मुंबई : लोकप्रिय चित्रपट दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या आगामी ‘नाय वरण भात लोन्चा कोण कोन्चा’ या चित्रपटातील काही आक्षेपार्ह दृष्यांमुळे चित्रपट चांगलाच चर्चेत आला. चित्रपटाचा ट्रेलर शनिवारी लाँच झाला त्यानंतर मोठ्या प्रमाणात चित्रपटावर आणि महेश मांजरेकर यांच्यावर टीका झाली. मात्र आता चित्रपटातील ती आक्षेपार्ह दृश्ये वगळण्यात आली असून चित्रपटाचा जुना ट्रेलर युट्यूब तसेच सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन काढून दिग्दर्शक महेश मांजरेकरांनी शरणागती पत्करली आहे.
सेन्सॉरने ‘ए’ सर्टिफिकेट दिल्यानंतरही जी दृश्ये संवेदनशील वाटतात आणि भविष्यात ज्याचा त्रास होऊ शकतो असे वाटते ती दृश्ये चित्रपटातून आम्ही वगळत आहोत असे त्यांनी म्हटले. चित्रपटाचा नवा ट्रेलर आम्ही लवकरच प्रदर्शित करू अशी माहिती चित्रपटाचे दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी दिली आहे. त्याचप्रमाणे चित्रपटाच्या माध्यातून कोणाच्याही भावना दुखवल्या असतील तर त्याबद्दल मनापासून दिलगिरी देखील व्यक्त करण्यात आली आहे.
‘नाय वरणभात लोन्चा कोण नाय कोन्चा’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर समाजातील बऱ्याच स्तरांतून वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रीय उमटल्या. हा चित्रपट १८ वर्षांवरील प्रेक्षकांसाठीच असल्याचे सेन्सॉर बोर्डाने याला ‘ए’ प्रमाणपत्र दिले आहे. ‘चित्रपटाच्या ट्रेलरमधील काही दृश्यांवर समाजातील काही घटकांनी आक्षेप घेता असला तरी कोणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा मुळीच हेतू नाही. चित्रपटातील ती आक्षेपार्ह दृश्य काढून टाकण्यात आली असल्याचे’ महेश मांजरेकरांनी म्हटले आहे. तसेच ‘नाय वरण भात लोन्चा कोण नाय कोन्चा’ या चित्रपटाचा जुना ट्रेलर ज्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात आला होता त्या सर्व ठिकाणांहून तो काढून टाकण्यात आला असून नवीन सुधारीत ट्रेलर लवकरच सर्वांना पाठवण्यात येत आहे. सर्व माध्यमांना देखील जुना प्रोमो त्वरित काढून नवीन ट्रेलर रिलीज करण्याच्या सूचनाही माध्यमांना देण्यात आल्याचे महेश मांजरेकरांनी म्हटले आहे.
महेश मांजरेकर यांनी या चित्रपटात स्वत:च्या फायद्यासाठी, कलेच्या नावाखाली गिरणी कामगार आणि त्यांच्या कुटुंबातील स्त्रियांचे विकृत चित्रीकरण केल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र ‘सिनेमाच्या निर्मिती संस्थेपासून लेखक – दिग्दर्शक, कलावंत आणि तंत्रज्ञ सर्व तमाम स्रियांचा मनापासून आदर करतो. समाजातील सर्व महिलांबद्दल आमच्या मनात आदराची भावना असून चित्रपटाच्या माध्यमातून कोणताही चुकीचा संदेश समाजापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हूतू नाही, असे मांजरेकरांनी म्हटले आहे.
‘नाय वरण भात लोन्चा कोन नाय कोन्चा’ या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये चित्रपट १८ वर्षांवरील प्रेक्षकांसाठी असल्याचे वारंवार सांगण्यात आले आहे. याविषयी मांजरेकर म्हणाले, १८ वर्षांखालील प्रेक्षकांनी हा चित्रपट पाहण्यासाठी येऊ नये याची आम्ही योग्य ती काळजी घेतली आहे. चित्रपटात दाखवण्यात आलेले वास्तव पाहण्यासाठी सक्षम असतील त्यातील दृश्यांचे गांभीर्य लक्षात घेऊ शकतात, यातील दाहकता सहन करु शकतात अशा प्रेक्षकांनीच हा चित्रपटा पहावा अशी विनंतीही आम्ही वेळोवेळी आम्ही केली. चित्रपट विषयाच्या दृष्टीने थोडासा जड असून सर्वसामान्य चित्रपटासारखा हा चित्रपट नाही असे आम्ही सांगत आलो आहोत, असे मांजरेकरांनी म्हटले आहे.
मुंबईतील तीन दशकांपूर्वी उद्भवलेली परिस्थिती आणि त्यातील दाहकता दाखवण्याचा प्रयत्न चित्रपटातून केला गेला आहे. तरीही काही गोष्टी काहींनी सहन करणे किंवा बघणे चुकीचे वाटत असेल त्यांच्यासाठी ही दृश्ये चित्रपटातून पूर्णपणे काढण्यात आली असून १८ वर्षावरील प्रेक्षकांना चित्रपटगृहात जाऊन बघण्याचे आणि चित्रपट पाहिल्यानंतर अभिप्राय कळवण्याचे आवाहन महेश मांजरेकरांनी केले आहे.