इतर

रेखा जरे हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी बाळ बोठेला हैदराबादमध्ये अटक

अहमदनगर : यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा जरे (Rekha Jare Murder Case) यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ बोठे (Bal Bothe) याला अखेर पोलिसांनी अटक केली आहे. अहमदनगर पोलिसांनी शनिवारी पहाटे त्याला हैदराबादमधून ताब्यात घेतले. रेखा जरे यांच्या हत्येनंतर जवळपास साडेतीन महिन्यांपासून तो फरार होता.

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांची गाडी अहमदनगर जवळील जातेगावच्या घाटात अडवून धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली होती. 30 नोव्हेंबर रोजी नगर-पुणे महामार्गावर ही घटना घडली होती. यावेळी गाडीत बसलेल्या रुणाल याने मारेकऱ्यांना पाहिलं होतं. त्याच्याच मदतीने पोलिसांनी तातडीने 5 आरोपींना गजाआड केलं. मात्र, जेव्हा या आरोपींची चौकशी करण्यात आली, तेव्हा या हत्याकांडात शहरातील पत्रकार बाळ बोठे असल्याचं समोर आलं. बाळ बोठेने सुपारी देऊन हे हत्याकांड घडवून आणल्याचा जबाब या आरोपींनी दिला.

अहमदनगर पोलिसांनी तातडीने तपास करत रेखा जरेंच्या मारेकऱ्यासह 5 आरोपींना अटक केली. मात्र, या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार बाळासाहेब बोठे फरार होता. बाळ बोठेवर सुपारी, हत्या आणि विनयभंग अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. रेखा जरे यांच्या हत्येला तीन महिने उलटल्यानंतरही बाळ बोठेला पकडण्यात पोलिसांना अपयश आल्याने रेखा जरे यांचे कुटुंबीय आमरण उपोषणाला बसले होते.

या प्रकरणातील पाच आरोपींविरुद्ध पोलिसांनी पारनेर न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले आहे. रेखा जरे यांच्या हत्याकांड प्रकरणात मुख्य सूत्रधार असलेल्या बाळ बोठे याच्या विरोधात पारनेर येथील न्यायालयाने स्टँडिंग वॉरंट काढले होते. त्याविरोधात बोठेने जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. मात्र जिल्हा सत्र न्यायाधीश श्रीकांत आणेकर यांनी ही मागणी फेटाळून लावल्यामुळे बाळ बोठेविरोधात पुढील कारवाई करण्याचा पोलिसांचा मार्ग मोकळा झाला होता.

जरे यांच्या आईने आरोपीविरोधात फिर्याद दिली होती. त्यानंतर अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. जरे यांच्या मुलाने त्या आरोपींपैकी एकाचा फोटो काढला होता. त्यानुसार पोलिसांनी प्रथम दोन आरोपींना अटक केली आणि त्यांनी दिलेल्या माहितीनुसार आणखी तिघांना अटक केली गेली. ज्ञानेश्वर उर्फ गुडु शिवाजी शिंदे (श्रीरामपूर), फिरोज राजू शेख (राहूरी), आदित्य सुधाकर चोळके (कोल्हार बुद्रुक), सागर भिंगारदिवे आणि ऋषिकेश पवार (अहमदनगर) या पाच जणांना अटक करण्यात आली. त्यांच्या चौकशीनंतर असे समोर आले की एका वृत्तपत्राचा कार्यकारी संपादक असलेला बोठे याने जरे यांच्या हत्येची सुपारी दिली होती.

जरे याने अटकपूर्व जामीन मिळवण्याचा देखील प्रयत्न केला होती. पोलिसांनी त्याला फरार घोषित केले होते. पारनेरमधील न्यायालयाने त्याला फरार घोषित करून 9 एप्रिलपर्यंत न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. दरम्यान त्याला कुणीकुणी आश्रय दिला, कुणी त्याला मदत केली याचा शोध घेतला जात आहे.
बाळ बोठे शहरातील एका नामांकित वर्तमानपत्रात गुन्हेगारीचं वार्तांकन करत होता. त्यामुळे पोलिसांशी जवळचा संबंध आला. गुन्हेगारी विश्व कसं आहे? त्यातील खाचाखोचांची माहिती बाळा बोठेला मिळू लागली. हेच करता करता तो शोध पत्रकारितेकडे आला आणि गुन्हेगारी विश्वात शोध पत्रकारितेची धार त्याने आजमावली. त्यात जातेगावच्या घाटाच्या पायथ्याशी असलेल्या घाटवाडीत अवैधपणे गावठी दारु बनवणं सुरु असल्याचा त्याला समजलं. लेखणीच्या धारेचा वापर त्याने हे प्रकरण उघडकीस आणण्यासाठी केला. ही बातमी वर्तमानपत्रात छापून आली आणि जिल्ह्यात एकच खळबळ माजली. या अल्कोहोल निर्मितीत शहरातील अनेक नामांकित लोकांची नावं पुढे आली. इथूनच बाळ बोठे हिरो झाला.

हनी ट्रॅप आणि समझोता
गेल्या काही महिन्यांपूर्वी बोठे यांनी हनी ट्रॅपची मालिका वृत्तपत्रात सुरु केली होती. त्यातून अनेक मोठमोठ्या राजकीय, सामाजिक, व्यापारी व्यक्तींची नावे समोर आली होती. मात्र ही नावे छापताना त्या व्यक्तीचे नाव कोडमध्ये छापले जायचे, जेणेकरून त्या व्यक्तीपर्यंत हा संदेश पोहोचवला जाईल आणि नंतर समझोता करता येईल. मात्र प्रश्न असा निर्माण होतो की, यासंदर्भात बोठे याला याची माहिती कशी मिळत होती आणि यासंदर्भातील ते मालिका कसे छापत होते, त्यांचा तर या हत्याकांडात काही संबंध नाही ना, असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत.

पाच दिवसांपासून पोलिसांची सहा पथकं बोठेच्या हालचालींवर लक्ष ठेवून होती. महत्त्वाचं म्हणजे पोलिसांना माहिती होऊन नये म्हणून हॉटेलमधील रुमचा दरवाजा बाहेरून बंद करण्यात आला होता. अखेर शनिवारी पहाटे बोठे याला पोलिसांनी हैदराबादेत बेड्या ठोकल्या, अशी माहिती अहमदनगर पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी बोठे याच्यासह तिघांना तेथून ताब्यात घेतले. मदत करणाऱ्या आणखी तिघांची नावे पोलिसांना मिळाली असून त्यामध्ये एक महिलाही आहे.
बोठे याला घर भाड्याने मिळवून देणे, मोबाईल फोन उपलब्ध करून देणे, पैसे पुरविणे अशा प्रकारची मदत या संशयित आरोपींनी केल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे जरे यांच्या हत्या प्रकरणात आणखी कोणाचा समावेश आहे आणि नेमकी हत्या कोणत्या कारणासाठी केली याचा उलगडा करण्यात आता नगर पोलिसांना यश मिळणार आहे.

दरम्यान, न्यायालयाने बोठे याला फरार घोषित करत नऊ एप्रिलपर्यंत हजर होण्याचे आदेशदेखील दिले होते. मात्र तत्पूर्वीच नगर पोलिसांनी बोठेला बेड्या ठोकल्याने आता या हत्याकांडामागील नेमके प्रकरण समोर येण्यास मदत होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button