इतर

‘एनआयए’ने जप्त केलेल्या मर्सिडीज कारचे धुळे कनेक्शन!

मुंबई : मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ आणि मनसुख हिरेन प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात ‘एनआयए’ने जप्त केलेली मर्सिडीजबद्दल एक महत्वाची माहिती समोर आली आहे. ‘एनआयए’ने जप्त केलेली ही मर्सिडीज कार मूळची धुळ्यातील असल्याची माहिती मिळतेय. तशी माहिती मर्सिडीज कारचे जुने मालक आणि धुळे आरटीओने दिली आहे. त्यामुळे आता या प्रकरणात धुळे कनेक्शन समोर येत आहे.

मनसुख हिरेन यांनी ज्या मर्सिडीज गाडीमध्ये शेवटचा प्रवास केला आणि सचिन वाझे जी कार वापरत होते असं सांगितलं जात आहे, ती मर्सिडीज कार ही मूळ धुळ्यातील असल्याचं आता समोर आलं आहे. ही गाडी सारांश भावसार यांची होती. त्यांनी ही कार काही दिवसांपूर्वीच विकली असल्याचा दावा केला आहे. “ही गाडी माझी होती. फेब्रुवारी महिन्यात ही गाडी मी विकली आहे. त्याबाबतचे सगळे कागदपत्र माझ्याकडे आहेत आणि तपास अधिकाऱ्यांकडून विचारणा झाल्यास त्यांना सहकार्य करेन. मी cars24 ला ही गाडी विकली आहे. ज्याच्याशी माझा व्यवहार झाला त्याची सगळी कागदपत्र माझ्याकडे आहेत. एवढ्या मोठ्या प्रकरणाशी माझा काही संबंध नाही”, असं सारांश भावसार यांनी म्हटलंय.

सचिन वाझे प्रकरणात रोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सचिन वाझे प्रकरणात इनोव्हा कारची माहिती मिळाल्यानंतर एनआयए एका मर्सिडिज कारच्या शोधात होती. त्यानंतर संबंधित मर्सिडीज आज एनआयएकडून जप्त करण्यात आली. या कारच्या डिक्कीची पाहणी सुरु आहे. या डिक्कीत काही कपडे आणि अन्य काही वस्तू सापडल्याचं प्रथमदर्शनी पाहायला मिळत आहे. महत्वाची बाब म्हणजे या तपासणीदरम्यान व्हिडीओ रेकॉर्डिंगही केलं जात आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात या मर्सिडिज कारची भूमिका स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ इतकीच महत्वाची असल्याचं बोललं जात आहे.

‘एनआयए’च्या हाती महत्वाचं सीसीटीव्ही फुटेज
‘एनआयए’च्या हाती एका मर्सिडिज कारचं सीसीटीव्ही फुटेज हाती लागलं होतं. हे सीसीटीव्ही फुटेज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जवळचं असल्याचं सांगण्यात येत आहे. याच मर्सिडिजमध्येच मनसुख हिरेन यांनी शेवटचा प्रवास केला होता. ‘एनआयए’ला मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये मनसुख हिरेन कुणाची तरी वाट पाहत होते असं दिसतंय. काही वेळाने त्यांच्याजवळ ही मर्सिडिज कार येते. हिरेन त्या गाडीत बसून निघून जात असल्याचं त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये पाहायला मिळत आहे. ‘एनआयए’च्या हाती लागलेलं हे सीसीटीव्ही फुटेज मनसुख हिरेन बेपत्ता होण्याच्या काळातलं असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button