Top Newsइतर

मुंबई, कोकणासह विदर्भ, मराठवाड्यात पावसाची तुफान बॅटींग; पुढील आठवडाभर ‘अतिमुसळधार’ !

मुंबई : रात्रीपासूनच मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांत जोरदार पाऊस कोसळत आहे. मुंबई, ठाण्यात आज रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. तर पुढील तीन दिवस ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. आज झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईची तुंबई झाल्याचं पहायला मिळालं. त्याच दरम्यान आता राज्यातील काही भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

हवामान खात्याचे हवामानतज्ज्ञ के. एस. होसळीकर यांनी ट्विट करुन आगामी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. होसळीकर यांनी म्हटलं, ११ जून रोजी बंगालच्या खाडीत कमी दाबाच्या पट्ट्यामुळे त्याचा परिणाम कोकण किनारपट्टीच्या भागात पहायला मिळेल. यामुळे ९ जून रोजी आणि १२ ते १५ जून रोजी कोकणातील काही भागांत मुसळधार ते अतिमुसळदार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

मुंबई, ठाणे, रायगड परिसरात रात्रीपासूनच मुसळधार पाऊस पडत आहे. याच दरम्यान हवामान विभागाने मुंबई-ठाण्यात पुढील तीन ते चार दिवस मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. तसेच मुंबई आणि ठाण्याला रेड अलर्टही जारी करण्यात आला आहे. तर त्यानंतरचे पुढील तीन दिवस मुंबई-ठाण्यासाठी ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात ९ जून ते १३ जून या कालावधीत मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. भारतीय हवामान खात्यातर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार, या सर्व कालावधीत रत्नागिरीसह लगतच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या कालावधीत सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता असून सोबतच मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

मुंबई, कोकणासह विदर्भ, मराठवाड्यात पावसाची तुफान बॅटींग

मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पुण्यात पुढील दोन ते तीन तासात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातही पावसाला सुरुवात झाली आहे. विदर्भातील यवतमाळ, वाशिम, बुलढाण्यात विजांच्या गडगडाटासह काही ठिकाणी जोरदार पाऊस सुरु आहे. मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, लातूर, बीड, परभणीतही मध्यम स्वरुपाचा पाऊस कोसळत आहे.

मुंबईमध्ये सकाळपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे चुनाभट्टी रेल्वे स्थानकात मोठ्या प्रमाणात पाणी भरलं आहे. यामुळे मुंबईची जीवनवाहिनी हार्बर लोकल ठप्प झाली आहे. पुढील काही तास असाच पाऊस सुरु राहिला तर जे मुंबईकर अत्यावश्यक सेवा देण्यासाठी बाहेर पडले होतं आणि ते लोकलचा वापर करत होते त्यांना मात्र घराकडे परतताना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागणार आहे. चुनाभट्टी रेल्वे स्थानकात लोकलच्या रांगा लागलेल्या आहेत.

ठाणे महापालिकेसमोर गुडघाभर पाणी

ठाण्यातील सखल भागांमध्ये मुसळधार पावसामुळे पाणी साचण्यास सुरूवात झाली आहे. गेले एक ते दोन तास सलग पाऊस पडल्याने ठाणे महापालिकेच्या मुख्यालयासमोरच गुडघ्यापर्यंत पाणी साचलेले बघायला मिळत आहे. याच पाण्यातून वाट काढत रहिवाशांना आणि वाहनचालकांना जावे लागत आहेत. पाऊस असाच सुरू राहिला तर परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे.

ठाण्यात थोडादेखील पाऊस पडला तरी हमखास ज्या ठिकाणी पाणी साचते ठिकाण म्हणजे वंदना सिनेमा रोड. या रोडवर आज देखील सकाळपासून झालेल्या पावसामुळे प्रचंड पाणी साचले आहे. त्यामुळे हा संपूर्ण रोड वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. इथे पाणी साचल्याने आसपासच्या सोसायटीमध्ये राहणारे रहिवासी आणि घरात अडकून पडले आहेत. एसटी स्टँडमधील बसेस बाहेर पडू शकत नाहीत. तसेच जे नागरिक काही कामासाठी या भागातून जात आहेत त्यांना यापेक्षा जास्त पाण्यातून वाट काढत जावे लागत आहे.

भिवंडीत उड्डाणपुलावर पाणी

भिवंडी शहरात सकाळपासून मुसळधार पाऊस कोसळत असल्याने राजीव गांधी उड्डाणपुलावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. या उड्डाणपुलावर कोणत्याही प्रकारची साफसफाई न केल्यामुळे या उड्डाणपुलावर पाणी साचलं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा उड्डाणपूल धोकादायक असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे मागील तीन वर्षांपासून हा उड्डाणपूल जड वाहनांसाठी बंद करण्यात आला आहे. दुसरीकडे शहरातील कल्याण नाका तीन पत्ती भाजी मार्केट कोंबळपाडा इत्यादी परिसरात पाणी साचलं आहे. ते कल्याण नाका परिसरात रस्त्यावर तलावाचे स्वरुप निर्माण झालं. मुख्य रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतूक कोंडी झाली आहे. भिवंडी महानगरपालिकाने केलेली नालेसफाई अक्षरशः फोल ठरली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किनारपट्टी भागात मुसळधार पाऊस सुरू असून जिल्ह्यातील इतर भागात मात्र ढगाळ वातावरण आहे. जिल्ह्यातील देवगड, वैभववाडी, कणकवली, मालवण तालुक्यात मुसळधार पाऊस पडत असून जिल्ह्यात इतरत्र मात्र ढगाळ वातावरण आहे. गेल्या २४ तासात कणकवली तालुक्यात सर्वाधिक १०५ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तर १ जूनपासून आतापर्यंत एकूण सरासरी १२७.४७५ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. पावसामुळे मात्र बळीराजा सुखावला आहे.

रत्नागिरीत सर्वदूर पाऊस

कोकणात ५ जून रोजी मान्सून दाखल झाला असला तरी मध्यंतरीचे ४ दिवस मात्र कोकणात पावसानं दडी मारली होती. पण, मंगळवार अर्थात काल संध्याकाळपासून जिल्ह्यात सध्या सर्वदूर पावसानं हजेरी लावली आहे. जिल्ह्यातील सर्वच भागात सध्या पावसाची रिपरिप सुरू आहे. जिल्ह्याचा विचार करता काही भागांमध्ये पावसाच्या मुसळधार सरी देखील कोसळत आहे. सद्यस्थितीत पाऊस सरींवर असून मध्यम आणि हलक्या प्रमाणात पावसाच्या सरी बरसत आहेत. हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार पुढील 4 दिवस जिल्ह्याकरता महत्त्वाचे असून हवामानात होणाऱ्या बदलांवर सध्या सारं काही अवलंबून आहे. पण, जिल्हा प्रशासन मात्र सतर्क झालं आहे. सध्या कोसळत असलेला पाऊस हा शेतीयोग्य असल्यानं शेतीच्या कामांना देखील वेग आला आहे.

पालघर जिल्ह्यात दमदार हजेरी

पालघर जिल्ह्यात मध्यरात्रीपासूनच मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली असून अजूनही पावसाची हजेरी कायम आहे. जिल्ह्यात मध्यरात्रीपासून जोरदार पाऊस सुरू असून अनेक सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे तर ग्रामीण भागातील नदी नाले ओसंडून वाहताना दिसत आहेत. ९ तारखेपासून ते १२ तारखेपर्यंत अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. पालघर जिल्ह्यातील धरण क्षेत्र आणि नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा जिल्हा प्रशासनाकडून घेण्यात आला आहे.

परभणीत जोरदार पाऊस

यंदा परभणी जिल्ह्यात मृग नक्षत्राला पावसाने हुलकावणी दिली. मात्र, मृग नक्षत्राच्या दुसऱ्या दिवशी जिल्ह्यात जोरदार पाऊस बरसलाय. मध्यरात्री २ वाजल्यापासून परभणीसह जिल्हाभरात जोरदार पाऊस झालाय. पहाटेपासून पावसाचा जोर कमी होत सर्वत्र रिपरिप सुरुय. यामुळे पाहिल्याचं पावसात अनेक छोट-मोठे नाले वाहत आहेत. अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचायलाही सुरवात झालीय. त्यामुळे आज अधिकृत पावसाळा सुरू झाल्याचा फिल परभणीकरांना येतोय.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button