दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिकेसाठी मितालीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाची घोषणा

नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या आगामी एकदिवसीय आणि टी-20 क्रिकेट सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय महिलांचा संघ भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने जाहीर केला आहे. एकदिवसीय सामन्यांसाठी मिताली राज कर्णधार असेल, तर टी-20 सामन्यांमध्ये हरमनप्रीत कौर कर्णधारपदाची धुरा सांभाळेल. दरम्यान, जलदगती गोलंदाज शिखा पांडेय हिची या वेळी संघात निवड झालेली नाही. तसंच विकेटकीपर तान्या भाटियालाही संघात स्थान मिळालेलं नाही.
कोविड-19मुळे भारतीय महिलांचे क्रिकेट सामने दीर्घ काळ झाले नव्हते. 8 मार्च 2020 रोजी टी-20 वर्ल्डकपचा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया या संघांदरम्यान झाला होता. त्यानंतर भारतीय महिला क्रिकेट संघ खेळलेला नाही. त्यामुळे आता वर्षभरानंतर या संघाची कामगिरी क्रिकेटरसिकांना पाहायला मिळणार आहे. या मालिकेत पाच एकदिवसीय, तर तीन टी-20 सामने होणार आहेत. हे सर्व सामने लखनौच्या (Lucknow) भारतरत्न श्री अटलबिहारी वाजपेयी एकना इंटरनॅशनल स्टेडियामवर होणार आहेत. कोविड-19च्या निर्बंधांमुळे हे सर्व सामने एकाच ठिकाणी होणार आहेत. पहिला एकदिवसीय सामना सात मार्चला होणार आहे. नंतरचे सामने 9, 12, 14 आणि 17 मार्चला होणार आहेत. टी-20 सामने 20, 21 आणि 23 मार्चला होणार आहेत.
एकदिवसीय सामन्यांसाठी संघ –
मिताली राज (कर्णधार), स्मृती मंधाना, जेमिया रॉड्रिग्ज, पूनम राऊत, प्रिया पुनिया, यस्तिका भाटिया, हरमनप्रीत कौर (उपकर्णधार), डी. हेमलता, दीप्ती शर्मा, सुषमा वर्मा (विकेट-कीपर), श्वेता वर्मा (विकेट-कीपर), राधा यादव, राजेश्वरी गायकवाड, झूलन गोस्वामी, मानसी जोशी, पूनम यादव, सी. प्रत्यूषा, मोनिका पटेल
टी-20 सामन्यांसाठी संघ –
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, जेमिया रॉड्रिग्ज, दीप्ती शर्मा, रिचा घोष, हरलीन देओल, सुषमा वर्मा (विकेट-कीपर), नुझात परवीन (विकेट-कीपर), आयुषी सोनी, अरुंधती रेड्डी, राधा यादव, राजेश्वरी गायकवाड, पूनम यादव, मानसी जोशी, मोनिका पटेल, सी. प्रत्यूषा, सिम्रन दिल बहादूर