मी आणि विवेक आम्ही एनबीटी लॉ कॉलेजपासूनचे सख्खे मित्र… प्रॅक्टिसही सोबतच सुरु केली… मी १९९४ पासून बाबूराव ठाकरे चषक स्पर्धेचे आयोजन करीत होतो. टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन आम्ही दोघांनी अनेक वर्षे एकत्रित केले आहे. मी १९९१ पासून ते २००५ पर्यंत नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या आयोजन कमिटीवर काम पाहिले आहे. या माध्यमातून मी जिल्हा पातळीवर तसेच राज्य, राष्ट्रीय आणि आतंरराष्ट्रीय सामन्यांचे यशस्वी नियोजन केले आहे. विविध सरकारी, निमसरकारी कर्मचाऱ्यांकरीता अंतर्गत क्रिकेट सामनेही आयोजित केले आहे. यात एमएसईबी, महानगरपालिका अशा सामन्यांचा सहभाग होता. या अनुभवाचा फायदा मला वकिलांचे सामने भरवताना आजही होतो आहे. मैदानांचे आरक्षण असो वा कमीत कमी मैदानात अधिकाधिक सामन्यांची सांगड घालण्याची जबाबदारी नेटकपेणाने निभावता येते. विवेकने क्रिकेटचीच आवड जपली असे नाही तर वकिली व्यवसायातही मैत्री जपली आहे. आमच्या प्रॅक्टिसच्या काळात आम्ही कुणीच फारसे श्रीमंत नव्हतो. ज्याला जशी कमाई होईल त्याने तसे एकमेकांना पैसेही शेअर करायचो. विवेकने या सगळ्याची जाणीव आजतागायत ठेवली आहे. आज त्याने सर्वार्थाने खूप कमावले आहे, पण त्याचे पाय जमिनीवर आहेत. त्याला मित्रांची कदर आजही तितकीच आहे. २०१३ पासून स्व. रामकृष्ण जगदाळे फाऊंडेशनच्या माध्यमातून विवेकने अनेक छोट्या मोठ्या स्पर्धांचे आयोजन स्वखर्चाने केले आहे. त्याच्या या क्रिकेट वेडापायी संगीता वहिनी आणि त्याच्यात रुसवे-फुगवेही होत आले आहेत. अनेकदा वहिनींची समजूत काढण्यासाठी आम्हालाही कसरत करावी लागली आहे. पण वहिनींनी आजवर विवेकची साथ दिलसे निभावली आहे. त्याला जसा हवा तसा बहरु दिला आहे… हे वहिनींचे कौतुकच मानावे लागेल. वकिलांच्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेची सुरुवात विवेकने केली. परगावच्या खेळांडूंना नाशिकमध्ये बोलावून मुक्कामी क्रिकेटची सुरुवातही त्यानेच केली. यामुळे संपर्क वाढले, मित्र परिवार मोठा झाला. आर्थिक नियोजन करणे आणि त्याकरीता अचूक निर्णय घेणे यात विवेकचा हातखंडा आहे. ती त्याची खासियत म्हणावी लागेल. मित्र म्हणून आम्ही नेहमीच एकमेकांचा सन्मान जपला आहे. व्यवसायातील चढ-उतार कधी मैत्रीत येवू दिले नाहीत. आमच्यात कधी मतभेद झाले, वाद झाले तरी ते १५ मिनिटांपेक्षा अधिक काळ टिकलेले नाहीत. पैसा आमच्या मैत्रीत कधीच आला आही. खिलाडूवृत्तीने मैत्री टिकवण्यासाठी विवेक नेहमीच तत्पर असतो. तो उत्तम आयोजक, संघटक, निर्णयक्षम आहे. नेतेपणाचे सर्व गुण त्याच्यात आहे. तो कोणालाही कधीही कमी लेखत नाही. हीच तर त्याच्या स्वभावाची आणि त्याला मिळणाऱ्या यशाची खासियत आहे.