Top Newsराजकारण

किरीट सोमय्यांनी चंद्रावर, मंगळावर जाऊन आमच्या जमिनी शोधाव्यात : संजय राऊत

मुंबई : भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांना कराड पोलिसांनी मंगळवारी पहाटे साडेचारच्या सुमारास ते कोल्हापूरकडे जात असताना ताब्यात घेतले. त्यानंतर, किरीट सोमय्यानी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना सवाल केला. तसेच, माझ्यावर स्थानबद्धतेची कारवाई सूडबुद्धीने केल्याचा आरोपही सोमैय्यांनी केला. आता, सोमय्यांच्या आरोपाला शिवसेनेनं उत्तर दिलंय.

अलिबाग आणि जरंडेश्वर येथेही उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांनी केलेल्या चुकीच्या व्यवहारांची माहिती घेण्यासाठी जाणार असल्याचं किरीट सोमय्यांनी म्हटलं होतं. त्यासंदर्भात, संजय राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर, सोमैय्यांनी चंद्रावर जाऊन, मंगळावर जाऊन आमच्या लोकांच्या जमिनी शोधाव्यात. या देशात लोकशाही आहे, देशात व्यक्तीस्वातंत्र्य आहे. आरोप कोणीही करू शकतं, आरोप करणाऱ्यांच्या तोंडाला टाळं लावता येत नाही. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असेल तर सरकारला कारवाई करावी लागते. त्यानुसारच, गृहमंत्रालयाने किरीट सोमय्यांवर कारवाई केल्याचे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय.

केंद्र सरकारच्या सूचनेनुसार एखाद्याला आरोप करायचेच असेल तर आम्ही काय करणार, आरोप कोणावर होत नाहीत, आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींवर होतात, अमित शहांवर होतात. भाजपशासित मुख्यमंत्र्यांवरही होतात. सध्या आरोप करणं ही फॅशन झालीय, असे म्हणत किरीट सोमय्यांच्या आरोपाला गंभीरतेनं घेण्याची गरज नसल्याचं राऊत यांनी म्हटलं आहे.

कारवाईशी सीएमओचा काही संबंध नाही

सोमय्या यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईशी मुख्यमंत्री कार्यालयाचा काडीचाही संबंध नाही. ही कारवाई गृहमंत्रालयाने केली आहे, असं विधान संजय राऊत यांनी केलं आहे. राऊत यांनी एकप्रकारे सोमय्यांवरील कारवाईचं खापर राष्ट्रवादीवर फोडल्याने तर्कवितर्क लढवले जात आहेत.

संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधत किरीट सोमय्यांवरील कारवाईशी मुख्यमंत्री कार्यालयाचा संबंध नसल्याचं वारंवार सांगण्याचा प्रयत्न केला. कालपासून जे काही घडतंय किंवा घडवलं जातंय त्यामागे केंद्र सरकार आहे. विरोधी पक्ष केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर, केंद्राच्या पाठबळावर राज्य अस्थिर आणि बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे. अशा प्रकारचे आरोप करून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करणं हा विरोधी पक्षांचा उपक्रम आहे. त्याला धंदा म्हणणार नाही, असं सांगतानाच आरोप करणाऱ्यांवर काल जी काही कारवाई झाली आहे. ती गृहमंत्रालयाने केलेली कारवाई आहे. त्यात आकस किंवा सूड या शब्दांचा वापर कोणी करू नये. मी सकाळी पूर्ण माहिती घेतली. गृहमंत्रालयाला कायदा आणि सुव्यवस्थेबाबत दोन्ही बाजूने काही प्रश्न निर्माण होतील असं वाटलं म्हणून ही कारवाई झाली. त्यात मुख्यमंत्र्यांवर आरोप करण्याचं कारण नाही. मुख्यमंत्र्यांनी ही कारवाई केली म्हणून त्याकडे पाहू नये. मुख्यमंत्री अशा लहान गोष्टीत पडत नाही. कोणी अशा प्रकारचे खोटेनाटे आरोप केले, बुडबुडे सोडले म्हणून आमच्या सरकारला भोकं पडत नाही हे आम्हाला माहीत आहे, असं राऊत म्हणाले.

आमचा रंग कोणता लवकर कळेल

शिवसेनेने भगवा सोडून हिरवा परिधान केला आहे, अशी टीका सोमय्या यांनी केली होती. त्यावरही त्यांनी पलटवार केला. त्यांना कळेल लवकर आमचा रंग कोणता आहे. कळेल. कायदेशीर कारवाई एखाद्यावर होते. तेव्हा रंगाचा प्रश्न कुठे येतो? या राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास रंग बघून कारवाई होत नाही. आमचा रंग कोणता आणि तुमचा रंग कोणता असं होत नाही. शिवसेनेवर असे आरोप करण्यापूर्वी आपले अंतरंग झाकून पाहावं, असा पलटवार त्यांनी केला.

केंद्रीय तपास दबाव आणून त्यांची संपत्ती जप्त करण्याची धमकी दाखवून राज्यात काही उलथापालथ करता येईल असं त्यांना वाटत असेल तर ते भ्रमात आहेत. आम्ही परिस्थितीचा सामना करू. आम्ही संकटाला सामोरे जाऊ, आम्ही संघर्ष करू. हसन मुश्रीफ यांनी आव्हान स्वीकारल्याने संघर्ष निर्माण झाला आहे. हे सरकार डरपोक नाही. आम्ही ठाकरे-पवारांच्या नेतृत्वात लढाई सुरूच ठेवू. आमच्यावर किती हल्ला करा, पाठित खंजीर खुपसा आम्ही झुकणार नाही, असं सांगतानाच केंद्रात अनेक मंत्री आहेत. त्यांच्यावर आरोप भाजपने केले होते. आज ते केंद्रात मंत्री आहेत. राज्यातही अनेक नेत्यांवर आरोप केले. त्यांना भाजपमध्ये घेतलं. ते हरिश्चंद्राची औलाद झाली. अनेकांचे नावे सांगू शकतो, असं ते म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button