मुक्तपीठ

दिलखुश खुशवंत!

- भारतकुमार राऊत

सव्यासाची, निर्भिड पण सदैव हसतमुख पत्रकार खुशवंत सिंहांनी आपल्या आयुष्याचा लेख पुरा केला, त्या घटनेला सात वर्षे झाली. या खऱ्याखुऱ्या ‘खुशवंत’ पत्रकाराच्या शेकडो आठवणींचा आज जणु सडाच पडला. त्यांच्या काही आठवणी माझ्या ‘स्मरण’ या स्मृतीचित्र संग्रहात वेचून ठेवल्या आहेत.

 

वर्तमानपत्राच्या छोट्याशा पण कमालीच्या प्रतिष्ठेच्या आणि परिणामकारक दुनियेत काम करताना या क्षेत्रातल्या अनेक धुरिणांशी संबंध आलाच. त्यापैकी अनेकांशी असलेला संपर्क काळाच्या ओघात नाहिसा झाला. त्यांची छापही हळुहळू धूसर होत गेली. पण काहींनी मात्र थेट मनातच घर केलं, तेही इतकं मजबूत की त्यांच्याशी भेटणं, बोलणं परिस्थितीनुसार थांबल्यानंतरही ही मंडळी मनातल्या घरात कायमचीच वस्तीला राहिली. मग कधी कुठल्या तरी प्रसंगाच्या निमित्ताने त्यांची अवचित आठवण येते. त्यांच्या स्मृती मनाच्या आतल्या खोलीतून नकळत बाहेर येतात आणि डोळ्याच्या कडा ओलावून जातात. ही माणसं कधी भेटलीच नसती तर ?… बापरे! किती क्रूर हा विचार! ही माणसे आयुष्यात आलीच नसती, तर जीवन रोजच्या प्रमाणे राहिलेच असते, पण जगणे मात्र खूप वेगळे बेचव झालेले असते. पंचपक्वांनांच्या स्वयंपाकात चिमूटभर मीठ टाकले नाही तर? तसेच काहीसे या आयुष्याचे झाले असते.

पत्रकारितेच्या आयुष्यात ही माणसे अशी पत्रकार म्हणूनच भेटली आणि आठवणींच्या अल्बममध्ये कायमची चिकटून राहिली, त्यापैकीच एक – खुशवंत सिंह! …एक अस्सल दिलखुश अवलिया!

खुशवंत सिंह टाइम्स ऑफ इंडिया समुहाच्या `द इलस्ट्रेटेड विकली ऑफ इंडिया’ या अफलातून वृत्त-साप्ताहिकाचे संपादक होते, तेव्हाची गोष्ट. त्या काळात खुशवंत सिंह या नावाच्या भोवती उत्सुकता, आदर आणि भीती यांची अनेक वर्तुळे होती. साहजिकच टाइम्स समुहात काम करणाऱ्या पत्रकारांना त्यांना भेटावेसे वाटे. पण ते सहज शक्य नव्हते, कारण ते कमालीचे मनस्वी आणि काहीसे एकलकोंडेही होते. आपण बरे आणि आपले काम बरे, हा त्यांचा पिंड. ठिपक्याठिपक्यांचा किंवा चौकडीचा अर्ध्या बाह्यांचा बुश शर्ट, कधी लाल, हिरव्या, निळ्या अशा भडक रंगाचा टी-शर्ट, गडद रंगाची पँट, पायात सँडल्स, जाड मनगटावर तसेच जाड कडे, डोळ्याला जाड भिंगांचा चष्मा, डोक्यावरच्या केसांना सामावून घेणारा फेटा-कम-मुंडासे, हातात सदैव पुस्तके व मासिकांचा गठ्ठा आणि पाय घासत चालण्याची जगावेगळी लकब. त्यामुळे शे-दोनशे माणसांच्या गर्दीतही खुशवंत सिंह उठून दिसत.

…अखेर एकदा काही तरी कामाच्या निमित्ताने खुशवंत सिंहांच्या केबिनमध्ये जाण्याचा योग आलाच. इतका मोठा संपादक. त्याला कसे भेटायचे, काय बोलायचे, अशा शेकडो शंकांची भली मोठी प्रश्नचिन्हे चेहऱ्यावर बाळगतच त्यांच्या केबिनमध्ये शिरलो, तर खुशवंत सिंह मांडीवर कागद ठेवून लिहिण्यात गर्क होते. ते स्वत:चे लेख हातानेच लिहित. `मला टायपिंगचा कमालीचा कंटाळा येतो. हातानं लिहिलं की, आपल्या अक्षरांचं वळण लिखाणाला आपोआप लाभतं आणि आपलं लिखाण आपल्या स्वभावाप्रमाणे वागतं..’ एकदा खुशवंत सिंहांनी सहज बोलता बोलता सांगून टाकले. लिहित असताना त्यांची एकाग्रता अशी की, जणु त्यांना समाधी लागली आहे, असे वाटावे. त्यामुळेच पहिल्या भेटीच्या वेळी ते लिहित असताना दहा मिनिटे त्यांच्यापासून दोन फुटांवर उभा राहिलो, तरी ते अस्तित्त्व त्यांच्या ध्यानातही आले नाही. `मी कारमध्ये, विमानात, बसमध्येही लिहू शकतो. मला कशाचाही त्रास होत नाही किंवा कुणाचीही अडचणही होत नाही,’ ..त्यांनी स्पष्ट केले.

इतका मोठा प्रतिभावंत लेखक आणि विचारवंत पत्रकार कुठेही, कधीही लिहू शकतो, तर मग अनेकांना लिहिण्यासाठी एअर कण्डिशण्ड हॉटेले व थंड हवेची ठिकाणे का लागतात, हा प्रश्न तेव्हाच मनाला पडला, तो आजही तसाच कायम आहे.

खुशवंत सिंहांबरोबर बोलणे हा एक अभ्यासवर्ग तर असायचाच, शिवाय ते निखळ मनोरंजनही होते. ते `विकली’त असताना आणि नंतर त्यांच्या अखेरच्या काळात त्यांच्या दिल्ली मुक्कामी त्यांना भेटण्याची संधी मिळत गेली. या प्रत्येक भेटीत काही ना काही नवे शिकता आले, हे महत्त्वाचे. खुशवंत सिंह यशस्वी पत्रकार आणि प्रथितयश साहित्यिक होते, याचे एक कारण ते उत्तम निरिक्षक होते, हे असावे. आपल्या वाट्याला येणारा प्रत्येक क्षण ते तन्मयतेने जगत राहिले. समोर येणाऱ्या प्रत्येक वस्तूचे, व्यक्तीचे, घटनेचे निरिक्षण करत राहिले. त्यातूनच त्यांचे अनुभव विश्व समृद्धही होत गेले. त्यांनी `ट्रेन टू पाकिस्तान’ या साहित्यकृतीची निर्मिती केली. फाळणीच्या काळातील निर्वासितांची केविलवाणी परिस्थिती आणि त्यांची भेदरलेली मानसिकता यांचे इतके ह्रद्य आणि मार्मीक विवेचन करणारी दुसरी ललीतकृती अद्याप तरी निर्माण झालेली नाही.

त्यांचा जन्म पाकिस्तानातील पंजाबमधला असला, तरी आयुष्य दिल्लीतच गेले. तरीही त्यांची ही ट्रेन इतकी हुबेहुब कशी उतरली?.. `मी निर्वासितांच्या छावण्या बघितल्या आहेत. तिथलं मुलांचं रडणं आणि महिलांचे आक्रोश ऐकले आहेत. कर्त्या पुरुषाच्या हताश नजरांकडे रोखून बघितलं आहे. हे सारं चित्रण माझ्या मनाच्या कोपऱ्यात फोटो अल्बमसारखं जाऊन बसलं आजही ते फोटो तस्सेच कायम आहेत. ते शब्दांचे कपडे लेऊन ट्रेनमध्ये बसले, इतकंच.’ आपल्या साहित्य निर्मितीचे इंगित त्यांनी इतक्या सोप्या रितीने स्पष्ट केले.

खुशवंत सिंह काहीसे एकलकोंडे आणि मितभाषी असले, तरी त्यांच्या बोलण्यात, लिहिण्यात नर्म विनोद असायचा. जाड चष्म्याआडचे डोळे किलकिले करून किंचित हसत ते विनोद ऐकवायचे. व्यंगचित्रकार जसे एखाद्याचे स्वभावाचे वा कारभारातले व्यंग अचूक ओळखून त्यावर मल्लिनाथी करत विनोद निमिंत करतो, तसेच खुशवंत सिंहांचेही होते. एखाद्याच्या विशिष्ट स्वभाव-गुणाचे नेमके वर्णन ते मोजक्याच शब्दांत करून हास्याची थुई थुई कारंजी निर्माण करत.

त्यांचा `वुईथ मॅलीस टोवर्डस वन अँड ऑल’ हा स्तंभ बराच गाजला. त्यात त्यांनी इंदिरा गांधींपासून बिल क्लिंटनपर्यंत अनेकांची यथेच्छ खिल्ली उडवली. पण एखाद्याबद्दल टिंगलखोर लिखाण करताना त्या नेत्याविषयी जनमानसात अनादराची भावना निर्माण होणार नाही, याची काळजीही ते घेत होते. त्यामुळेच त्यांनी आपल्या लेखणीच्या फटकाऱ्यांनी अनेकांना घायाळ करताना त्यांचे प्रेमही मिळवले व राखले. इंदिरा गांधींच्या आणीबाणीला त्यांनी पाठिंबा दिल्याने अनेक पत्रकारांचे पित्त खवळले. १९७७ च्या निवडणुकांनंतर सत्ताधारी बनलेले राज्यकर्तेही बिथरले. पण लोकनायक जयप्रकाश नारायणापासून बाबू जगजीवन राम यांच्यापर्यंत साऱ्यांशीच त्यांचा दोस्ताना कायम राहिला व टिकला.

सत्तरच्या दशकात खुशवंत सिंह `विकली’चे संपादक होते. तब्बल नऊ वर्षे त्यांनी या साप्ताहिकाचे संपादन केले व त्याचा खप 64 हजारांवरून चार लाखांवर नेला. पण ते निवृत्त होण्याच्या केवळ एक आठवडा आधी त्यांना व्यवस्थापनाने तडकाफडकी दूर केले व त्याच दिवशी नव्या संपादकाची नियुक्तीही केली, त्यानंतर `विकली’चा खप घसरतच गेला व नंतर काही वर्षांतच `विकली’चा अवतारही संपला.

`विकली’च्या यशात खुशवंत सिंहांच्या रोखठोक लेखणीचा, इंग्रजी शब्दकळेवरील असामान्य प्रभुत्वाचा आणि कल्पक संपादन कौशल्याचा वाटा तर होताच, शिवाय त्यांचे मार्केटिंगचे डोकेही कारणीभूत होते. `विकली’चा आकार त्यांनी बदलला व तो असा केला की, त्याच्या घडीत कर्मचारी आपला टिफीन नेऊ शकत. त्यामुळे सरकारात काम करणारे तृतिय श्रेणी कर्मचारीही मोठ्या अभिमानाने `विकली’ जवळ बाळगू लागले. त्याच्या घडीतून त्यांचा दुपारच्या जेवणाचा पोळी-भाजीचा डबा सुरक्षीतपणे जाऊ लागला. खुशवंत सिंह स्वत:च हा किस्सा सांगायचे आणि डोळ्यावरचा चष्मा शर्टच्या टोकाने पुसत डोळे मिचकावून हसायचे.

आपल्याला संपादकपदावरून मुक्त करण्यात आल्याचे पत्र खुशवंत सिंहांना मिळाले. त्यानंतर दहा मिनिटांतच त्यांनी केबिनमधले सामान आवरले व कुणालाही काहीही न सांगताच ते कार्यालयाच्या बाहेरही पडले. `माय इनिंग्ज इज ओव्हर’ इतकेच काय ते लिफ्टमधल्या सहप्रवाशाशी बोलताना पुटपुटले. मनाचा तोल म्हणतात, ते याला. त्यांनी पुढे कधीही या प्रसंगाची फारशी वाच्यताही केली नाही.

आणीबाणी संपून जनता पक्षाची राजवट आल्यानंतर अवघ्या महिनाभरात खुशवंत सिंहांना विकली सोडावी लागली, हा केवळ योगायोग होता की आणखी काही, हे गूढ मात्र त्यांच्याबरोबरच राहिले आणि आता ते कायमचे तसेच राहणार.

खुशवंत सिंहांनी दिल्लीच्या `हिदुस्थान टाइम्स’ आणि नॅशनल हेराल्ड’चे संपादकपदही भूषवले. पण ते खऱ्या अर्थाने रुळले `विकली’मध्येच. तिथे त्यांच्या केबिनमध्ये सर्वत्र पुस्तकांचा ढीग पडलेला असायचा. त्यात अनेक प्रकारची पुस्तके; इतिहास आणि राज्यशास्त्रावरची पुस्तके तर असायचीच, शिवाय चरित्रे, आत्मचरित्रे, कथा, कादम्बऱ्या यांचीही मांदियाळी दिसायची. पण खुशवंत सिंहांचा विशेष लोभ कवितांच्या पुस्तकांवर. दिवसभराच्या दगदगीतही ते कवितांची पुस्तके चाळत राहायचे. काम संपल्यावर केबिनमध्येच आरामखुर्चीत बसून वाचता वाचता कविता गुणगुणायचे.

रवींद्रनाथ टागोर आणि वर्डस्वर्थ यांच्यावर त्यांचा विशेष जीव. त्याचबरोबर अनेक सुफी रचना आणि शीख समाजातील कवीची पदे त्यांना अवगत होती. मूडमध्ये असले की, या रचना ते गुणगुणायचे. `कविता माझी प्रेयसी आहे. ती माझ्यावर आणि मी तिच्यावर प्रेम करतो,’ असे ते बोलून दाखवत.

हे जग माणसांसाठी आहे, अशी त्यांची श्रद्धा होती. त्यामुळेच वृत्तपत्रीय लिखाण मानवाबद्दल असावे, असे ते मानायचे. एकदा त्यांना एक फोटो दाखवायला नेला. तो हिरव्यागार निसर्गाचा होता. खुशवंत सिंह म्हणाले, `फोटो फारच छान आहे. त्याचे कॅलेंडर करून घरात लावा. विकलीत तो वापरता येणार नाही.’ सारे चक्रावले. मग त्यांनी खुलासा केला. `वृत्तपत्राच्या बातमीत, फोटोत माणूस हवा. तुम्ही नदीचा फोटो काढलात, तर त्या नदीत एखादी होडी वल्हवणारा नावाडी दिसायला हवा. पुराचा फोटो असेल तर बुडणारा माणूस हवा. माणूस आहे, म्हणूनच या निसर्गाशी, जगाशी आपलं नातं आहे.’ते वर्तमानपत्रात दिसायला हवं.’ खुशवंत सिंहांचे तत्त्वज्ञान असे होते.

आपल्या सात दशकांच्या अथक कारकिर्दीत खुशवंत सिंहांनी बरीच मुशाफिरी केली. जगाचे सर्व खंड त्यांनी पाहिलेच, शिवाय जगातील अनेक नेत्यांना प्रत्यक्ष भेटून त्यांनी त्यांचे मन जाणून घेतले. अमेरिकेचे जॉन एफ केनेडी, लिन्डन जॉन्सन हे माजी अध्यक्ष त्यांच्या संपर्कात आलेच, शिवाय युगांडाचा क्रुरकर्मा इदी अमीन यांच्याशीही खुशवंत सिंहांनी संपर्क प्रस्थापित केला. इराणच्या शहांबरोबर त्यांचा दोस्ताना झाला आणि पाकिस्तानचे हुकुमशहा अयुब खान, याह्या खान व झुल्फिकार अली भुट्टो यांच्याही संपर्कात ते आले. ‘या भेटी-गाठींचा माझ्या आयुष्यावर नकळत परिणाम होत गेला. प्रत्येकाकडून मी काही ना काही शिकतच गेलो. त्यामुळे माझं आयुष्य समृद्ध होत गेलं,’ असे ते बोलून दाखवत. 1980 ते 86 या काळात ते राज्यसभेचे सदस्य बनले. इंदिरा गांधींच्या आग्रहामुळेच त्यांनी राष्ट्रपतींच्या नामनियुक्तीचे हे पद स्वीकारले खरे, पण तिथे त्यांचा जीव रमला नाही व मन गुंतले नाही.

तो काळ राजकीय गुंतागुंतीचा व अस्थैर्याचा होता. याच काळात इंदिरा गांधींची हत्या झाली, राजीव गांधींचा उदय झाला व बोफोर्स घोटाळ्याने त्यांना घेरलेसुद्धा. खुशवंत सिंह हे सारे जवळून बघत होते. त्यांचे मन विषण्ण होत होते. इथे वेळ घालवण्यापेक्षा रोजच्या रोज लिहित राहावे, हेच खरे, असेच त्यांनी मानले.

वर्तमानपत्रांतील संपादकांना वादांना सामोरे जावेच लागते. काही संपादक वादांपासून चार हात दूर राहतात, तर काही वादांना घाबरत नाहीत. काहीजण वाद अंगावर ओढवून घेतात, तर काही वादांतच आनंद मानतात. खुशवंत सिंह मात्र वादच जगत राहिले. ‘वाद हा माझ्या जगण्याचाच एक हिस्सा आहे. माझ्या अस्तित्त्वाचे अविभाज्य अंग आहे. ते मी माझ्यापासून कसं तोडू?’, असे त्यांनी एकदा म्हटले आणि स्वत:च्याच वाक्यावर खुश होऊन ते बराच काळ स्वत:शीच हसत राहीले. त्यांनी पत्रकारितेच्या आणि लिखाणाच्या कारकीर्दीत अनेक वाद अनुभवले व पचवले. पण त्याबद्दल आता त्यांना ना खंद ना खेद. या वादांच्या काळात आपण कोणाची कशी जिरवली, हे सविस्तर सांगताना आपली स्वत:ची कशी जिरली, याचे किस्सेसुद्धा ते तितक्याच हौसेने ऐकवायचे.

त्यांचा एक असाच गाजलेला वाद छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल त्यांनी काढलेल्या अनुदार उद्गारांचा. त्यांच्या अखेरच्या काळात त्यांना एकदा त्याबद्दल विचारले. ते बराच काळ काहीच बोलले नाहीत. कुठेतरी तंद्री लावून बसले. मग पुढे वाकून माझे दोन्ही हात त्यांच्या सुरकुतलेल्या हातात घेऊन त्यांनी घट्ट दाबले आणि ते म्हणाले, `छोड दो बेटा! सब सवालों के जबाब नही होते। कुछ सवाल सवालही रहने दो। … मला उत्तर मिळाले होते.

भारतीय राजकारणात पंडित जवाहरलाल नेहरूंपासून राजीव गांधींपर्यंत अनेक पंतप्रधान त्यांच्या निकटच्या संपर्कात आले, तरी त्यांना इंदिरा गांधींचा स्वभाव व राजकारण विशेष आवडत होते. त्यामुळेच अनेकांचा विरोध पत्करुन आणि प्रसंगी नोकरीवर लाथ मारून ते इंदिरा गांधींची स्तुती करत राहिले. उच्चारस्वातंत्र्याचा संकोच करणाऱ्या आणीबाणीचेही त्यांनी समर्थनच केले. मात्र 1984 मध्ये त्याच इंदिरा गांधींनी अमृतसरच्या सुवर्ण मंदिरावर कारवाई केली आणि खुशवंत सिंहांचे माथे भडकले. या कृतीचा निषेध म्हणून त्यांनी `पद्मभूषण’ हा किताब परत केला.

1974 साली त्यांना इंदिरा गांधींच्या काळातच हा किताब मिळाला होता. तो त्यांनी त्यांनाच परत केला. नंतर त्यांना २००७ मध्ये मनमोहन सिंह यांच्या सरकारने `पद्मविभूषण’ने गौरवले. `हा किताब माझ्याकडे मी मरेपर्यंत राहील, अशी मला आशा वाटते’, असे त्यांनी नंतर खोचकपणे म्हटले.

खुशवंत सिंहाचे बालपण सुखवस्तु व सुशिक्षीत कुटुंबात गेले. त्यांनी लंडनला कायद्याचे शिक्षण घेतले व काही काळ तिथेच प्राध्यापकीही केली. पण असे असले, तरी ते मनाने ते इंग्रजाळले नाहीत. ते भारतीयच राहिले. ते धर्माने शीख असले, तरी कोणत्याही धार्मिक विधींवर त्यांचा विश्वास नव्हता. त्यामुळे पहाटे चार वाजता उठल्यापासून ते आपल्या लिखाणाचाच विचार करत.

अखेरच्या काही महिन्यांत अगदी अंथरुणाला खिळेपर्यंत त्यांचे लेखनकार्य चालूच राहिले, हे विशेष. लंडनमध्ये ऑक्सफर्ड स्ट्रीटवरील पुस्तकांच्या दुकानांत ज्या काळात भारतीय लेखकांच्या पुस्तकांची जेमतेम दोन-तीन कपाटे असायची, त्या काळात मनोहर माळगावकर, रवींद्रनाथ टागोर, व्ही. एस. नायपॉल यांच्याबरोबरीने खुशवंत सिंहांची पुस्तके दाटीवाटीने बसलेली पहाण्याचे भाग्य अनेकांना लाभले. त्यांचे अखेरचे पुस्तक `द गुड, द बॅड ॲंड द रिडिक्युलस’ प्रकाशीत झाले. खुशवंत सिंहांनी तेव्हा वयाची 98 वर्षे पूर्ण केली होती. ऑक्टोबर २०१३ मध्ये दिल्लीत या पुस्तकाचे प्रकाशन झाले, तेव्हा क्षीण आवाजात खुशवंत सिंह म्हणाले, `हीच माझी बहुधा शेवटची ओंजळ’. त्यांचे हे बोल दुर्दैवाने खरे ठरले.

मृत्यूच्या काही महिने आधी खुशवंत सिंहाची प्रकृती ढासळू लागली होती. वायाची 99 वर्षे पुरी झाली असल्याने आता ते शंभरी गाठणारच, अशी अनेक चाहत्यांची इच्छा व अपेक्षाही होती. पण स्वत: खुशवंत सिंहांना अशा मैलाच्या दगडांची फारशी फिकीर नसावी. त्यामुळेच ते शांतपणे मृत्यूला सामोरे गेले. त्यांना बहुधा दोन वर्षांपूर्वीपासूनच ही देवाची घंटा ऐकू येत होती. कदाचित त्यामुळेच त्यांनी 23 ऑक्टोबर २०११ रोजी प्रसिद्ध केलेल्या आपल्या `ॲन अॅग्नॉस्टिक व्ह्यू ऑफ लाईफ अँड डेथ’ या लेखात जीवन, मृत्यू, आत्मा आदी बाबींबद्दल तत्वज्ञानात्मक चिंतन केले. या माणसाच्या विचारांची खोली त्यातून स्पष्ट दिसते.

ते लिहितात की, ‘I think a lot about life and the way we live it; I also think about death and how we deal with it. The basic point is, we don’t know where we come from; we also don’t know where we go after death. In between, we might know a little about life. People talk a lot about body and soul. I have never seen a soul, nor do I know anyone who has seen one. So for me, death is a full stop”

खुशवंत सिंह गेले. त्यांच्या बरोबर त्यांचे ते कलंदर, बिन्धास्त जगणेही संपले. त्यांचाच पुनर्जन्मावर विश्वास नसल्याने तसे हसणे, बोलणे, लिहिणे आणि जगणे पुन्हा होण्याची शक्यता नाही. ती पोकळी मात्र कायमचीच राहणार.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button