अविनाश भोसलेंची ४० कोटींची मालमत्ता ‘ईडी’कडून जप्त

मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून सक्तवसूली संचलनालय अर्थात ईडीच्या रडारवर असलेले पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक अविनाश भोसले यांची ४० कोटी ३४ लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. ईडीने आतापर्यंत अविनाश भोसले यांच्यावर केलेली ही मोठी कारवाई मानली जात आहे. फेमा कायद्याअंतर्गत ईडीने भोसले यांची पुणे आणि नागपुरातील मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. विदेशी चलन प्रकरणात भोसले यांची दोन वेळा चौकशी झाली होती. चौकशीनंतर त्यांना सोडून देण्यात आलं होतं. या प्रकरणात त्यांच्या कुटुंबियांचीही चौकशी झाली होती. या संपूर्ण प्रकरणाता आता ईडीने भोसले यांची ४० कोटी ३४ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.
भोसले यांच्यावर ईडीने यापूर्वी फेमा कायद्यांतर्गत कारवाई करीत १ कोटी ८३ लाखांचा दंड केला होता. २००७ मध्ये अमेरिका आणि दुबई दौरा करुन भारतात येताना परकीय चलन आणि महागड्या वस्तू कस्टम ड्युटी न भरता चोरून आणल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली होती. त्यांचा पासपोर्टही जप्त करण्यात आला होता. यापूर्वी त्यांची मुंबईत चौकशी सुरू होती. आता पुण्यातल्या कार्यालयात ईडीने चौकशी सुरु केली आहे. २०१७ साली इन्कम टॅक्स विभागाने अविनाश भोसले यांच्या घरी छापा टाकल्यानंतर ते पुन्हा चर्चेत आले होते.
Enforcement Directorate (ED) seized assets worth Rs 40.34 crores belonging to businessman Avinash Bhosle & his family members for acquiring foreign securities of company Rochdale Associates Ltd, Dubai, which was held by Bhosle family in contravention of FEMA,1999
— ANI (@ANI) June 21, 2021
अविनाश भोसले यांनी दक्षिण मुंबईत एक डुप्लेक्स फ्लॅट खरेदी केला आहे. अविनाश भोसले यांच्या ‘एबी’ज रिअलकॉन एलएलपी या कंपनीने ही गुंतवणूक केली आहे. या फ्लॅटसाठी त्यांनी १०३ कोटी ८० लाख रुपये मोजले आहेत.




