मनोरंजन

ज्येष्ठ रंगकर्मी संजीवनी काळे यांचे निधन

सोलापूर : ज्येष्ठ रंगकर्मी श्रीमती संजीवनी तथा माई काळे (वय ८८) यांचे बुधवारी सकाळी ८.३० वाजता निधन झाले. दुपारी ४ वाजता मोदी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. नाट्यकलावंत मंदार काळे यांच्या त्या मातोश्री होत.

दिवंगत संजीवनी काळे यांनी ललित कला मंदिर या संस्थेच्या अनेक नाटकांतून भूमिका केल्या, अनेक नाटकांचे दिग्दर्शन केले. त्यांच्या नाट्यक्षेत्रातील सुरुवात विवाहापूर्वी कल्याण येथे असताना एका पुरुष भूमिकेने झाली. ’माझा कुणा म्हणू मी’, ’चांदणे शिंपित जा’, ’दैवे लाभला चिंतामणी’, ’मोरूची मावशी’, ’शांतेचं कार्ट चालू आहे’ (घालीन लोटांगण), ’दिनूच्या सासूबाई राधाबाई’, ’पदरी पडलं पवित्र झालं’ अशा अनेक नाटकातून त्यांनी भूमिका केल्या. आरती हवालदार लिखित सोळा स्त्री पात्रे व फक्त दोन पुरुष पात्रे असलेलं ‘चांगुणा’ हे नाटक त्यांनी दिग्दर्शित करून विक्रम केला होता. पाठोपाठ ’नामा सातपुते’, ’दुबळा’, ’एक होती वाघीण’, ’47 एके 47’ या सारख्या नाटकांचे दिग्दर्शन व भूमिकाही त्यांनी केल्या.

डॉ. जब्बार पटेल यांच्या ‘उंबरठा’ व ‘सुबह’ या अनुक्रमे मराठी व हिंदी चित्रपटात त्यांनी भूमिका केल्या. ‘हे झाड जगावेगळे’ या पांडुरंग काळे यांच्या नाटकाचे हिंदी रूपांतर त्यांनी केले आहे. त्याशिवाय राष्ट्र सेविका समिती, भारत स्काऊट आणि गाईड, योगासन वर्ग, नंतरच्या काळात शालेय विद्यार्थ्यांना संस्कृत शिक्षण अशा माध्यमातून सामाजिक कार्यातही त्यांचा सहभाग होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button