पश्चिम बंगालच्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मिळणार १० लाखांपर्यंत कर्ज
कोलकाता : पश्चिम बंगाल सरकारने विद्यार्थ्यांसाठी स्टुडंट क्रेडिट कार्ड सुरू केले. या क्रेडिट कार्डच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना साधारण वार्षिक व्याज दरावर जास्तीत जास्त १० लाख रुपयांपर्यंत आता कर्ज घेता येणार आहे. तृणमूल काँग्रेसने आपल्या जाहिरनाम्यात हे आश्वासन दिलं होतं. त्यानंतर आता मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी स्टुडंट क्रेडिट कार्ड योजनेला मंजुरी देण्यात आल्याची माहिती दिली आहे. बंगालमधील विद्यार्थ्यांसाठी क्रेडिट कार्ड सुरू करण्यात आले असं ममता घोषणा करताना म्हणाल्या आहेत.
पश्चिम बंगालमधील तरुणांनी स्वावलंबी होण्यासाठी या योजनेत साधारण वार्षिक व्याज दरावर १० लाखांपर्यंतचे कर्ज दिले जाईल अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. हे कर्ज भारत किंवा परदेशात पदवीधर, पदव्युत्तर, डॉक्टरेट आणि पोस्ट-डॉक्टरेटच्या अभ्यासासाठी उपलब्ध असेल. याची सर्वात महत्वाची बाब म्हणजे नोकरी मिळाल्यानंतर विद्यार्थ्याला हे कर्ज परत करण्यासाठी १५ वर्षांचा वेळ दिला जाईल. ममता बॅनर्जींची ही घोषणा विद्यार्थ्यांसाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे.