मुक्तपीठ

भानामती इथली थांबत नाही !

- पुरुषोत्तम आवारे-पाटील

चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती जवळ वणी खुर्द गावात भानामती, जादूटोणा केल्याच्या संशयावरून अनुसूचित जातीच्या तीन लोकांना गावात सार्वजनिक ठिकाणी बांधून मारहाण करण्यात आली. यात जवळपास आठ पाच महिलांसह सात जण जखमी झाले आहेत. हा प्रकार गावात सर्वांच्या समक्ष घडला म्हणून तो बाहेर आला अन्यथा असे प्रकार हमखास दबाव वापरून दाबले जातात. आजही करणी, भानामती आणि जादूटोणा केल्याच्या नावाखाली निरपराध लोकांना अमानुष मारहाण होते.प्रसंगी त्यांना मारूनही टाकले जाते हे भयंकर आहे.आपल्या सगळ्या प्रगतीवर पाणी फेरणारे आहे.

महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीच्या रेट्यामुळे 2013 साली जादूटोणा विरोधी कायदा झाला, मात्र हा कायदा करून राज्य सरकार एवढी वर्ष केवळ स्वतःची पाठ थोपटून घेत आहे. कायदे करून चालत नसते, त्याची प्रभावी अंमलबजावणी सुद्धा करावी लागते याचा राज्य सरकारला पडलेला विसर तर अधिकच गंभीर आहे. जादूटोणा विरोधी कायदा निर्माण होण्याच्या हालचाली जेव्हा सुरू होत्या तेव्हा दोन्ही काँग्रेस सत्तेवर होत्या. तत्कालीन सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांनी हा कायदा पारित करून घेण्यासाठी प्रा. श्याम मानव यांच्यानंतर सर्वाधिक परिश्रम घेतले होते. त्या काळात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते या कायद्याला विरोध करीत होते. या घटनांसाठी स्वतंत्र कायद्याची गरज नाही, असा युक्तिवाद मंत्रिमंडळ बैठकीत करीत होते. खरंतर त्याही काळात राज्यात दोन दिवसाआड एक निरपराध व्यक्ती जादूटोणा किंवा करणी केल्याच्या संशयावरून मारली जात होती. हे प्रमाण आजही कमी झाले नाही याचे चंद्रपूर जिल्ह्यातील ही घटना पुरावा म्हणता येईल. भानामती किंवा जादूटोणा करते म्हणून गावोगाव हजारो लोकांना लक्ष्य केले जाते. अनेकदा सर्व गाव मिळून अशा व्यक्तीला बेदम मारहाण करून मारून टाकते. गावचा मामला असल्यामुळे अशा प्रकरणात पुरावा द्यायलाही कुणी पुढे येत नाही असा आजवरचा अनुभव आहे. गावात कुणाच्या तरी अंगात देव, साप किंवा सवारी येते आणि जे लोक आजाराच्या समस्या घेऊन हजर असतात अशांना घुमणारी देवी किंवा देव कुणाची तरी नावे सांगतो. त्यांनी करणी किंवा भानामती केल्याचे ठोकून देतो. घरातल्या कुणाच्या तरी आजारपणामुळे त्रस्त झालेले लोक आपल्या नातेवाईकांना सोबत घेऊन देवीने नाव सांगितलेल्या लोकांच्या घरावर हल्ला करतात. अंधश्रद्धेचा सामूहिक उन्माद तयार होतो. लोकांच्या मेंदूतील विवेकाचे कप्पे बंद होऊन अमानुष मारहाण केली जाते, त्यात अनेकांचे जीव जातात. या घटनेला सध्याच्या कायद्यातील कलमे लावली तर काही दिवसात आरोपी सुटतात. कारण भारतीय दंड विधानाच्या प्रत्येक कलमात आरोपीचा हेतू सिद्ध करावा लागतो अशा घटनेत तो सिद्ध होत नाही. एका बाजूला मेट्रो, मोनो रेल आणि प्रचंड प्रगतीच्या गप्पा ज्या राज्यात मारल्या जातात त्याच राज्यात आजही दोनशे वर्षांपूर्वीची मानसिकता ठेवून जादूटोणा, करणी केल्याच्या आरोपावरून लोकांच्या हत्या होत असतील, त्यांना मारहाण होत असेल तर ही प्रगती काय कामाची? सत्ताधारी ज्या शाहू, फुले आंबेडकरांच्या नावाचा उठता बसता जप करतात तो विचार समाजाच्या शेवटच्या स्तरात रुजायला हवा यासाठी मात्र हे सरकार काहीच करताना दिसत नाही. या कायद्याचे जनक प्रा. श्याम मानव सह अध्यक्ष असलेली अंमलबजावणी समिती शासनाने गठित केली आहे. मात्र गेल्या 8 वर्षात त्यावर एक रुपयांची देखील तरतूद केली नाही. सरकार अशा किती घटनांची वाट बघणार आहे?

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button