राजकारण

अनिल देशमुख तुम्ही कायद्यापेक्षा मोठे नाही : अ‍ॅड. जयश्री पाटील

भाजपकडून देशमुखांच्या राजीनाम्याची मागणी

मुंबई : अनिल देशमुख तुम्ही गृहमंत्री असलात, तुमच्या हातात महाराष्ट्र पोलीस आहेत, त्यामुळे तुम्ही ही चौकशी योग्य प्रकारे करु शकत नाही. त्यामुळे कोर्टाने सीबीआयकडे प्राथमिक चौकशी दिली आहे. यामध्ये मलाही बोलावण्यास सांगितलं आहे. अनिल देशमुख ही मोघलाई नाही. या राज्यात तुमची ताकद चालत नाही, तर संविधानाचे राज्य चालते. तुम्ही कितीही धमक्या दिल्यात तरी मी मागे हटणार नाही. अनिल देशमुख (Anil Deshmukh) हे सामान्य नागरिक आणि उद्योजकांना धमकावून भ्रष्टाचार करु शकत नाहीत, अशी टीका वकील जयश्री पाटील (Jayshree Patil) यांनी केली.

मुंबई उच्च न्यायालयात सोमवारी बहुचर्चित परमबीर सिंग लेटरबॉम्ब प्रकरणावर सुनावणी झाली. जयश्री पाटील यांनी यासंदर्भात उच्च न्यायालयात याचिका केली होती. त्यावर सुनावणी करताना न्यायालयाने याप्रकरणाची चौकशी केंद्रीय गुन्हे अन्वेषण (सीबीआय) विभागामार्फत व्हावी, असे निर्देश दिले. यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना याचिकाकर्त्या जयश्री पाटील यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्लाबोल केला.

जयश्री पाटील म्हणाल्या की, आज मी खूप खुश आहे. उच्च न्यायालयाने माझ्या याचिकेवर हे प्रकरण सीबीआयकडे सोपवलं आहे. १५ दिवसात अहवाल द्यायचा आहे. भलेही देशमुख यांनी माझं नाव पोलीस डायरीत येऊ दिलं नाही. सरन्यायाधीशांनी म्हटलंय, यांचं नाव डायरीत का नाही, हे दबावतंत्र आहे. शरद पवारांकडून हा दबाव आणलाय. डायरेक्टर जनरल सीबीआय हे चौकशी करतील, आणि मला बोलावलं जावं असं कोर्टाने म्हटलं आहे. फक्त माझीच याचिका कोर्टाने ऐकली. कोर्टाने माझं खूप कौतुक केलं, कोणीतरी एक शूर आहे, जे समोर आले आहेत. एवढ्या मोठ्या १०० कोटीच्या प्रकरणात कोणी एक तरी शूर आहे जे समोर आले आहेत, असं कोर्ट म्हणालं. मी भारतमातेची बेटी, स्वातंत्र्यसैनिकाची मुलगी आहे, तुमच्याविरोधात उभी आहे.

भाजपकडून देशमुखांच्या राजीनाम्याची मागणी, तर काँग्रेसचं ‘वेट अँड वॉच’

परमबीर सिंग यांनी पोलीस आयुक्त पदावरुन हटवल्यानंतर आरोप केले आहेत. ते पदावर असताना आरोप केले असते तर त्याला वेगळं महत्व राहिलं असतं. सीबीआय चौकशी झाल्यानंतर सत्य बाहेर आल्यानंतर योग्य निर्णय घेण्यात येईल, असं मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांनी म्हटलं आहे. भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी मुंबई हायकोर्टाच्या निर्णयानंतर अनिल देशमुखांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button