आरोग्यशिक्षण

कोरोनामुळे वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा लांबणीवर

नाशिक : ओमायक्रोन विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत घेण्यात येणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या असून पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या परीक्षा आता येत्या १४ फेब्रुवारी २०२२ पासून घेण्यात येणार आहेत. या परीक्षा १७ जानेवारी २०२२ पासून सुरु होणार होत्या. तर पदवीच्या विद्यार्थ्यांच्या सर्व विद्याशाखांच्या परीक्षा ह्या दिनांक २८ फेब्रुवारी २०२२ पासून घेण्यात येणार आहेत. या परीक्षा ३१ जानेवारी २०२२ पासून सुरु होणार होत्या.

राज्यात ओमायक्रोन विषाणूचा प्रादुर्भाव अधिक झाल्यास महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातील संलग्न महाविद्यालयातील वैद्यकीय शिक्षक आणि विद्यार्थी यांची रुग्णसेवेसाठी गरज भासू शकते हे लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे प्रती कुलपती तथा वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीस विद्यापीठाच्या कुलगुरू, लेफ्टनंट जनरल (निवृत्त) डॉ. माधुरी कानिटकर, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव डॉ. सौरभ विजय, वैद्यकीय शिक्षण विभागाचे आयुक्त विरेंद्र सिंग, संचालक, डॉ. दिलीप म्हैसेकर, सहसंचालक, डॉ. अजय चंदनवाले, कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण, परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button