Top Newsराजकारण

नवाब मलिक यांना ३ मार्चपर्यंत ईडी कोठडी; राजीनामा न घेण्याचा महाविकास आघाडीचा निर्णय

मलिकांच्या अटकेनंतर भाजपशी दोन हात करण्यावर सरकार ठाम

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ३ मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे मलिक यांच्या अडचणी वाढल्या असल्याचं पाहायला मिळत आहे. नवाब मलिक यांना आज अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीकडून अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांची मेडिकल चाचणी झाल्यानंतर त्यांना कोर्टात हजर करण्यात आलं. जवळपास अडीच तासापेक्षा अधिक वेळ दोन्ही बाजूने युक्तीवाद पार पडल्यानंतर कोर्टाने नवाब मलिक यांना ८ दिवसांची कोठडी सुनावली आहे. दरम्यान, मलिक यांना घरचं जेवण घेण्याची परवागनी देण्यात आली आहे. दरम्यान, नवाब मलिक यांचा राजीनामा घेतला जाणार नसल्याचं मंत्री भुजबळ यांनी स्पष्ट केलंय. भुजबळ यांनी यावेळी भाजपवर जोरदार हल्ला चढवला आणि महाविकास आघाडीतील मंत्री, नेते आणि कार्यकर्त्यांकडून राज्यभरात आंदोलन पुकारलं जाणार असल्याची घोषणा केली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांना आज ईडीकडून अटक करण्यात आली आहे. मलिक यांच्या अटकेनंतर आता राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री, नेते आणि भाजप नेत्यांमध्ये जोरदार आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची महत्वाची बैठक पार पडली. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा निवासस्थानावरही महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत नवाब मलिक यांचा राजीनामा घेतला जाणार नसल्याचं मंत्री भुजबळ यांनी स्पष्ट केलंय.

इतकंच नाही तर आजच्या मलिकांवरील कारवाईनंतर महाविकास आघाडी आक्रमक भूमिका घेणार आहे. महाविकास आघाडीचे मंत्री आणि नेत्यांकडून भाजपविरोधात आंदोलन पुकारण्यात आलंय. ‘आता आम्ही सर्वजण बसलो होतो. आमी सर्वजण एकत्रितपणे कायदेशीररित्या जनतेत जाऊन मुकाबला करु. उद्या सकाळी १० वाजता मंत्रालयाशेजारी महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ आम्ही मंत्री निषेध म्हणून धरणं धरणार आहोत. तसंच परवापासून राज्यातील सर्व तालुका, जिल्हा, शहर पातळीवर शांतपणे मोर्चा आंदोलन, धरणं आम्ही करु, असा इशारा भुजबळांनी दिलाय.

राजीनाम्याचा आसुरी आनंद भाजपला होऊ देणार नाही

राजीनाम्याबाबत विचारलं असता भुजबळ यांनी मलिकांच्या राजीनाम्याबाबत स्पष्ट शब्दात नकार दिलाय. ‘राजीनामा देण्याचा प्रश्न उपस्थित होत नाही. त्यांच्यावर गुन्हा अद्याप सिद्ध झालेला नाही. नारायण राणेंनाही अटक झाली होती, मग त्यांना राजीनामा मागितला गेला होता का? ते दोषी आहेत म्हणून न्यायदेवतेसमोर सिद्ध होत नाही तोवर राजीनाम्याचा प्रश्न नाही. आमच्या दृष्टीने त्यांनी चूक केलेली नाही. दोष सिद्ध होत नाही तोपर्यंत राजीनाम्याची शिक्षा आम्ही तरी त्यांना देणार नाहीत. अनिल देशमुख, राठोड यांच्याबाबत जे झालं ते आता होणार नाही. राजीनाम्याचा आसूरी आनंद आम्ही भाजपला होऊ देणार नाही, असं भुजबळ म्हणाले.

भुजबळ पुढे म्हणाले की, मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे की आज पहाटे आमचे सहकारी नवाब मलिक यांच्या घरी ईडीचे लोक गेले. काही तपास केला आणि नंतर त्यांना घेऊन ते ईडी कार्यालयात गेले. त्यानंतर जी काही चौकशी करुन कोर्टात त्यांना उभं केलं. आपल्याला कल्पना आहे की त्यावर युक्तीवाद झाला. एकूण काय तर १९९२ सालचा एफआयआर, त्यावेळची घटना, १९९९ साली त्या जागेचं अ‍ॅग्रीमेंट आणि त्यानंतर १२ वर्षांनी पीएमएलएचा जन्म झाला. या तीस वर्षात नवाब मलिक यांचं नाव कुणीही कुठेही घेतलं नाही. पण आता मलिक हे सातत्याने भाजप विरोधात बोलतात किंवा जांच्यावर अन्याय होतो त्याबाबत ते निडरपणे बोलतात. तर त्यांचं तोंड बंद करण्यासाठी हा सर्व प्रकार आहे.

एफआयआर झाल्याशिवाय पीसीआर होत नाही म्हणून फेब्रुवारीमध्ये एक एफआयआर केला गेला. त्याचा संदर्भ घेऊन मलिकांना अटक केली आणि त्यांच्यावर आरोप केले गेले. मलिक यांनी हे आरोप फेटाळले आहेत. त्यातही सलीम पटेल म्हणून सांगतात त्यावर वकील देसाईंनी सांगितलं की तो सलीम फ्रुट वेगळा आहे. सलीम फ्रुटही वारला आणि हसिना पारकरही वारल्या. आता वडाची साल पिंपळाला वापरायची. दबाव निर्माण करायचा, यासाठी हा सर्व प्रकार सुरु आहे. हा प्रकार निषेधार्ह आहे. हे वागणं लोकशाही विरोधी आहे. जो बोलेल त्याचं तोंड बंद करण्याचा हा प्रकार आहे. हे लोकशाहीला अजिबात शोभा देणारं नाही, अशी जोरदार टीका भुजबळ यांनी भाजपवर केलीय.

‘ममता’ मार्गानं करणार भाजपचा मुकाबला

अनिल देशमुख गृहमंत्री असताना त्यांच्यावर गंभीर आरोप झाले. ईडीनं त्यांना अटक केली. त्यानंतर त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे मलिक यांच्यावरही मंत्रिपद सोडण्याची नामुष्की ओढवणार असल्याची शक्यता निर्माण झाली. मात्र मलिक यांच्या बाबतीत पक्षानं वेगळी भूमिका घेतली आहे. पक्ष त्यांच्या पाठिशी संपूर्ण ताकदीनिशी उभा राहणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

नवाब मलिक यांना झालेली अटक चुकीच्या पद्धतीनं झाली आहे. त्यामुळे त्यांचा राजीनामा घेण्याचा प्रश्नच येत नाही, अशी भूमिका राष्ट्रवादीनं घेतली आहे. काँग्रेसनंदेखील मलिक यांच्याशी पाठिशी उभं राहण्याचा निर्णय घेतला आहे. मलिक यांनी राजीनामा देऊ नये अशी भूमिका काँग्रेसनंदेखील घेतली आहे. मंत्रालयाशेजारी असलेल्या महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ तिन्ही पक्षांचे मंत्री, आमदार निषेध आंदोलन करणार आहेत.

गेल्या वर्षी पश्चिम बंगालमध्ये विधानसभेची निवडणूक झाली. त्याआधी सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या मंत्र्यांवर आरोप झाले. मात्र मुख्यमंत्री ममता बॅनर्जी त्यांच्या पाठिशी ठामपणे उभ्या राहिल्या. त्यांनी मंत्र्यांचे राजीनामे घेतले नाहीत. त्याचप्रमाणे मलिक यांचा राजीनामा घेतला जाणार नाही, अशी भूमिका राष्ट्रवादीनं घेतली आहे.

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांची अंडरवर्ल्ड कनेक्शन प्रकरणात चौकशी सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. काही दिवसांपूर्वी याप्रकरणात एनआयए आणि ईडीकडून मुंबईत संयुक्तपणे छापे टाकण्यात आले होते. कुख्यात गुंड दाऊदची दिवंगत बहीण हसीना पारकर हिच्याशी संबंधित मालमत्तांवरही छापे टाकण्यात आले होते. तसेच दाऊदचा भाऊ इकबाल कासकर यालाही ईडीने अटक केली होती. इकबाल कासकरच्या चौकशीत नवाब मलिक यांचे नाव पुढे आल्याचे समजते. त्यामुळे ईडीकडून नवाब मलिक यांची चौकशी होती असल्याचे समजते.

मला जबरदस्तीनं कोर्टात आणलं – नवाब मलिक

ईडीनं मला कोणतीही पूर्वकल्पना न देता पहाटे बळजबरीनं इथं आणलं आहे. माझ्याविरोधात कोणत्या अधिकाराखाली कारवाई केली जात आहे याची माहिती देखील देण्यात आलेली नाही, असं नवाब मलिक कोर्टासमोर म्हणाले आहेत.

पाठीमागून अफझलखानी वार सुरु; नवाब मलिकांचा राजीनामा घेऊ नका : राऊत

नवाब मलिकांचा राजीनामा घेऊ नये, असं मत शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी व्यक्त केलं आहे. संजय राऊत ट्विट करत म्हणाले की, महाविकास आघाडीशी समोरा- समोर लढता येत नसल्याने पाठीमागून अफझलखानी वार सुरू आहेत..चालू द्या. एक मंत्री कपट करून आत टाकला असे आनंदाचे भरते आले असेल तर येऊद्या. नवाब मलिक यांचा राजीनामा घेऊ नये.. लढत राहू आणि जिंकू, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तसेच कंस आणि रावण सुध्दा मारले गेले…हेच हिंदुत्व आहे, असंही राऊत यांनी म्हटलं आहे.

फडणवीसांनी फोडला होता बॉम्ब, मलिकांच्या अटकेनंतर भाजपनं दिला दाखला

नवाब मलिक यांनी क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात शाहरुख खानच्या मुलाच्या बचावासाठी पुढे येत भाजप नेत्यांवर हल्लाबोल केला होता. केंद्र सरकारवर आरोप करत ईडीसारख्या तपास यंत्रणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. यावेळी, मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यासह विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरही गंभीर आरोप केले होते. त्यास, फडणवीस यांनी त्यावेळीच पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तरही दिलं. तसेच, मलिक यांनी अंडरवर्ल्डशी संबंधित गुंडांकडून जमिन खरेदी केल्याचा आरोपही फडणवीस यांनी केला होता. मलिक यांच्या अटकेनंतर आता तो मुद्दा पुन्हा चर्चेला आला आहे.

मलिक यांच्या अटकेवर अद्याप देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडिया अकाऊंटवरुन कुठलिही प्रतिक्रिया दिली नाही. मात्र, त्यांनी मलिकांवर केलेल्या आरोपांमुळेच त्यांना ईडीने चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची चर्चा रंगली आहे. क्रूझवरील ड्रग्स पार्टीवरून एनसीबी विरुद्ध एनसीपी असा संघर्ष सुरू असताना भाजपमधील नेत्यांचे ड्रग्ज पेडलरशी संबंध असल्याचा आरोप करत अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता यांच्यावरच गंभीर आरोप केले होते. त्या आरोपांना फडणवीस दाम्पत्यानं प्रत्युत्तर दिलं होतं. त्यानंतर, फडणवीस आणि मलिक यांच्याच शाब्दीक युद्ध सुरू झालं. त्यावेळी, हायड्रोजन बॉम्ब फोडणार असल्याचं मलिक यांनी म्हटलं होतं. मात्र, दिवाळीआधी मलिक यांनी लवंगी लावली. दिवाळीनंतर मी बॉम्ब फोडेन, असा सूचक इशारा फडणवीसांनी दिला होता.

नवाब मलिक यांना अटक झाल्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांचं ते विधान चर्चेत आलं आहे. एका भाजप नेत्यानं फडणवीसांचं त्या विधानाची बातमी शेअर करत मलिक यांच्यावर निशाणा साधला आहे. बुलढाणा जिल्ह्याचे भाजपा अध्यक्ष आणि खामगांवचे आमदार आकाश फुंडकर यांनी हे ट्विट केलं आहे. त्यामध्ये, मंत्री नवाब मलिक यांनी ९३ च्या बॉम्बस्फोटातील दोषींशी व्यवहार केला होता’, असे फुंडकर यांनी म्हटलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button