राजकारण

हरीश रावत यांच्यावर ‘जय श्री राम’च्या घोषणा देत चाकू हल्ल्याचा प्रयत्न

नवी दिल्ली : उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांच्या सुरक्षिततेत मोठी चूक झाली आहे. रावत काशीपूर येथील एका सभेत असताना एक व्यक्ती चाकू घेऊन थेट स्टेजवर पोहोचल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली. पण यावेळी स्टेजवर आणि आसपास उपस्थित असणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी वेळीच प्रसंगावधान दाखवल्याने मोठी जीवितहानी टळली आहे. तसेस हल्ला करणाऱ्या व्यक्तीने ‘जय श्री राम’च्या घोषणा दिल्या आहेत. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

माजी मुख्यमंत्री हरीश रावत एका कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आले होते. याठिकाणी जाहीर सभा संपल्यानंतर अचानक एक व्यक्ती चाकू घेऊन स्टेजवर चढला आणि एकच गोंधळ उडाला. मात्र, काँग्रेस कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी संबंधित व्यक्तीला स्टेजवरून खाली उतरवून त्याच्याकडील चाकू आपल्या ताब्यात घेतला आहे. तसेच आरोपीला पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, माजी मुख्यमंत्री हरीश रावत प्रमुख पाहुणे म्हणून काँग्रेसच्या सदस्यत्व मोहिमेत सहभागी होण्यासाठी आले होते. यावेळी भाषण संपल्यानंतर रावत स्टेजवरील आपल्या खुर्चीवर जाऊन बसले.

अचानक एक व्यक्ती स्टेजवर पोहोचला. स्टेजवर आल्यानंतर त्याने माईकवरून जय श्री रामच्या घोषणा दिल्या. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्याची अडवणूक करत माईक बंद केला. संतापलेल्या आरोपीने अचानक आपल्या जवळील चाकू काढला. तसेच जय श्री राम न बोलल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. यानंतर मंचावर एकच गोंधळ उडाला. दरम्यान काँग्रेस नेते प्रभात साहनी यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी संबंधित तरुणाला पकडून त्याच्याकडील चाकू ताब्यात घेतला. ही प्रशासनाची मोठी चूक असल्याचा आरोप काँग्रेसने केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button