Top Newsअर्थ-उद्योगमुक्तपीठराजकारण

माळेगाव कारखाना निवडणुकीत अजित पवारांचे निर्विवाद वर्चस्व

शरद पवार गटाचा सुपडा साफ; चंद्रराव तावरे एकमेव विरोधी उमेदवार विजयी

बारामती : अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून असलेल्या बारामतीतील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा अखेर निकाल लागला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिष्ठेची केलेली निवडणूक अखेरीस जिंकली आहे. त्यांच्या गटाच्या नीलकंठेश्वर पॅनलच्या २१ उमेदवारांपैकी फक्त १ उमेदवाराचा पराभूत झाला आहे. या निवडणुकीत अजितदादांनी पुन्हा एकदा आपण काकांपेक्षा भारी असल्याचं दाखवून दिलं आहे.

माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत मुख्य प्रतिस्पर्धी चंद्रराव तावरे यांच्या सहकार बचाव पॅनलच्या २१ उमेदवारांपैकी एक उमेदवार विजयी झाला आहे. या निवडणुकीत अजित पवार गटाच्या नीलकंठेश्वर पॅनलने २१ पैकी २० जागा जिंकल्या आहे. तर दुसरीकडे, काका शरद पवार यांच्या बळीराजा सहकार बचाव पॅनलचा सुपडा साफ झाला आहे. बळीराजा सहकार बचाव पॅनलच्या 21 उमेदवारांपैकी एकही उमेदवार विजयी झाला नाही.

‘मीच चेअरमन होणार’ असं म्हणत माळेगाव निवडणुकीसाठी स्वत: उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीत तळ ठोकून होते. त्यांच्यासमोर शरद पवार आणि तावरेंच्या पॅनलचं आव्हान होतं. त्यामुळे माळेगाव साखर कारखान्याची निवडणूक प्रतिष्ठेची निवडणूक बनली होती. आपण चेअरमन झाल्यास माळेगाव कारखान्यासाठी 500 कोटींचा निधी आणू हे अजित पवारांचं वक्तव्य निवडणुकीदरम्यान चांगलंच चर्चेत आलं होतं. अखेर तावरेंच्या पॅनलला दादांनी निवडणुकीत धोबीपछाड दिल्यामुळे अजित पवार माळेगावचे चेअरमन होणार असल्याच्या चर्चा यानिमित्तानं सुरू झाल्या आहेत. विजयी झाल्यानंतर अजित पवारांच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार जल्लोष करण्यात आला..

चंद्रराव तावरे यांचा विजय

अजितदादांच्या पॅनेलची मुख्य लढत होती चंद्रराव तावरे यांच्या पॅनेलसोबत. या निवडणुकीत अनेक मुद्दे चर्चेत आले. विरोधी पॅनेलचे प्रमुख चंद्रराव तावरे यांच्या वयाचा मुद्दा चर्चेत आला. त्यांचे वय ८५ आहे. या वयात ते निवडणूक लढवत होते हा मुद्दा विरोधकानी टीका करण्यासाठी पुढे आणला तर त्यांच्या पॅनेलने मात्र तो एक अभिमानास्पद मुद्दा बनवला. निवडणूकदरम्यान ज्या आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत त्याला चंद्रराव तावरे हे त्यांच्या साध्या शैलीत उत्तर देताना दिसत होते. बोलण्यात कोठेही आक्रमकता नव्हती. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव दादांच्या टीममध्ये एकेकाळी काम केलेले चंद्रराव तावरे आहेत. त्यांनी वसंतदादांना नेहमीच आदरस्थानी मानले. स्वातंत्र्य मिळावे म्हणून लढलेली वसंतदादांची पिढी आणि या पिढीचा सहवास मार्गदर्शन आशीर्वाद लाभलेली चंद्रराव तावरे यांची पिढी.. वय झाले तरी काही विचार मूल्य सोबत घेऊन लढत रहायचा स्थायीभाव.दादाही असेच कार्यरत राहत असतं. वयाच्या ८५ व्या वर्षी निवडणुकीच्या रिंगणात असलेले चंद्रराव तावरे यांचे सर्व पॅनेल जवळपास पराभूत झाले मात्र लोकांनी अण्णांना स्वीकारले. समोर अजितदादा यांच्या पॅनेलचे तगडे आव्हान असतानाही अण्णा त्या वादळात विजयी झाले. सगळे उमेदवार पराभवाच्या छायेत असताना पहिल्या फेरीपासून चंद्रराव तावरे आघाडीवर होते हे या निवडणुकीचे वैशिष्ट्य आहे.. सर्व पॅनेलमध्ये वयाने सर्वात जास्त अगदीच वयोवृद्ध म्हणावे अशा चंद्रराव तावरेयांना लोकांनी कौल दिला ही एक महत्वपूर्ण घटना आहे..

या निवडणुकीत एका सभासदाला जवळपास वीस शिक्के मारायचे असतात अशा परिस्थितीत नेमके एकाच उमेदवाराचे नाव शोधून त्यांनाच मतदान देणे यातून या उमेदवाराबद्दल लोकांच्या मनातील आस्था, आपुलकी दिसते. संपूर्ण पॅनेलची धूळधाण झालेली असताना चंद्रराव तावरे यांच्या एकट्याच्या विजयाकडे असेच बघावे लागेल..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button