Top Newsइतर

नाशिकमध्ये उच्चशिक्षित पिता-पुत्राची निर्घृण हत्या; मृतदेह पेटवून दरीत टाकले !

संपत्ती बळकावण्यासाठी तरुणाचे कृत्य

नाशिक : नाशिकमध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे सेवानिवृत्त कुलसचिव नानासाहेब कापडणीस (वय ७०) आणि त्यांचा मुलगा डॉ. अमित कापडणीस (३५) यांची अतिशय निर्घृणपणे हत्या झाल्याचे समोर आले आहे. या घटनेने शहर पुन्हा हादरले आहे. या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी राहुल गौतम जगताप (वय ३६) याला अटक केली आहे.

नाशिकमध्ये कापडणीस यांची प्रचंड संपत्ती आहे. पंडित कॉलनीमध्ये चार फ्लॅट, सावरकरनगरमध्ये दोन मोठे बंगले, ९७ लाखांचे शेअर्स ट्रेडिंग, ५० लाखांची मुदतपूर्ण ठेव, देवळाली कॅम्पमध्ये टोलेजंग रो-हाऊस, नानावलीत १४ लाखांचा गाळा आहे. इतरही त्यांची अमाप संपत्ती आहे. शिवाय कापडणीस पिता-पुत्र दोघेच राहायचे. हे पाहून त्याने नियोजनपद्ध पद्धतीने त्यांचा खून करून संपत्ती हडपण्याचा डाव राहुल जगतपाने रचला. हत्याकांडानंतर राहुल जगतपाने त्यांच्या खात्यावरील मोठी रक्कम आरटीजीएसद्वारे आपल्या खात्यावर वर्ग केली. कापडणीस यांच्या खात्यातून शेअर्स विकस पैसा काढला. हे सारे रेकॉर्डवर होते. या आधारे पोलिसांनी राहुल जगतापला बेड्या ठोकल्या. राहुलने पिता-पुत्राची हत्या करून त्यांचे मृतदेह वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये पेटवून दिल्याचे समोर आले आहे. महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा वाजे यांचा खूनही काही दिवसांपू्र्वी अशाच प्रकारे झालाचे समोर आलेय. त्यांचे पती संदीपने त्यांचा अगोदर खून करून त्यांना जाळल्याचा पोलिसांना संशय आहे. आता त्याहूनही थरारक हत्याकांड उघड झाल्याने समृद्ध नाशिकची क्राईम सिटी म्हणून ओळख होते काय, असा प्रश्न शहर वासियांना पडला आहे.

नाशिक येथील शरणापूर रोडवरील आनंदी गोपाळ पार्कमध्ये माजी कुलसचिव नानासाहेब कापडणीस आणि त्यांचे पुत्र अमित कापडणीस रहायचे. अमित यांनी एम.बी.बी.एस.चे शिक्षण पूर्ण केलेय. मात्र, ते प्रॅक्टीस करायचे नाहीत. अमित यांच्यासोबत आनंदी गोपाळ पार्कमधील हॉटेल व्यावसायिक राहुल जगतापने मैत्री केली. त्यानंतर अमितला व्यसनाधीन केले. तर डिसेंबरमध्ये नानासाहेब कापडणीस यांना गुंगीचे औषध देऊन शहराबाहेर नेले. पालघर जिल्ह्यातील मोखाडा घाटात त्यांचा गळा आवळून खून केला. मृतदेह दरीत फेकून दिला. तर अमितला भंडारदरा येथे फिरण्यासाठी जाण्याच्या बहाण्याने शहराबाहेर नेत त्याचाही खून केला. त्याचा मृतदेह वाकी घाटात जाळून फेकून दिला.हे दोन्ही मृतदेह संबंधित भागातील पोलिसांना सापडले. मात्र, त्या दरम्यान जवळच्या पोलीस ठाण्यात कुठेही बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली नव्हती. त्यामुळे तपास रखडला.

कापडणीस यांच्या पत्नी आणि मुलगी या मुंबईत राहतात. त्यांची मुलगी शीतलने कापडणीस यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचा मोबाइल राहुल जगतापकडे आढळला. त्या वडील आणि भावाला भेटायला नाशिकमध्ये आल्या. मात्र, तुमच्या घराचे काम सुरू आहे. त्यामुळे कापडणीस दुसऱ्या फ्लॅटमध्ये रहायला गेल्याची थाप राहुलने मारली. त्यामुळे मुलगी शीतल पुन्हा मुंबईला गेली. त्यानंतरही वडिलांशी संपर्क झाला नाही. त्यामुळे त्या नाशिकला आल्या. त्यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांना राहुलवरच संशय आला. त्यांनी तपास केला असता खुनाला वाचा फुटली.

खुनानंतर आनंदोत्सव

हॉटेल व्यावसायिक राहुलने पिता-पुत्राचा थंड डोक्याने मर्डर केल्यानंतर त्याचा आनंदोत्सव साजरा केला. आपले मित्र आणि हॉटेलमधील २२ सहकाऱ्यांना रत्नागिरीला नेत तिथे थर्टी फर्स्टची जोरदार पार्टी केली. कोकणच्या पर्यटनाचा आनंद लुटला. चार दिवस मौजमजा करून ते पुन्हा नाशिकला परतले. कापडणीस यांच्या कुटुंबापैकी दुसरे कोणीही नाशिकमध्ये नाही. त्यामुळे कापडणीस पिता-पुत्र कुठे गेले आहेत, हे कोणीही विचारले नाही. त्याने त्यांच्या मुलीलाही खोटे सांगून मुंबईला धाडले होते. त्यामुळे आता सारे काही निस्तारले आहे, अशा आविर्भावात राहुल रहात होता. मात्र, पोलिसांनी त्याला अखेर बेड्या ठोकल्याच !

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button