साहित्य-कला

मराठी साहित्य संमेलनाच्या मुख्य मंडपाची उभारणी अंतिम टप्प्यात

नाशिक : साहित्य संमेलनानिमित्त नाशिक नगरी स्वारस्वतांच्या स्वागतासाठी सजू लागली आहे. सजावटीच्या उपक्रमात पालकसंस्था म्हणून महापालिकेनेदेखील आर्थिक मदतीसह प्रत्यक्ष सहभाग घेण्याचा निर्णय घेतला आहे. आडगाव येथील भुजबळ नॉलेज सिटी मध्ये मंडप उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. समिती प्रमुखांकडून सोपविलेल्या जबाबदारीवर अंतिम हात फिरविण्याचे काम आहे.

कुसुमाग्रजनगरी, भुजबळ नॉलेज सिटी, आडगाव येथे ३, ४ व ५ डिसेंबर रोजी ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. त्यासाठी विविध समित्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आमदार निधीतून लोकप्रतिनिधींनी प्रत्येकी १० लाख रुपये संमेलनासाठी दिले आहेत. नाशिक महापालिकेने २५ लाख रुपये दिले आहेत. महापालिकेमार्फत बसेस पुरविण्यासह विद्युत व्यवस्था, रस्ते दुरुस्ती आणि साहित्यिकांच्या निवासस्थानावर विद्युत रोषणाई केली जाणार आहे.

महापालिकेतर्फे शहरातील नामवंत साहित्यिकांच्या निवासस्थानावर विद्युत रोषणाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नाशिककरांनी साहित्य उत्सवाच्या दिवशी घरासमोर सडा, रांगोळी काढण्याबरोबरचं गुढ्या उभारून ‘माय मराठीचा’ असा उत्सव साजरा करण्याचे आवाहन आयुक्त कैलास जाधव यांनी केले.

‘नो व्हॅक्सिन, नो एण्ट्री’

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी कुसुमाग्रजनगरी सज्ज होत असून आता संमेलनावर कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हायरसचे सावट आहे. मात्र संमेलनातून कोरोनाचा प्रसार होऊ नये याकरीता ‘नो व्हॅक्सिन, नो एण्ट्री’ धोरण निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे संमेलनात येणार्‍यांना आता लस प्रमाणापत्र बंधनकारक राहणार आहे.

जगभरात दहशत निर्माण करणार्‍या ओमिक्रॉन या कोरोनाच्या नव्या विषाणूमुळे साहित्य संमेलनाचे काय होणार,याबाबत विविध प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले आहेत. एकीकडे साहित्य संमेलनाची तयारी जोरात सुरू आहे. भव्यदिव्य मंडप टाकण्यात येत आहेत. वाद-रुसवे फुगवे जोडीला आहेतच आहेत. मात्र, संमेलनाला अजूनही तीन दिवस आहेत. त्यातच कोरोनाच्या ओमिक्रॉन विषाणूने प्रशासनासह आयोजकांची चिंता वाढवली असून मुख्य सभामंडपाची आसन क्षमता १४ हजार आहे. ती नव्या नियमाप्रमाणे आता ७ हजार करण्यात आली आहे. यासोबतच आता संमेलनात येणार्‍यांना लस प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे आता ‘नो व्हॅक्सिन, नो एण्ट्री’ हे धोरण अवलंबविण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले. अद्याप लहान मुलांचे व्हॅक्सिन उपलब्ध नसल्याने बालकुमार मेळाव्यात बालकांना सहभागी होण्याबाबत कोणतेही निर्बंध नसतील. परंतु संमेलनात येणाऱ्या प्रत्येकाला किमान एक तरी लस घेणे क्रमप्राप्त असणार आहे अन्यथा संमेलस्थळी प्रवेश दिला जाणार नाही असेही जिल्हाधिकार्‍यांनी स्पष्ट केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button