मुक्तपीठ

गांधी, धर्मसंसद आणि काली जुबा !

- पुरुषोत्तम आवारे- पाटील

अठ्ठेचाळीस साली शरीराने मारलेला गांधी बाबा आताच्या कोणत्याही बुवा, बाबांच्या डोक्यातून जात नाही. त्याने या सगळ्या गांजावाण किड्यांवर एवढे गारुड करून ठेवले आहे की हे लोक धर्माची ढाल करीत दरवर्षी गांधी मारण्याचा प्रयत्न करीत असतात. अकोल्याच्या कमिटी वार्डात उभा राहून सपाटून मार खाल्लेला कालीचरण ज्या महात्म्यावर भुंकला त्याने गांधींचे महात्म्य तसूभरही कमी होणार नाही, मात्र या कथित धर्मसंसदेची लायकी अवघ्या जगाला कळून चुकली आहे. गांधी का मरत नाही ? या प्रश्नाचे उत्तर आपल्या देशात हे कथित धर्माचार्य आपल्या करणीने दरवर्षी देत असतात.

नखशिखांत काळा असलेला कालीचरण हा भोंदू बाबा, महात्मा गांधींना शिव्या घालत असताना जो टाळ्यांचा गडगडाट ऐकू येतो ती धर्माच्या निकोप शरीरावर असलेली द्वेषाची सूज असल्याची खात्री तेव्हा पटते जेव्हा त्याच धर्म पिठावरून एखादा सुंदरदास बाहेर पडतो. जो देश गांधी नावावर जगभरात ओळखला जातो त्याच देशात अशा हराम अवलादी निपजतात आणि त्याचे पालकत्व जेव्हा आमच्या अकोल्यावर येते तेव्हा आम्हाला हजार विंचूदंश झाल्याच्या वेदना होतात.

ऐतिहासिक अकोला जिल्ह्याची मान शरमेने खाली झुकली. ज्या जिल्ह्याला एकापेक्षा एक महापुरुष, समाजसेवक आणि सांस्कृतिक प्रतिष्ठा वाढविणारे लोक आहेत त्याच जिल्ह्यात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अत्यंत खालच्या भाषेत शिवीगाळ करून गरळ ओकणारा कालीचरण हा भोंदू बाबा राहतो हे तमाम जिल्ह्याचे दुर्दैव म्हणावे लागेल. जगातला कोणताही धर्म कुण्या व्यक्तीवर अश्या घाणेरड्या भाषेत टीका करायला सांगत नाही मात्र कालीचरण याने धर्म संसदेत गांधी द्वेषाची ओकारी करून केवळ चरणच नव्हे तर आपली वाणी देखील काली असल्याचे दाखवून दिले आहे.

महात्मा गांधींवर वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या कालिचरण बाबाविरोधात छत्तीसगडमध्ये गुन्हे दाखल झाले आहेत. रायपूरमधील धर्मसंसदेत केलेल्या भाषणात त्याने वादग्रस्त वक्तव्य केले होते. महात्मा गांधींवर टीका करताना त्याने नथूराम गोडसेचे गोडवे गायले आहेत. कालिचरण हा मूळचा अकोल्याचा रहिवाशी आहे. जुने शहरातील शिवाजीनगर भागातल्या भावसार पंचबंगल्याजवळ त्यांचे कुटुंबीय राहतात. ऐतखाऊ सवय लागल्याने तरुण वयात अध्यात्माकडे वळलेल्या कालिचरण बाबाचे मूळ नाव अभिजीत सराग असे आहे. आपल्या देशात अध्यात्माला चांगली मार्केट आहे हे ओळखून कालीचरण त्या मार्गाचा प्रवासी झाला.

अकोल्यातील हिंदुत्ववादी तरुणाईमध्ये या बाबाची मोठी क्रेझ आहे. मात्र, कालीचरण आपल्या भूतकाळाविषयी फारसे काही कुणाला सांगत नाही. लहानपणी अभिजीत अत्यंत खोडकर होता. शिक्षणाचे आणि अभिजितचे सख्य फारसं जमले नाही. त्याला शाळेतही जाण्याचा कंटाळा यायचा. लहानपणापासून त्याचा ओढा अध्यात्माकडे अधिक होता. त्यातही तो कालीमातेची आराधना करायचा. घरच्या मंडळींना तो शिकावा आणि काहीतरी वेगळं काम करावे असे वाटायचे. मात्र, या परिस्थितीतही त्याचा अध्यात्मावरचा विश्वास आणि ओढा वाढत गेला. पुढे अभिजीतचा ‘कालीपुत्र कालीचरण’ झाला. पुढे लोकांनी त्यांना ‘महाराज’ असे संबोधने सुरू केले. या कालिचरण महाराजाने २०१७ मध्ये अकोला महापालिकेची निवडणूक लढवली होती. मात्र, पराभवाचे तोंड पाहावे लागले.

महात्मा गांधींवर बोलून आजकाल सवंग लोकप्रियता हमखास मिळवता येते. त्यांच्याबाबत हिंदुत्ववादी मंडळींनी एवढी घाण पसरवून ठेवली आहे की गांधींच्या विरोधात काहीही बोलले गेले तरी हिंदुत्ववादी मंडळी डोळे लावून ते ग्रहण करायला तयार असतात. आयुष्यभर गांधी स्वतःला हिंदू म्हणवून घेत होते, मात्र त्यांचे हिंदुत्व कुणाचा द्वेष, मत्सर करणारे नव्हते. चातुर्वर्ण्य त्यांच्यातील हिंदूला मान्य नव्हते. गरीब भंगी मुलगी ज्या दिवशी देशाच्या सर्वोच्च पदावर बसेल तो दिवस मला बघायचा आहे, असे मानणारे गांधी खरंतर कोणत्याच धर्माला पचत नाहीत. वैदिक धर्माने म्हणूनच गांधींना गोळ्या घालून ठार करण्याचे शेवटचे अस्त्र वापरले आहे.

कालीचरण ज्या धर्म संसदेत बरळला त्या सभेत असणाऱ्या एकही धर्मचाऱ्याला त्यावर आक्षेप घ्यावा असे वाटले नाही याचा अर्थ हिंदुत्ववादी लोकांच्या मेंदूत किती खोलवर गांधी बाबत जहर भरण्यात गोडसे बंधू यशस्वी झाले आहेत. गांधींबाबत विषारी वक्तव्य करणारा कालीचरण हा काही पहिला मूर्ख नाही आजवर अनेकांनी तो प्रयत्न केला आहे. देशातील हिंदुत्ववाद्यांना गांधी देशाचे खलनायक उभे केल्याशिवाय मुस्लिम धर्माशी खेटे घेता येत नाहीत हीच त्यांची खरी अडचण आहे. जीभ आणि मेंदूत आकंठ जहर भरलेले असे असंख्य कालीचरण तयार केले जात आहेत. लाज याची वाटते की आम्ही ज्या ऐतिहासिक शहरात वास्तव्य करतो हा डाग त्याच शहराचा रहिवाशी निघाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button