
शिवसेनेचा दसरा मेळावा अगदी सुरुवातीपासून निर्णय, दिशा आणि आदेश याबद्दल प्रसिद्ध होता. शिवसैनिक यालाच विचारांचे सोने म्हणत होता. जोवर बाळासाहेब ठाकरे हयात होते तोवर हे सोने लुटण्याची एक वेगळी मजा होती. इथे व्यक्त होणारे विचार आणि शिवसेना प्रमुखांच्या मुखातून बरसणारा अंगार पुढे वर्षभर शिदोरी म्हणून शिवसैनिक वापरत होते. बाळासाहेब गेल्यावर ती मजा राहिली नसली तरी उद्धव ठाकरे यांनी अगदीच निराशा केली असे म्हणता येणार नाही. बोलण्यात आक्रमकता नसली तरी उद्धव यांना पित्याकडून शब्द संपत्तीचे दान भरपूर मिळाले आहे. त्याचा अतिशय प्रभावी वापर त्यांनी यावेळी केला आहे.
उद्धव ठाकरे मुळात मवाळ आणि धीर गंभीर स्वभावाचे धनी आहेत. त्यांचा अभ्यास आणि स्मरणशक्ती अतिशय दांडगी आहे. गेल्या दोन वर्षात राज्याचा गाडा हाकताना अनेकांनी हा अनुभव घेतला असेल. जे केवळ त्यांना मातोश्रीवर बसून रिमोट वापरणारा पक्षप्रमुख समजत होते, त्या दोन्ही काँग्रेसला उद्धव ठाकरे यांनी आपल्यामधील उत्तम प्रशासक दाखवून दिल्याचे मित्रपक्ष आता खासगीत मान्य करायला लागले आहेत. गेल्या दोन वर्षात सेना-भाजपमधील अंतर सतत वाढत आहे. त्यासोबत कटुता पण वाढत आहे. युती तुटल्यावर काहीकाळ अनेकांना जवळ येण्याची आशा होती, मात्र हे संबंध कायमचे तुटावे असे प्रयत्न केंद्र सरकारकडून सतत झाल्याने आज एकमेकांचे पक्के वैरी होण्याच्या एका महत्त्वाच्या वळणावर सेना आणि भाजप आले आहेत.
दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी ज्या पद्धतीने मोदी, फडणवीस आणि संघही धुवून काढला त्यावरून तर हे उघड झाले आहे की आगामी कोणत्याच निवडणुकीत हे पक्ष एकत्र येणार नाहीत. लोकसभा किंवा मुंबई मनपासाठी तरी हे दोन पक्ष एकत्र येतील अशी आस लावून बसलेल्या गोदी मीडियाला ठाकरे यांनी या भाषणात सणसणीत चपराक लगावली आहे. मुंबईत बसून लोकांची दिशाभूल करणारे भाऊ तोरसेकर यांच्यासारखे बुद्धी भणंग विचारवंत यांचा तर ठाकरे यांनी पार कचरा करून टाकला आहे. गेली दोन वर्षे सेना-भाजप वेगळी होऊनही ज्यांना आज ना उद्या हे एकत्र येतील अशी पेड आशा उरली होती, तिच्या ठिकर्या उडवून उद्धव ठाकरे यांनी हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा, असे थेट आव्हान दिले आहे.
अगदीच बाळासाहेबांची नक्कल नसेल, पण पक्षप्रमुख शोभावे या थाटात उद्धव ठाकरे बोलले. सर संघचालक मोहन भागवत यांच्या विधानांचा संदर्भ देत त्यातला फोलपणा आजवर कुणीच एवढा बाहेर काढला नसेल मात्र ठाकरी चिमटे घेत उद्धव यांनी आपल्या हिंदुत्वाची व्याख्या ऐकवून भाजपमधील नवहिंदूंना जो इशारा दिला आहे त्यावरून काही बाबी हे ठाकरेच यशस्वीपणे हाताळू शकतात हे दाखवून दिले आहे. गाय जगो अन् माय मरो असले आमचे हिंदुत्व नाही हे ठणकावून सांगताना त्यांनी केंद्र सरकार कशी मोगलाई लादत आहे हे सोदाहरण सांगून तोंडाळ भाजपवाल्यांना गप्प केले आहे.
हे सगळे पाहता जरी भाजपला गरज असली तरी लोकसभा किंवा मुंबई महापालिका निवडणुकीत हे दोघे एकत्र येतील याची सुतराम शक्यता वाटत नाही. काहींनी त्यासाठी देव पाण्यात बुडवून ठेवले आहेत, पण त्यांच्या सगळ्या मनसुब्यांवर पाणी फेरणारे दसरा मेळाव्यातील भाषण होते हे कुणीही मान्य करेल. एव्हाना प्रादेशिक पक्षांना संपविण्याचे भाजपचे धोरण आपल्या देशात लपून राहिले नाही. याचीही उद्धव ठाकरे यांना जाणीव आहे हे परवाच्या दसरा मेळाव्यातील त्यांच्या भाषणात दिसून आले. उद्धव असेच आक्रमक आणि वार्याची दिशा मोजत गेले तर राज्यात भाजपची नाकेबंदी करायला उशीर लागणार नाही हे तेवढेच खरे आहे.




