मुक्तपीठ

पंढरपूरचा विजय; फडणवीसांच्या पथ्यावर!

- दीपक मोहिते

विधात्याचा खेळ किती अजब असतो बघा,नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीच्या प्रचारात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील देखील पावसात भिजले,पण विधात्याने मात्र त्यांना चांगलीच हुलकावणी दिली.आज त्यांच्यावर पंढरपुरात जल्लोष करण्याऐवजी बंगालमध्ये नाचायची पाळी आली आहे.

पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीत झालेला पराभव,हा महाविकास आघाडीला विचार करायला लावणारा आहे.तसेच गेल्या आठ महिन्यात घडलेल्या विविध घटनांचे पडसाद,या पोटनिवडणुकीत उमटले.सुशांत,कंगना,पूजा,मनसुख,वाझे,परमबीर,दोन मंत्र्यांचे राजीनामे,कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व सर्वसामान्य जनतेचे होत असलेले हाल,या सर्व घडामोडीमुळे जनता त्रस्त आहे.परिणामी मतदानयंत्रातून लोकांचा रोष व्यक्त झाला आहे.पाच राज्याच्या निवडणुकीत आसाम वगळता इतर राज्यात भाजपला फारसे यश न मिळाल्यामुळे महाविकास आघाडीला सध्या तरी जीवदान मिळाले आहे.अन्यथा राज्यात राष्ट्रपती राजवट लादण्याची केंद्र सरकारने पूर्ण तयारी केली होती.महाराष्ट्र व दिल्ली,या दोन्ही राज्यात कोरोनाची परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे.राज्य सरकारांना परिस्थिती हाताळण्यात अपयश आल्याचा ठपका ठेवून या दोन्ही राज्यात राष्ट्रपती राजवट लादण्याचा घाट घालण्यात आला होता.त्यामुळे कालपर्यंत विरोधी पक्ष नेते पोटनिवडणुकीनंतर या सरकारचा ” करेक्ट कार्यक्रम” करतो,असे वारंवार सांगत होते.परंतु आसाम वगळता इतर राज्यात भाजपला चमकदार कामगिरी करणे,शक्य झाले नाही.त्यामुळे महाविकास आघाडी सरकार आणखी काही काळ तग धरून राहील.

लोकांचा युतीला जनादेश असताना सेनेने काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसशी घरोबा करत आपल्या हातातोंडाशी आलेला घास काढून घेतल्यामुळे फडणवीस,हे सरकार पडत नाही,तोवर शांत बसणार नाहीत.”मी परत येईन”,हे जोवर प्रत्यक्षात उतरत नाही,तोवर फडणवीस आपल्या कारवाया सुरूच ठेवतील.त्यामुळे पंढरपुरचा विजय हा राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणारा ठरू शकतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button