महाराष्ट्रावर संकट कोसळल्यावर पंतप्रधान कुठे आहेत? काँग्रेसचा सवाल

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज काँग्रेसची महत्वाची बैठक पार पडली. त्यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर जोरदार निशाणा साधला. महाराष्ट्रात अतिवृष्टी आणि महापुरामुळे प्रचंड नुकसान झालं पण केंद्र सरकार मदतीसाठी धावून आलं नाही. मात्र आपत्ती काळात काँग्रेसनं मदतकार्याची परंपरा कायम ठेवल्याचं पाटील म्हणाले. यावेळी मुंबई काँग्रेसकडून पूरग्रस्त कोकणवासियांसाठी आजही गरजेच्या वस्तू असणारे ट्रक पाठवण्यात आले.
अतिवृष्टी व महापुराने महाराष्ट्राचे अतोनात नुकसान केले आहे परंतु या नैसर्गिक आपत्तीवेळी केंद्र सरकार महाराष्ट्राच्या मदतीला धावून आले नाही. अजूनही केंद्र सरकारची कुठलीही मदत महाराष्ट्राला मिळालेली नाही. एनडीआरफची मदतही मिळालेली नाही. महाराष्ट्रावर आपत्ती कोसळली असताना पंतप्रधान किंवा केंद्रीय गृहमंत्री यांनी पाहणीसुद्धा केली नाही हे दुर्दैवी आहे. महाराष्ट्र संकटात असताना पंतप्रधान व केंद्रीय गृहमंत्री कुठे होते? असा सवाल एच. के. पाटील यांनी विचारला. आजही मुंबई काँग्रेसच्या वतीने पूरग्रस्त कोकणवासीयांसाठी मदतीचे ट्रक पाठवण्यात आले. आपत्तीग्रस्तांना काँग्रेसने केलेल्या या मदतकार्याची दखल अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने घेतली असून संकटकाळात महाराष्ट्र काँग्रेस व मंबई काँग्रेसने उत्तम काम केल्याचे पाटील म्हणाले.




