
मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी ईडीला दिलेल्या जबाबात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. कुंटे यांचा जबाब ७ डिसेंबरला ईडीनं नोंदवला होता. अनिल देशमुख पोलीस बदल्यांसाठी अनधिकृत याद्या पाठवायचे, असं कुंटे यांनी ईडीला दिलेल्या जबाबात म्हटल्याची माहिती कळतेय. कुंटे यांनी ईडीला दिलेल्या जबाबामुळं अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढू शकतात. अनिल देशमुख त्यांच्या माणासांकडून विशेषत: संजीव पलांडे त्यांच्या इतर व्यक्तीकडून यादी पाठवायचे, असं कुंटे यांनी ईडीला दिलेल्या जबाबात म्हटलं असल्याचं कळतंय.
माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर लावलेल्या १०० कोटींच्या कथित आरोपामुळे राज्यात बरीच चर्चा झाली. या प्रकरणाची ईडीकडून सखोल चौकशी सुरु आहे. त्यात कुंटे यांनी देशमुख प्रकरणी धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे. खुद्द गृहमंत्री अनिल देशमुख या याद्या पाठवत असल्याने मी त्यास नकार देऊ शकत नव्हतो असं कुंटे यांनी ईडीच्या चौकशीत म्हटलं आहे. त्यामुळे आता अनिल देशमुख यांच्यासमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे. अलीकडेच अनिल देशमुखांनी सचिन वाझेला ओळखत नसल्याचा दावा केला होता. तर या प्रकरणी परमबीर सिंह यांनी माघार घेतली आहे. तेव्हापासून देशमुख जामीन मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. मात्र आता सीताराम कुंटे यांच्या जबाबामुळे देशमुख यांच्याविरोधात ईडी काय पाऊल उचलणार हे पाहणं गरजेचे आहे.
आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख व त्यांच्या दोन मुलांवर ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्राची विशेष पीएमएलए न्यायालयाने शुक्रवारी दखल घेतली. आरोपपत्राची दखल घेतल्यावर विशेष न्यायालयाचे न्या. आर. एन. रोकडे यांनी आरोपींवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. डिसेंबर २०२१मध्ये ईडीने देशमुख व त्यांच्या मुलांवर ७००० पानी आरोपपत्र दाखल केले आहे. देशमुखांसह त्यांच्या दोन मुलांनाही ईडीने आरोपी केले आहे. त्यापूर्वी ईडीने १४ जणांवर आरोपपत्र दाखल केले होते. त्यामध्ये देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पालांडे व खासगी सहाय्यक कुंदन शिंदे यांचाही समावेश आहे.आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी ईडीने अनिल देशमुख यांना १ नोव्हेंबर २०२१ रोजी अटक केली. सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. भ्रष्टाचार व पदाचा गैरवापर केल्याचा आरोप करत सीबीआयने २१ एप्रिल २०२१ रोजी देशमुख यांच्यावर गुन्हा नोंदवला. त्यानंतर ईडीनेही त्यांच्यावर गुन्हा नोंदवला होता.




