नेत्यांची खुशमस्करी किती करावी, याला काही मर्यादा असायला हव्यात. काँग्रेसमध्ये इंडिया इंज इंदिरा म्हणणारे देवकांत बारूआ जसे होते, तसेच नेत्यांच्या चपला उचलणारेही अनेक होते. नेते असे करू देतात आणि त्यांची चापलुसी करणारे नेते ही मग तयार होतात. लांगुलचालन करायलाही काही मर्यादा असाव्या लागतात. त्या तशा पाळल्या नाहीत, की मग हसे होते.
आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लांगुलचालन करण्याची नेत्यांत स्पर्धा लागली आहे. मोदी देशाला योग्य दिशेने नेत आहेत. त्यांच्या काळात देशाची प्रगती होते आहे, असे म्हणणेही योग्य आहे. मोदी केवळ देशाचेच नाही, तर ते जगाचे नेते वाटणे ही स्वाभावीक आहे. त्यांच्या अनुयायांना मोदी यांच्यात देवत्व भासणेही शक्य आहे; परंतु कोणी आणि कितीदा मोदी यांना देवत्व द्यावे, याला मर्यादा नसली, की मग ज्याला देवत्व दिले, त्याचेही हसू होते. मोदी यांचा ‘ईश्वराचा अवतार’, ‘युगपुरुष’ असा उल्लेख करून भारतीय जनता पक्षाच्या खासदारांनी स्तुतिसुमने उधळली आहेत. मोदी देशाला योग्य दिशेने नेत असल्याचे अरुणाचल प्रदेशचे भाजप सदस्य तापीर गाओ यांनी म्हटले, तर खासदार जमयंग नमग्याल यांनी मोदींचा ‘युगपुरुष’ असा उल्लेख केला आहे. तिथपर्यंत ठीक असते. नमग्याल हे लडाखचे लोकसभा सदस्य आहेत. जम्मू आणि काश्मीरसाठी पुरवणी मागण्यांबाबत झालेल्या चर्चेत त्यांनी मोदी यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करताना स्व. श्यामाप्रसाद मुखर्जी यांची स्वप्नपूर्ती मोदी यांच्याकडून होत असल्याचा उल्लेख केला. ईशान्येकडील राज्यांमधील चहाच्या मळ्यात काम करणार्यांच्या समस्या सोडविल्याचा उल्लेख करून गाओ यांनी मोदी यांना ईश्वरीय अवतार असल्याचे म्हटले. पुरवणी मागण्यांवरील चर्चेदरम्यान गाओ म्हणाले, की मोदी हे मनुष्य नसून कोणाचातरी अवतार आहेत. ते देशाला योग्य दिशेने नेत आहेत. अरुणाचल प्रदेश व ईशान्येकडील राज्यांमध्ये पायाभूत विकासकामांचा उल्लेख गाओ यांनी या वेळी केला. मोदी सरकारने कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी केलेल्या उपाययोजनांचा उल्लेखही गाओ यांनी केला. मोदी यांच्या नेतृत्वामध्ये भारताकडून शंभराहून अधिक देशांना कोरोनाच्या लसींचा पुरवठा होत आहे. हे निश्चितच कौतुकास्पद असल्याचे गाओ म्हणाले. केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये चहा कामगारांच्या कल्याणासाठी एक हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यावरून ईशान्येकडील खासदारांनी मोदी यांचे कौतुक केले. काही दिवसांपूर्वीच हिमाचल प्रदेशचे नगरविकास मंत्री सुरेश भारद्वाज यांनी मोदी यांचा ‘भगवान शंकराचा अवतार’ म्हणून उल्लेख केला होता. भारतीय जनता पक्षात सुरुवातीपासून असणारे नेते मोदी यांचे लांगुलचालन करतात; परंतु सत्तेसाठी पक्षांतर करणार्यांनीही आता मोदी यांचे लांगुलचालन करण्यासाठी स्पर्धा सुरू केली आहे. खरेतर देशात लोकशाही आहे आणि सत्ताधारी पक्षांवर, त्याच्या नेत्यांवर टीका करण्याचा विरोधकांना आणि सामान्य माणसांनाही अधिकार आहे. फक्त ही टीका व्यक्तिद्वेषातून असू नये, याचे भान ठेवले पाहिजे. धोरणात्मक मुद्द्यांवर, कारभारावर टीका करायला कुणाचीही काहीच हरकत नाही. सर्वोच्च न्यायालयानेही एका निकालात तसे स्पष्ट केले आहे. तृणमूल काँग्रेसमधून भाजपत आलेल्या सुवेंदू अधिकारी यांना मात्र ते माहीत नसावे. ममता बॅनर्जी यांच्यानंतर पक्षात ज्यांना दुसर्या क्रमांकाचे स्थान होते, त्या अधिकारी यांनी आता ममता यांना लोकशाहीचे धडे द्यायला सुरुवात केली आहे. पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या निवडणुकांचा पहिला टप्पा पार पडणार आहे. सध्या भाजप आणि तृणमूल काँग्रेसकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. एकीकडे तृणमूल काँग्रेसकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांना लक्ष्य करण्यात येत आहे. भाजपकडून ममता बॅनर्जींवर निशाणा साधला जात आहे. यापूर्वी पूर्व मिदनापूर येथे झालेल्या रॅलीत ममता यांनी आक्रमक होत आपल्याला मोदी यांचे तोंडही पाहायचे नसल्याचे वक्तव्य केले होते. यानंतर तृणमूल काँग्रेसमधूनच भाजपत सामील झालेल्या अधिकारी यांनी ममता यांच्यावर निशाणा साधत मोदी यांच्याविरोधात बोलणे म्हणजे लोकशाही विरोधात बोलणे असल्याचे म्हटले. तुम्हाला मोदी यांचीच कोरोना प्रतिबंधात्मक लस घ्यावी लागणार आहे. ते निवडून आलेले पंतप्रधान आहेत. त्यांच्या विरोधात बोलणे म्हणजे लोकशाहीच्या विरोधात बोलणे. त्यांच्याविरोधात बोलणे म्हणजे भारत मातेच्या विरोधात बोलणे. पाकिस्तान आणि बांगलादेशकडे लस नाही, त्यामुळे तुम्हाला मोदी यांचीच लस घ्यावी लागेल, हे अधिकारी यांचे म्हणणे टीकेसाठी एक वेळ मान्य केले, तरी लस ही मोदी यांची नाही, तर ती देशातील शास्त्रज्ञांनी शोधली आहे आणि देशातील नागरिकांना ती मिळण्याचा हक्क आहे, याचा त्यांना विसर पडला आहे. हिमाचल प्रदेशमधील राम मंदिरामध्ये महाशिवरात्रीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात राज्याचे शहरविकास मंत्री सुरेश भारद्वाज यांनी मोदी यांच्याबद्दल मोठे विधान केले आहे. मोदी हे महादेव शंकराचे अवतार आहेत. त्यांना शिवाचे वरदान मिळाले आहे, असे भारद्वाज यांनी म्हटले आहे. 2019 मध्ये लोकसभा निवडणुकीचे निकाल येण्यापूर्वी मोदी दोन दिवस केदारनाथ येथील गुहेमध्ये ध्यानाला बसले होते. त्यामुळे त्यांना भगवान शंकराचे वरदान मिळाले, इथपर्यंतचे त्यांचे म्हणणे एकवेळ मान्य करता येईल; परंतु ते शंकराचे अवतार आहे, असे म्हणणे म्हणजे लांगूलचालनाची सीमा ओलांडण्यासारखेच आहे.