मुक्तपीठ

कॉकटेल

- मुकुंद परदेशी (संपर्क ७८७५० ७७७२८)

काय गंमत असते बघा, रोज रात्री ‘ बसणाऱ्या’ मित्रांसोबत आमचा वाद व्हायचा तो ‘सिंगल डोस’ चांगला की ‘कॉकटेल’ चांगलं या विषयावर. मित्रमंडळी ‘सिंगल डोस’ची पुरस्कर्ती तर आम्ही ‘ कॉकटेल’चे पुरस्कर्ते !

(टीप – ऐन संस्कारक्षम वयात आम्ही ‘जानी राजकुमार’चेच हिंदी चित्रपट जास्त पाहिल्यामुळे आम्ही मराठीत बोलतांना स्वतःला ‘आम्ही’ आणि हिंदीत बोलतांना स्वतःला ‘ हम’ संबोधतो. संविधानिक इशारा -कृपया आमचे अनुकरण करण्याचा प्रयत्न कोणी करू नये. केविलवाणे व हास्यास्पद ठरण्याचा संभव अधिक आहे.) घरात हा विषय अजिबातच वर्ज्य , म्हणून बायकोचं मत म्हणजे ‘नोटा’. थोडक्यात हेही नको आणि तेही नको.आमच्या विचारांना घरात बाहेर सगळीकडेच विरोध ! ते तर आम्ही अनेक थोर पुरुषांची आत्मचरित्रे वाचलेली असल्यामुळे चांगल्या विचारांना सुरुवातीला सगळ्यांकडून विरोध होतोच होतो, हे आम्ही जाणून होतो. ( आणि आम्ही थोर आहोत, हेही आम्ही जाणून होतो.) त्याबरोबरच कल्पना आणि विचार चांगले असले की, कालांतराने ते लोकांना पटतात आणि त्यांना राजमान्यताही मिळते हेही आम्ही जाणून होतो ; आणि घडलेही तसेच. मिळाली ! राजमान्यता मिळाली !! ‘ कॉकटेल’ला राजमान्यता मिळाली !!! काय योगायोग असतो बघा. इतकी वर्षे आम्ही हिरहिरीने ज्या गोष्टीचा पुरस्कार करीत होतो, घरात बाहेर होणारा विरोध झुगारून जी गोष्ट अट्टाहासाने अंमलात आणत होतो , त्या गोष्टीला शेवटी भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थेने (आयसीएमआर) अगदी नेमका मुहूर्त साधून, गटारी अमावस्येच्या शुभ मुहूर्तावर (काही नतद्रष्ट आता हिला दीप -अमावस्या म्हणावे असं सांगू लागले आहेत. हा आमच्या हक्काचा एक ‘इव्हेंट’ हिरावून घेण्याचा डाव आहे आणि तो आम्ही कदापी यशस्वी होऊ देणार नाही. आमच्या या वाक्यातील त्वेष आणि गांभीर्य जाणून घेण्यासाठी जिज्ञासूंनी लोकमान्य टिळकांच्या, ‘ स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच.’ या आणि राणी लक्ष्मीबाई यांच्या, ‘ मेरी झासी नही दूंगी.’ या गर्जनांचा जरूर अभ्यास करावा.)मान्यता देऊन टाकली ! त्यांनी जाहीरच करून टाकलं की, ‘सिंगल डोसपेक्षा कॉकटेलचा परिणाम जास्त चांगला येतो.’ हेच तर आम्ही दररोज रात्री ‘बसल्यावर’ मित्रांच्या कानीकपाळी ओरडून सांगत होतो की, ‘अरे पामरांनो, नका रे त्या ‘सिंगल डोस’ मध्ये पैसे वाया घालवू. आपला पैसा घामाचा असतो, कष्टाचा असतो. खर्च होणाऱ्या पैशांपेक्षा जास्त परिणाम हवा असेल तर, शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवायची असेल तर ‘कॉकटेल’ला पर्याय नाही. नाही म्हणजे नाही. एकदा आयुर्विम्याला पर्याय सापडेल, पण ‘ कॉकटेल’ला पर्याय सापडायचा नाही !’ पण मित्रांना आम्ही म्हणजे , ‘ घर की मुर्गी दाल बराबर.’ ते कशाला आमचं बोलणं मनावर घेतील ? ( त्यांना तरी कसा दोष देणार , घरात बायको तरी दुसरं काय करते ?) आता बरं झालंं, सोनाराने कान टोचले.

जरा विचार करा, समाजात फक्त स्त्रियाच असल्या किंवा फक्त पुरुषच असले तर ? अहो, समाज काय की संसार काय, रंगतदार असण्यासाठी स्त्री- पुरुषाचं ‘ कॉकटेल’च लागतं. सुरुवातीला नवरा – बायकोचं ‘ कॉकटेल’ नंतर नवरा, बायको आणि मुलांचं ‘कॉकटेल’ असलं की संसार खरा रंगतदार होतो , आयुष्याला रंगत येते. नुसताच ‘ आपला हात जगन्नाथ.’ म्हणणाऱ्या ‘सिंगल डोस’ ब्रह्मचारी माणसाच्या आयुष्यात कसली आली आहे रंगत ?

अहो, आमचंच काय घेऊन बसलात , हल्ली सत्तासुंदरीलासुद्धा ‘सिंगल डोस’ मग तो अगदी १०५ एमएल(ए)चा असला तरी चालत नाही. तिला वश करण्यासाठीसुद्धा वेगवेगळ्या ब्रॅंडचे ५६ एमएल(ए) + ५४ एमएल(ए)+ ४४ एमएल(ए) असं एकूण १५४ एमएल(ए)चं ‘ कॉकटेल’च लागतं ! असलं ‘कॉकटेल रिचवणाऱ्याचा मग, ‘ये हाथ नही हतोड़ा है. ये ढाई किलो का हाथ जिसपर पड़ता है ना, उठता नही, उठ जाता है.’ असं म्हणणारा सनी देओल कधी होऊन जातो हे त्याचं त्यालाही कळत नाही आणि समोरच्यालाही कळत नाही की, हा गडी असं का वागतोय म्हणून ! सगळाच ‘कॉकटेल’चा परिणाम, दुसरं काय ? ‘ सिंगल डोस’ इतका कॉन्फिडन्स देऊच शकत नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button