मुक्तपीठ

अहो! आमदार गायकवाड गुडीपाडव्याला शिमगा नको !

- पुरुषोत्तम आवारे-पाटील

इंग्रजांच्या काळात बुलडाणा या शहराची थंड हवेचे ठिकाण अशी ओळख होती, मात्र या शहरातून आता राजकारणाच्या गरम हवेने जिल्हा होरपळून निघावा असे वातावरण तयार होत आहे. या शहराचे सेना आमदार संजय गायकवाड यांनी काल कोरोना रुग्णांच्या काळजीपोटी केलेली काही वक्तव्ये भाजपला जखमेवर मिरची पावडर झोंबावी अशी झोंबली. कोरोना विषाणू सापडला तर तो देवेंद्र फडणवीसांच्या तोंडात कोंबला असता या त्यांच्या वक्तव्याचे कोणत्याही पातळीवर समर्थन होऊ शकत नाही.

मूळ वक्तव्यावर माध्यमांना प्रतिक्रिया देताना आ. संजय गायकवाड आपल्या सहकारी आमदारांबाबत जे बोलले ते तर अधिकच गंभीर होते. लाखभर लोकांनी विधानसभेवर निवडून दिलेल्या आमदाराने कसे बोलू नये याचा गायकवाडांचे वक्तव्य उत्तम नमुना होते. कोणेएकेकाळी सहकारी असणार्‍या आपल्याच जिल्ह्यातील सहकार्‍यांबाबत बोलताना एवढी कटुता कशी निर्माण होऊ शकते असा प्रश्न कुणालाही पडू शकेल एवढी ही वक्तव्ये गंभीर आहेत.

संजय गायकवाड यांनी डॉ. संजय कुटे यांचा खालच्या भाषेत केलेला अपमान आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांवर अत्यंत शिवराळ भाषेत घेतलेले तोंडसुख कोरोना काळातल्या भयान शांततेला चिरडणारे ठरले आहे. सध्या वेळ कोणती आहे, लोकप्रतिनिधींनी मतदारसंघात प्राधान्य कशाला द्यायला हवे याची त्यांना उत्तम जाण असताना वादग्रस्त वक्तव्याने वाद निर्माण करण्याची गरज नव्हती. ज्यांच्याबाबत त्यांनी वक्तव्ये केलीत ते फडणवीस, पाटील, दरेकर हे राज्याचे त्यांच्या क्षेत्रातले मोठे नेते आहेत. त्यांच्या उणिवा शोधून त्यावर बोट ठेवण्यासाठी शिवसेना पक्षाने राज्य स्तरावर प्रवक्ते नेमले आहेत, त्यामुळे प्रदेश स्तरावरील नेत्यांना डिवचून त्यांच्याएवढी उंची गाठता येईल असे त्यांना वाटले असेल तर हे त्यांचे दिवास्वप्न आहे हे कुणीतरी समजावून सांगण्याची गरज आहे.

*कोरोना उपचार, रेमडेसिवीरचा अभाव, लसीकरण थांबणे यापैकी काही विषय केंद्र सरकारच्या अखत्यारीत नक्कीच आहेत, मात्र त्याची काळजी करण्यासाठीच जणू पक्षाने आपल्यावर भार टाकल्याचा साक्षात्कार कदाचित गायकवाड यांना झाल्याचे दिसते*. फडणवीस यांच्याबाबतचे हेच वक्तव्य त्यांनी विधिमंडळात केले असते तर त्याचे कदाचित वेगळे पडसाद उमटले असते. त्यानिमित्ताने सांसदीय भाषा आणि तिचा सार्वजनिक जीवनात केला जाणारा वापर यावर त्यांना पक्षातून सुद्धा नक्कीच धडे मिळण्याची संधी होती.

आ. संजय गायकवाड यांनी व्यक्त केलेल्या भावना आणि रुग्णांची काळजी यांच्याशी आम्ही अगदी शंभर टक्के सहमत आहोत. कोरोनाचे राजकारण करताना आघाडी सरकार बदनाम कसे होईल याची एकही संधी भाजप सोडत नाही हे मान्य करूनही गायकवाड यांनी वापरलेल्या पद्धतीशी सहमत होणे कठीण आहे.
राज्याच्या सर्वोच्च सभागृहातला जो व्यक्ती तुमचा सहकारी आहे त्या डॉ. संजय कुटे यांच्याबाबत बोलताना गायकवाड यांचा सुटलेला तोल स्पष्टपणे जाणवतो आहे. संजयराव तुम्ही सध्या राज्याच्या कायदे मंडळाचे सदस्य आहात, स्वच्छंदी छावाचे जिल्ह्याचे प्रमुख नाही याचे भान ठेवायला हवे. संजय गायकवाड यांचा आक्रमक स्वभाव आणि काम करण्याची पद्धत सर्वांना माहीत आहे. जिल्ह्यात कोरोनावर नियंत्रण मिळवताना कुचराई किंवा गैरप्रकार करणार्‍या कुणाच्या कानाखाली आवाज काढला असता तर एकवेळ त्यामागची तळमळ जनतेने समजून घेतली असती, परंतु राज्याचा विषय आडवळणाच्या बुलडाण्यात उपस्थित करून गायकवाड विचार करणार्‍या जनतेच्या रोषालाही कारण बनले आहेत.

माजी मंत्री डॉ. संजय कुटे यांनी याप्रकरणी दाखवलेले सामंजस्य सुद्धा कौतुकास्पद आहे. डॉ. कुटे अभ्यासू असण्यासोबतच आक्रमकपण आहेत. मात्र आक्रमकता कुठे, कोणत्या क्षणी वापरावी याचे उत्तम भान त्यांना असल्याचे याप्रकरणी दाखवून दिले आहे. त्यांनी या निमित्ताने जिल्ह्यातील संतप्त झालेल्या सर्व भाजप कार्यकर्त्यांना फेसबुक लाइव्हवरून जो संदेश प्रसारित केला, जे हितगुज केले, ते एखाद्या मुरब्बी राजकीय पुढार्‍याचा परिचय देण्यास पुरेसे आहे. शांत, संयमी असणे आणि आततायीपणा करणे यातला मूलभूत फरक या निमित्ताने भाजपने दाखवून दिला. त्याचे जाहीरपणे कौतुक करायला हवे. मात्र या संयमाचा गैरअर्थ काढून कुणी कुणाला षंढ समजण्याची चूक करू नये. या सूचक इशार्‍यातून डॉ. कुटे आणि एकूणच जिल्ह्यातील भाजपला काय संकेत द्यायचे आहेत याचाही अंदाज येतो हे लक्षात घ्यायला हवे.

हा जिल्हा शत्रूच्याही स्त्रियांचा मानमरातब ठेवण्याची छत्रपतींना शिकवण देणार्‍या राष्ट्रमाता जिजाऊंचा, मातृतीर्थ जिल्हा आहे. आजवर या मातृतीर्थाची आब सर्वच राजकीय पक्षांतील नेत्यांनी राखण्याची जिवापाड पराकाष्ठा केली आहे. त्याचे अनुसरण याहीपुढे व्हावी, अशी या जिल्ह्याची आपल्या लोकप्रतिनिधींकडून रास्त अपेक्षा आहे. कोरोनाच्या निमित्ताने चालती-बोलती माणसे काही तासात आपल्यातून पटापट निघून जाताना कोरोना निमित्त करून एकमेकांच्या मनात द्वेषाची जहरपेरणी व्हावी यासारखा कठीण प्रसंग दुसरा कोणताच नसतो, याचे भान दोन्ही बाजूंच्या पुढार्‍यांनी ठेवणे आवश्यक असताना असे प्रसंग घडताना हे वाईट आहे.

मारहाण करणे, कुणाचे हातपाय तोडणे यात ताकद लागत असली तरी पुरुषार्थ आणि समजूतदारपणा नसतो. हातपाय तोडायला काहीच नाही मात्र हातपाय जोडायला प्रचंड धैर्य आणि संयम लागतो. या संयम, सुसंस्कृतपणा याला कुणी भित्रा, नेभळटपणा समजण्याची चूक करू नये. निवडणुकांच्या माध्यमातून मिळणार्‍या पदांना काळाच्या मर्यादा असतात मात्र मानवतेचे मापदंड जे निर्माण करतात ते काळावर विजय प्राप्त करीत असतात. याच जिल्ह्याने भाई पंढरीनाथ पाटील, ताराबाई शिंदे, भाई के. आर. पाटील, युगपुरुष पुरुषोत्तम खेडेकर यांच्यासारखी मानवतावादी प्रेरणा जगाला दिल्या आहेत. मातृतीर्थ सगळ्याच बाबतीत ताठ मानेने उभा होता, आहे आणि राहील याची आठवण जुन्या छाव्यांनी ठेवावी एवढेच.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button