साहित्य-कला

मराठी भाषा भवन उपकेंद्रासाठी सिडकोकडून भूखंडाचे राज्य सरकारकडे हस्तांतरण

नवी मुंबई : मराठी भाषा भवन उपकेंद्रासाठी सिडकोकडून भूखंडाचे राज्य शासनाकडे हस्तांतरण करण्यात आले. सिडको महामंडळाकडून मराठी भाषा भवन उपकेंद्राच्या उभारणीकरिता महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाला हा भूखंड देण्यात आला आहे. नवी मुंबईतील ऐरोली येथील भूखंडाचे १३ जुलै २०२१ रोजी मराठी भाषा विभाग मंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत व सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांच्या मार्गदर्शनाखाली या भूखंडाचे हस्तांतरण करण्यात आले. या वेळी सुभाष देसाई यांनी सदर भूखंडाची पाहणी केली.

मराठी भाषा भवन उपकेंद्राची इमारत ही बहुउद्देशीय सामायिक सुविधांनी युक्त असणार आहे. या इमारतीत ग्रंथालय, बैठकांसाठी बहुउद्देशीय सभागृह यांसह भाषाविषयक विविध उपक्रमांची कार्यालये व अध्यक्षांसाठी स्वतंत्र दालनांची व्यवस्था असणार आहे, अशी माहिती सुभाष देसाई, मंत्री, मराठी भाषा विभाग यांनी या प्रसंगी दिली. या प्रसंगी मिलिंद गवादे, सहसचिव, मराठी भाषा विभाग, एस. एस. पाटील, सहव्यवस्थापकीय संचालक सिडको, अनिल पवार, अप्पर जिल्हाधिकारी तथा महाव्यवस्थापक (वसाहत) सिडको, प्रिया रातांबे, जनसंपर्क अधिकारी, सिडको तथा सिडकोचे अन्य अधिकारी उपस्थित होते.

मराठी भाषा विकास आणि संवर्धनाकरिता कार्यरत असणाऱ्या भाषा संचलनालय, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ आणि राज्य मराठी विकास संस्था, या संस्थांची कार्यालये मुंबईमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. यामुळे ही सर्व कार्यालये एकाच ठिकाणी आणून त्यामध्ये एकसूत्रता निर्माण करण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने २०१६ मध्ये सिडकोकडे भूखंडाबाबत विचारणा केली होती.

सिडकोकडून ऐरोली येथील सेक्टर-१३ मधील भूखंड क्र. ६अ हा अंदाजे ३००० चौ. मी.चा भूखंड मराठी भाषा भवन उपकेंद्राकरिता निश्चित करण्यात येऊन दीर्घ मुदतीच्या भाडेपट्ट्याने या भूखंडाचा ताबा राज्य शासनाला देण्यात आलाय. त्याचप्रमाणे इमारतीची उभारणी करण्याची जबाबदारी शासनातर्फे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळास देण्यात आली आहे, अशी माहिती सुभाष देसाई यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button