नाशिक, दि. १४ (प्रतिनिधी) – ‘हॅलो लिगम फाऊंडेशन’ या सेवाभावी सामाजिक विश्वस्त संस्थेला सार्वजनिक विश्वस्त संस्था नोंदणी अधिनियम १८६० अन्वये क्र. ई-०००१८०६ (एनएसके) नुसार सहाय्यक धर्मादाय आयुक्तांनी परवानगी दिली असून लवकरच एका विशेष समारंभाद्वारे या ट्रस्टच्या माध्यमातून लोकोपयोगी उपक्रमांचा शुभारंभ होणार असल्याची माहिती ‘हॅलो लिगम फाऊंडेशन’चे संस्थापक अध्यक्ष अॅड. रमेश बाळनाथ कुशारे यांनी दिली.


समाजातील ज्येष्ठ नागरिकांना कायदेशिर मार्गदर्शनासह आवश्यकतेनुसार गरजवंत ज्येष्ठांसाठी निवासी व अनिवासी आश्रय स्थान उभारणे, विरंगुळा केंद्राची निर्मिती करणे; गरजू, अनाथ बालकांसाठी अनाथाश्रम स्थापन करणे, होतकरु विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत उपलब्ध करून देणे, विद्यार्थी समुपदेशन, कौटुंबिक समुपदेशन, करिअर मार्गदर्शन, व्यसनाधिनता रोखण्यासाठी आवश्यक जागृती शिबिरांचे नियोजन, कायदेविषयक अज्ञान दूर करणे, मोफत विधी साक्षरता, आर्थिक साक्षरता, महिला व बालकांच्या तसेच ज्येष्ठ नागरिक संरक्षणार्थ कायदेविषयक जनजागृती शिबिरांचे आयोजन करणे, राष्ट्रीय व आंतररराष्ट्रीय कायद्यांची माहिती सोप्या भाषेत शेतकरी, उद्योजक, सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणे, राष्ट्रीय एकात्मकतेचे उपक्रम राबवणे आदी सामाजिक उद्देश समोर ठेवून नाशिकमधील वकिलांनी पुढाकार घेऊन ‘हॅलो लिगम फाऊंडेशन’ या सेवाभावी सामाजिक विश्वस्त संस्थेची स्थापना केली आहे.
‘हॅलो लिगम फाऊंडेशन’ या सेवाभावी सामाजिक विश्वस्त संस्थेच्या कार्यकारिणीमध्ये अॅड. चंद्रशेखर बाजीराव कुलकर्णी (उपाध्यक्ष), अॅड. योगिनी विजय बाबर (कायम स्वरूपी सचिव), अॅड. तनुज रमेश कुशारे (खजिनदार), अॅड. उषा सुहास जाधव (सचिव), तर सदस्य म्हणून अॅड. अजित भास्करराव पाटील, अॅड. सुनील शांताराम दरगोडे, अॅड. आशिक शरीफ कुरेशी, अॅड. भरत मुरलीधर ठाकरे, अॅड. प्रतिक प्रभाकर खराटे यांचा समावेश आहे.