Top Newsराजकारण

पुतळा विटंबनेवरुन उद्धव ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा ‘यु टर्न’ !

बेळगाव : बंगळुरूजवळ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना केल्याच्या घटनेचे तीव्र पडसाद शनिवारी सीमावर्ती जिल्ह्यात उमटले. संतप्त जमावाने कर्नाटकी वाहने व व्यावसायिकांची दुकाने लक्ष्य केली. दरम्यान, या घटनेला क्षुल्लक बाब म्हटल्याबद्दल कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांबद्दल तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. त्यानंतर, आता मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी यु टर्न घेतला. शिवाजी महाराज आणि संगोली रायन्ना हे दोन्ही आपल्या देशाचे आदर्श असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीही कडक शब्दात इशारा दिला होता.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना ही छोटी गोष्ट असून त्यामुळे दगडफेक करणे, शांतताभंग करणे चुकीचे असल्याचं संतापजनक विधान कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केले होते. त्यामुळे, महाराष्ट्रासह कर्नाटकातही याचे तीव्र पडसाद उमटले. मिरजेत शिवसेना कार्यकर्त्यांनी कर्नाटकातील वाहनांवर दगडफेक करीत दोन वाहनांची तोडफोड केली. राज्यभरातून या घटनेचा आणि मुख्यमंत्री बोम्मई यांच्या वक्तव्याचा विरोध करण्यात येत असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीही हा अनादर खपवून घेतला जाणार नाही, असे म्हटले आहे. आता, बोम्मई यांनी आपल्या विधानावरुन युटर्न घेतला आहे.

शिवाजी महाराज आणि संगोली रायन्ना हे दोन्ही स्वातंत्र्य सैनिक आणि आपले आदर्श आहेत. मी दोन्ही महापुरुषांचा आदर करतो अन् त्यांचे अनुकरण करतो. मात्र, काही समाजकंटकांडून भाषेच्या आधारावरुन समाजात तेढ निर्माण करण्याचं आणि तणावाचं वातावरण करण्यात येत आहे. तसेच, या घटनेसंबंधित कर्नाटकात आतापर्यंत ३० जणांना अटक करण्यात आल्याचंही बोम्मई यांनी सांगितलं.

कर्नाटकच्या बंगळुरुमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला. त्यानंतर मोठ्या प्रमाणात शिवभक्त रस्त्यावर उतरले आणि दगडफेक सुरु केले. बंगळुरुतील एका चौकातील पुतळा आहे. कानडी व्यावसायिकांचे दुकाने बंद करण्यास सांगितले. त्यानंतर याचे पडसाद राज्यभरात उमटले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button