हा सुरु करण्यात येईल, असे मध्य रेल्वेच्या जनसंपर्क कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.
Maharashtra: Railway tracks submerged between Sion railway station & GTB Nagar railway station due to heavy rainfall in Mumbai.
Mumbai Local train services b/w Kurla & CSMT have been halted, as a precautionary measure; services to resume as soon as the water recedes.#Monsoon pic.twitter.com/YUaETnmv7z
— ANI (@ANI) June 9, 2021
हवामान खात्याच्या अंदाजाप्रमाणे मुंबई आणि उपनगर परिसरात बुधवारी सकाळपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. गेल्या दोन ते तीन तासांपासून पाऊस सुरु आहे. त्यामुळे मुंबईतील सखल भागांमध्ये नेहमीच्या प्रथेप्रमाणे पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. कामावर जाण्यासाठी निघालेल्या लोकांची या पाण्यातून वाट काढताना त्रेधातिरपीट उडताना दिसत आहे.
सायन, किंग्ज सर्कल, हिंदमाता याठिकाणी मोठ्याप्रमाणावर पाणी साचले आहे. त्यामुळे वाहनांना पाण्यातून वाट काढणे अवघड झाले आहे. परिणामी या भागात वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. थोड्याचवेळात समुद्रालाही मोठी भरती येणार आहे. या काळात पाऊस असाच सुरु राहिल्यास या भागांमध्ये आणखी पाणी तुंबण्याची शक्यता आहे.
पुढील ४ दिवस धुवाँधार पावसाचा अंदाज
हवामान विभागाकडून मुंबईसह कोकणातील सर्व जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. पुढील ४ दिवस हे मुंबईसाठी धोक्याचे असणार आहे. या काळात ३०० मिलिमीटहून जास्त पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
यंदाही हिंदमाता पाण्याखाली
दरवर्षी पावसाळ्यात मुंबईतल्या हिंदमाता परिसरात जलकोंडी पाहायला मिळते. दरवेळी तिथे पूरपरिस्थिती निर्माण होत असून गुडघ्याभर पाणी साचतं. मात्र आता मुंबई महानगरपालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे हाती घेतलाय, पण प्रकल्पच पाण्याखाली गेलाय. पालिकेने हा प्रकल्प उशिरा सुरू केल्याने यंदा सुद्धा पहिल्या पावसात हिंदमाताकडे पाणी साचलं आहे. त्यामुळे बेस्ट बसेसच्या वाहतुकीचा मार्ग बदलण्यात आला आहे.
हिंदमाता परिसरात पावसाळ्यात साचणाऱ्या पाण्यासाठी उपाय म्हणून प्रमोद महाजन उद्यान, हिंदमाता फ्लायओव्हर, सेंट झेव्हियर्स ग्राऊंड इथं बांधण्यात येत आहेत. हिंदमाता परिसर खोल असल्यामुळे पावसाळ्यात त्याठिकाणी पाणी साचते. मुसळधार पाऊस झाल्यास या परिसरात पाणी मोठ्या प्रमाणात साचते व त्याचा लवकर निचरा होत नाही. अशा वेळी या पाण्याचा निचरा करण्यासाठी महापालिकेमार्फत या भूमिगत टाक्या बांधण्यात येत आहेत.
या मोठ्या भूमिगत टाक्या पावसाळ्यामध्ये कमीतकमी तीन तास पावसाचे अतिरिक्त पाणी साठवून ठेवण्यास मदत करतील. जोरदार पर्जन्यवृष्टी तसेच हायटाइडच्या कालावधीमध्ये याचा विशेष उपयोग होईल.पर्जन्यवृष्टी कमी झालं की आणि ओहटी आली की या टाकीतील पाणी पर्जन्यजलवाहिनी मार्फत समुद्रात सोडलं जाईल. त्यामुळे या ठिकाणी साचणाऱ्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होईल.
ठाण्यात जनजीवन विस्कळीत
ठाणे शहरात रात्रीपासून मुसळधार पावसाला सुरुवात. सकाळीही पावसाचा जोर कायम असून जनजीवन विस्कळीत झाले होते. अनलॉकमुळे दुकान सुरू झाली असली तरी आज तिसऱ्या दिवशी पावसामुळे या दुकानांकडे ग्राहकांनी पाठ फिरवल्याचे दिसून आले. सकाळी ८ वाजेपर्यंत २२.६१ मिमी पावसाची नोंद झाली आहे.




