राजकारण

नाशिक रोड प्रभाग समिती निवडणुकीत भाजपला गटबाजीचा फटका; शिवसेनेची बाजी

नाशिक : भाजप अंतर्गत संघर्षामुळे चुरशीच्या झालेल्या महापालिकेच्या नाशिकरोड प्रभाग समितीच्या निवडणुकीत शिवसेनेचे प्रशांत दिवे यांनी बाजी मारली आहे. भाजपचे विशाल संगमनेरे आणि डॉ सीमा ताजने गैरहजर राहिल्याने दिवे यांनी विजय मिळवला.

दरम्यान, पंचवटीत मच्छीन्द्र सानप आणि पूर्व प्रभाग समितीत डॉ. दीपाली कुलकर्णी या दोन ठिकाणी भाजपने बिनविरोध बाजी मारली. सिडकोत शिवसेनेच्या सुवर्णा मटाले तर सातपूरला मनसेचे योगेश शेवरे यांनी भाजपच्या मदतीने बिनविरोध निवडीवर शिक्कामोर्तब केले तर नाशिक पश्चिममध्ये भाजपची खेळी अयशस्वी ठरल्याने काँग्रेसच्या वत्सला खैरे बिनविरोध निवडून आल्या.

जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्या अध्यक्षतेखाली आज सायंकाळी झालेल्या नाशिकरोड प्रभाग समितीच्या निवडणुकीत समसमान मते असतानाही केवळ भाजपच्या गटबाजीचा फटका पक्षाला बसला. या प्रभागात भाजपकडून मीरा हंडागे आणि सुमन सातभाई यांनी अर्ज दाखल केले होते. पक्षाने मीरा हंडागे यांना उमेदवारी दिली होती. समसमान मतांमुळे चिठया फैसला करतील अशी शक्यता असताना भाजपचे दोन नगरसेवक गैरहजर असल्याने ९ विरूद्ध ११ मतांनी भाजप उमेदवाराचा पराभव केला.

दरम्यान, पंचवटी प्रभागात भाजपचे माजी आमदार बाळासाहेब सानप यांचे पुत्र मच्छिन्द्र सानप तसेच रुची कुंभारकर आणि पूनम सोनवणे यांनी अर्ज दाखल केले होते. भाजपचे बहुमत असल्याने विरोधकांनी अर्ज दाखल केले नव्हते. मात्र भाजपच्या आजी माजी आमदारांमध्ये उमेदवारीसाठी रस्सीखेच होती मात्र पक्षश्रेष्ठींनी सानप यांच्या पारड्यात वजन टाकल्याने मच्छिन्द्र सानप बिनविरोध विजयी झाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button