
गेल्या काही महिन्यांत अमेरिकामध्ये गोळीबार आणि हिंसाचाराच्या घटनांमध्ये तीव्र वाढ झाली आहे. आशियाई वंशाच्या लोकांवर हल्ले वाढले आहेत. गेल्या महिन्यात अटलांटा, फिनिक्ससह बर्याच ठिकाणी गोळीबारांच्या घटनांमध्ये अनेक लोक ठार झाले. आता पुन्हा एकदा गोळीबार करण्यात आला आहे. यात सात लोक जखमी झाले आहेत. तर एकाची प्रकृती चिंताजनक आहे. वाढत्या घटनांमुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
अमेरिकेच्या शिकागोच्या (Chicago) दक्षिणेकडील एंगलेवुड येथे गोळीबारात ७ जण जखमी झाले.ही घटना सोमवारी रात्री (१२ एप्रिल) अकराच्या सुमारास घडली. या गोळीबारात ३९ वर्षीय महिला गंभीर जखमी झाली असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विशेष म्हणजे गेल्या रविवारी (४ एप्रिल) शिकागोमध्ये इस्टर डेच्या दिवशी झालेल्या गोळीबारात कमीतकमी १० लोक जखमी झाले होते.
विशेष म्हणजे गेल्या काही महिन्यांत अमेरिकेत गोळीबार आणि हिंसाचाराच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. गेल्या महिन्यात मार्चमध्ये बर्याच शहरांमध्ये गोळीबाराच्या घटना घडल्या. अटलांटामधील तीन स्पा केंद्रांवर झालेल्या गोळीबाराच्या घटनेने खळबळ उडाली होती. या गोळीबारात ८ जणांचा मृत्यू झाला. मृत्यू झालेल्यांमध्ये ४ आशियाई वंशाच्या स्त्रियांचा समावेश होता. फिनिक्स शहरातील एका घराला लक्ष्य अंदाधुंद गोळीबार करण्याता आला आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी अमेरिकेच्या संसद भवनाच्या बाहेर एका संशयिताने हल्ला घडवून आणला होता. यावेळी संसदेच्या बाहेर असलेल्या दोन पोलीस जखमींपैकी एकाचा मृत्यू झाला आहे. तर दुसऱ्या पोलिसाचा मृत्यू रुग्णालयात झाला. या पोलिसांनी दोन हात करताना यात हल्ला करणारा संशयित कार चालक ठार झाला होता. पोलिसांच्या कारवाईत त्यालाही गोळ्या घालण्यात आल्या. संसद भवनाच्या बाहेर सुरक्षेचे बॅरिकेड तोडत कार चालकांने दोन पोलिस अधिकाऱ्यांना चिरडले. यानंतर सुरक्षेसाठी कॅपिटल आवारात बंदी घालण्यात आली आहे. कर्मचार्यांना आत किंवा बाहेरही पडण्याची परवानगी नाही.
लोकशाही आणि मानावाधिकाराच्या रक्षणाचा ठेका घेणाऱ्या अमेरिकेत मानवी अधिकाराची पायमल्ली कशी उघड पणे होत आहे याचे हे बोलके उदाहरण आहे.
अँटी डिफेमेशन लीग’ या संस्थेने अमेरिकेत वेगाने वाढणाऱ्या श्वेत वर्चस्ववादाच्या प्रचाराबाबत नुकताच एक अहवाल जारी केला. त्या अहवालानुसार अमेरिकेत २०२० मध्ये वर्णभेद, वंशभेद, ज्यूविरोध, इतर प्रकारच्या द्वेषाच्या सुमारे ५१२५ घटनांची नोंद झाली आहे. ही संख्या २०१९ च्या तुलनेत दुप्पट झाली. तेव्हा २७२४ घटना घडल्या होत्या. ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर हेट ग्रुपमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. त्यांना ट्रॅक करणे अतिशय कठीण आहे. २०२० मध्ये श्वेत वर्चस्ववादाचा प्रचार वाढला. अशा प्रकारचा उन्माद वाढण्याची ही या दशकातील पहिलीच वेळ आहे, असे या अहवालात नमूद केले आहे. आशियाई वंशाच्या लोकांनी गेल्या महिन्यात न्यूयॉर्कमध्ये समुदायावरील हल्ल्यांच्या निषेधार्थ तीव्र आंदोलन केले होते.
चिनींवर वांशिक हल्ल्यांच्या घटनांत १० टक्के वाढ
न्यूयॉर्कमध्ये मार्च ते डिसेंबर २०२० दरम्यान दक्षिण आशियातील लोकांवर तीन हजारांहून जास्त हल्ले झाले आहेत. न्यूयॉर्कमध्ये २०१९ च्या तुलनेत १० पटीने हल्ले वाढले. हे हल्ले बहुतेक वेळा चीन, तैवान व थायलंड वंशाच्या लोकांवर झाले. कोरोना वाढल्यानंतर आशिया वंशाच्या लोकांवरील हल्ल्यात वाढ होऊ शकते, असा इशारा एफबीआयने दिला होता. न्यूयॉर्क सिटीचे महापौर बिल डी. ब्लासियो म्हणाले, असे हल्ले स्थलांतरितांवरील अन्याय आहे.
पहिल्यांदाच एकट्याने बाहेर पडण्याची भीती वाटतेय..
न्यूयॉर्कच्या चायना टाऊनमध्ये स्पा शॉप चालवणाऱ्या ४७ वर्षीय लुइसा याँग म्हणाल्या, अशा प्रकारची दहशत आयुष्यात कधीही पाहिली नव्हती. पहिल्यांदाच मला न्यूयॉर्क शहरात एकट्याने बाहेर पडायला भीती वाटत आहे. माझ्यावर कोण आणि कधी हल्ला करेल याची मला कल्पना नाही. अमेरिकेत अशा प्रकारच्या ४० टक्के तक्रारी चिनी अमेरिकींनी नोंदवल्या आहेत. त्यानंतर १५ टक्के कोरियन व ८ टक्के फिलिपिनो अमेरिकन समुदायाच्या तक्रारी आहेत.
अमेरिकेत वर्णभेदविरोधी नागरी चळवळी झाल्या, पण अमेरिकन संस्थांनी मात्र समानतेचं स्पिरिट दाखवलेलं नाही. रोजच्या जीवनातील उघड आणि छुप्या हिंसांना अश्वेतवर्णीयांना तोंड द्यावं लागतं. खाजगी आणि सार्वजनिक संस्था आणि इतर व्यवस्थांमधून अमेरिकेच्या वर्णवर्चस्व अस्मिता प्रतीत होतात. बहुसंख्य आफ्रिकन वंशीयांच्या वस्त्या, शाळा आणि चर्च वेगळीच असतात.आता आशियाई समुदयावर होणारे हल्ले काय दर्शवतात..? बंदुकी द्वारे अमेरिकेत होणारा रक्तपात एका महामारी प्रमाणेच आहे.त्याला रोखण्यासाठी कठोर पाऊलं उचलण्याची गरज आहे.
अमेरिका असो की भारत- दोन्हीकडील लोकशाहीच्या वाटचालीत खरी धोंड आहे ती वंश, धर्म किंवा जातीच्या श्रेष्ठत्वाला कुरवाळत बसण्याच्या प्रवृत्तींची! दोन्ही देशांमध्ये इतरांविरुद्ध हिंसाचार करण्यास हीच प्रवृत्ती पाठबळ देते. अशा हिंसाचाराला जणू प्रतिकार किंवा बंड मानायचे, ही प्रेरणाही याच प्रवृत्तींतून मिळते. अमेरिकेतील वर्णवर्चस्ववादी प्रवृत्ती आणि भारतातील सध्याचे बहुसंख्याकवादी राजकारण यांत काहीएक फरक नाही. दोन्ही लोकशाहीपुढे हाच मोठा धोका आहे.




