राजकारण

फडणवीस, आशिष शेलारांची अमित शाहांसोबत दिल्लीत गोपनीय बैठक!

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीत गोपनीय भेट झाल्याची माहिती आहे. त्याआधी आशिष शेलार आणि अमित शाहांसोबत स्वतंत्र बैठक झाली आहे. आधी देवेंद्र फडणवीस त्यानंतर आशिष शेलार अमित शाह यांना भेटले. यानंतर आता उद्यापासून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील चार दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. भाजप नेत्यांच्या या बैठकांमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात अनेक चर्चा सुरु झाल्या आहेत. भाजप नेत्यांच्या अमित शाह यांच्या सोबतच्या स्वतंत्र बैठकांचा नेमका अर्थ काय? असा सवालही उपस्थित होत आहे.

भाजप नेत्यांची ही भेट लपवण्याचा खूप प्रयत्न केला गेला. भेटीची कोणतीही माहिती मीडियाला दिली नव्हती. मात्र देवेंद्र फडणवीस, त्यानंतर आशिष शेलार यांच्या स्वतंत्र भेटीमुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या ऑफिसकडून मात्र अशी कोणतीही भेट झाल्याचं नाकारण्यात येत आहे. देवेंद्र फडणवीस दिल्लील कधी गेले याची माहिती उपलब्ध नाही. मात्र फडणवीस दुपारी १.१५ वाजता मुंबईत दाखल झाल्याची माहिती आहे. भेट झाली आहे तर ती नाकारली का जात आहे? भेटीबाबत कमालीची गुप्तता का पाळली जात आहे? असे सवाल उपस्थित होत आहेत.

महाविकास आघाडी सरकार, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या मुद्द्यांवर ही भेट आहे का? मात्र या मुद्द्यांवर ही भेट असती तर स्वतंत्र भेटींची गरज काय? त्यामुळे भाजप नेत्यांच्या स्वतंत्र भेटींमुळे भाजपच्या अंतर्गत मुद्द्यांवर ही भेट असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button