
अबूधाबी : कोलकाता नाइट रायडर्सनं आज रॉयल चॅलेंजर्स बंगोलरचा ९ विकेट्सनं धुव्वा उडवला आहे. आरसीबीनं दिलेलं ९२ धावांचं आव्हान केकेआरनं १ विकेट गमावून सामन्याच्या १० व्याच षटकात गाठलं. शुभमन गिल ४८ धावांवर बाद झाला. पण तोवर आरसीबीनं सामना हातातून गमावला होता. आयपीएलमध्ये पदार्पण करणाऱ्या व्यंकटेश अय्यर यानं २१ चेंडूत नाबाद ४१ धावांची खेळी साकारुन विजयावर शिक्कामोर्तब केलं.
आरसीबीला ९२ धावांत गुंडाळल्यानंतर केकेआरनं फलंदाजीतही कमालीची कामगिरी उंचावली आणि आरसीबीच्या गोलंदाजांची अक्षरश: पिसं काढली. शुभमन गिल आणि व्यंकटेश अय्यर यांनी सलामीसाठी ८२ धावांची भागीदारी रचली. केकेआरनं सामना जिंकून २ गुणांची कमाई करत आता ६ गुणांसह गुणतालिकेत पाचवं स्थान गाठलं आहे.
अबूधाबीच्या मैदानात कोलकाता नाइट रायडर्सच्या गोलंदाजांच्या चक्रव्यूहासमोर रॉयल चॅलेंजर्स बंगलोरच्या दिग्गज फलंदाजांनी नांगी टाकली. कोहली ब्रिगेडला ९२ धावांत रोखण्यात केकेआरला यश आलं. केकेआरकडून फिरकीपटू वरुण चक्रवर्ती आणि अष्टपैलू आंद्रे रसेल यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले. तर लॉकी फर्ग्युसननं दोन जणांना माघारी धाडलं. वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा यानं कर्णधार कोहलीची महत्त्वपूर्ण विकेट मिळवली.
सामन्याची नाणेफेक जिंकून कोहलीनं फलंदाजीचा निर्णय घेतला. पण केकेआरच्या गोलंदाजांनी सामन्यात सुरुवातीपासूनच आरसीबीच्या फलंदाजांना जखडून ठेवलं. प्रसिद्ध कृष्णानं सामन्याच्या दुसऱ्याच षटकात कोहलीला (५) पायचीत करत आरसीबीला मोठा धक्का दिला. त्यानंतर पडीक्कल आणि पदार्पणवीर भरत यानं सावध फलंदाजी करत संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. देवदत्त पडिक्कल याला लॉकी फर्ग्युसन यानं तंबूत धाडलं. त्यानंतर भरत देखील सामन्याच्या ९ व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर माघारी परतला. त्याच षटकात चौथ्या चेंडूवर एबीडीव्हिलियर्सला फर्ग्युसननं माघारी धाडलं.
कोलकाता नाइट रायडर्सच्या गोलंदाजांच्या चक्रव्यूहासमोर रॉयल चॅलेंजर्स बंगलोरच्या दिग्गज फलंदाजांनी नांगी टाकली आहे. कोहली ब्रिगेडला ९२ धावांत रोखण्यात केकेआरला यश आलं आहे. केकेआरकडून फिरकीपटू वरुण चक्रवर्ती आणि अष्टपैलू आंद्रे रसेल यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले. तर लॉकी फर्ग्युसननं दोन जणांना माघारी धाडलं. वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा यानं कर्णधार कोहलीची महत्त्वपूर्ण विकेट मिळवली.
सामन्याच्या १२ व्या षटकात वरुण चक्रवर्तीनं आरसीबीला आणखी बॅकफूटवर नेलं. षटकाच्या चौथ्या चेंडूवर ग्लेन मॅक्सवेलला बाद केलं आणि आरसीबीची बाद ६३ धावा अशी केविलवाणी अवस्था झाली. पुढच्याच चेंडूवर हसरंगा खातंही न उघडता माघारी परतला. वरुण चक्रवर्तीनं पुढच्याच षटकात आरसीबीला आणखी एक धक्का दिला. सचिन बेबीला बाद करत आरसीबीला ७ बाद ६६ अशी धावसंख्येवर रोखून धरलं. त्यानंतर ठराविक अंतरानं आरसीबीचे खेळाडू बाद होत राहिले आणि २० षटकांच्या अखेरीस टीम कोहलीला केवळ ९२ धावा करता आल्या.