मुक्तपीठ

साउंड सर्व्हिसवाला आणि वाघाचं कोकरू !

- मुकुंद परदेशी (संपर्क ७८७५० ७७७२८)

सकाळचे अकरा वाजले आहेत. नेहमीप्रमाणे ‘कृष्णकुंज’वर पहाटेच्या वातावरण निर्मितीसाठी कोंबड्याची रेकॉर्डेड बांग वाजविण्यात आली आहे. ती बांग ऐकून जागे झालेले चुलतराजे अंगाला आळोखेपिळोखे देत आपल्या शयनगृहातील मंचकावर बसले आहेत. बेड टी घेता घेता अचानक त्यांच्या मनात एक मिश्किल विचार डोकावतो. ते शेजारच्या टीपॉयवर ठेवलेला मोबाईल उचलतात आणि फोनबुकमधून, ‘औट घटकेचा राजा’ शोधून फोन लावतात. आपल्या बंधुराजांसाठी हे नाव सुचवणाऱ्या देवानाना नागपूरकरांचं क्षणभर त्यांना कौतुक वाटतं, पण दुसऱ्याच क्षणी त्यांच्या चुकलेल्या अंदाजाबद्दल त्यांची कीव येते. पलीकडून फोन उचलला गेल्यावर –

चुलतराजे – ( मिश्कीलपणे) मजा आहे बुवा एका माणसाची, या वयातही प्रेमपत्र येतात ! रात्री झोपला-विपलास की नाही, की नुसताच पत्र कुरवाळत बसला होतास रात्रभर ?

उधोजीराजे – (गंभीरपणे) अरे , कोणाला फोन लावायचा होता तुला ? चुकून मला लावलास वाटतं ! रात्रीची उतरली नाही ना, झोप डोळ्यांवरची, की होतं असं कधी कधी. ठेऊ का फोन ?

चुलतराजे – ( अडचणीच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत) कोणाला म्हणजे काय ? अहो, दिल्लीश्वरांचं प्रेमपत्र तुम्हालाच आलं आहे ना ? मग तुम्हालाच लावलाय फोन.

उधोजीराजे – ( मनातल्या गुदगुल्या लपवत ) आलंय खरं पत्र दिल्लीश्वरांचं , पण प्रेमपत्र नाहीये ते काही . प्रशस्तीपत्र आहे ते ! किंबहुना मी तर म्हणेन की , प्रेमाने ओथंबलेलं प्रशस्तीपत्र आहे ते ! आतापर्यंत दहा वेळा तरी वाचलं असेल मी ते.

चुलतराजे – ( टवाळीच्या सुरात ) म्हणजे ‘संकेत मिलनाचा’ की काय ?

उधोजीराजे – ( सावध होत) असलं प्रशस्तीपत्र मिळविण्यासाठी जीवतोड मेहनत करावी लागते. नुसतंच ‘खळ्ळखट्ट्याक’ करणाऱ्यांना नाही मिळत असली प्रशस्तीपत्र. जाऊ दे, तुला सांगून काय उपयोग ?

चुलतराजे – ( मिश्कीलपणे ) नुसतं एका पत्राने इतकं हुरळून जाऊ नका. त्या दिल्लीश्वरांना रोज सकाळी मोरांना दाणे टाकण्याची सवयच आहे . एखाद्या दिवशी नसतील दिसले मोर ; तर टाकले असतील तुम्हाला पत्रातून दाणे ! मागे नाही का तुमच्या मोठ्या साहेबांना त्यांच्या गावी जाऊन दाणे टाकले होते ? एकदा तर थेट दाणे दाखवत अहमदाबादपर्यंत पळवलं होतं ! आणि तुम्हाला बंद खोलीत खमण-ढोकला, जिलेबी हादडत टाकलेले दाणे विसरलात की काय इतक्या लवकर ?

उधोजीराजे – (शांतपणे) चालायचंच . तू नव्हता का गेला होतास अहमदाबादला, त्यांची विकास कामं पाहायला ? आणि तू नव्हंत का दिलं त्यांना न मागता प्रशस्तीपत्र ?

चुलतराजे – (संतापून) अरे, फसवलं होतं त्यांनी मला. सगळीच बनवाबनवी होती ती. नंतर लक्षात आलं माझ्या ते. ते असू दे, पण एक दिवस एकहाती सत्ता मिळविन तेव्हा कळेल सगळ्यांनाच.

उधोजीराजे – ( टवाळीच्या सुरात ) एकहाती सत्ता ? ती कशी असते बुवा ? सध्या तर ‘ एकपायी सत्ता’ मिळवायचे दिवस आहेत. आमच्या दीदींनी नाही का मिळविली तिकडे पश्चिम बंगालमध्ये , व्हीलचेअरवर बसून ‘एकपायी सत्ता’ !

चुलतराजे – ( संतापून) मला अशी नाटकं करणं नाही आवडत. सत्ता मिळविण्यासाठी कुठे हातपाय तोडून घ्यायचे ? माझी किंमत कळेल एक दिवस लोकांना. देतील मग एकहाती सत्ता मला.

उधोजीराजे – ( समजवणीच्यासुरात) हा जो तुझा स्वभाव आहे ना , त्याच्यामुळेच तू असा एकटा पडत चालला आहेस. सभेच्या ठिकाणी नुसतं तुला व्हिडीओ लावायला बोलवतात एखाद्या साउंड सर्व्हिसवाल्यासारखं , नंतर कोणी विचारत नाही तुला.

चुलतराजे -( संतापून) अरे, तीन रंगांच्या मेंढ्यांच्या कळपात वावरण्यापेक्षा मी जो एकटा पडलोय ना ते कितीतरी चांगलं आहे . आणि तू जे सभेत व्हिडीओ लावण्याबद्दल बोलतोय ना साफ चुकीचं आहे ते. अरे, दिल्लीश्वरांच्या विरुद्ध सभेत काय बोलावं हे सुचत नव्हतं कोणाला, म्हणून बोलवायचे मला ; बुद्धिमान म्हणून, जिगरबाज म्हणून. म्हणे साउंड सर्व्हिसवाला ! उद्या तुला कोणी वाघाचं कोकरू म्हटलं तर चालेल का ?

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button