नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी गुरु गोविंद सिंगजी यांची जयंती अर्थात ‘गुरु पर्वा’निमित्त मोठी घोषणा केली आहे. आता दरवर्षी २६ डिसेंबरला ‘वीर बाल दिवस’ (वीर बालदिन) साजरा केला जाणार आहे. पंतप्रधानांच्या या निर्णयाकडे गुरु गोविंद सिंगजी यांच्या चार पुत्रांना (चार साहबजादे) श्रद्धांजली म्हणून पाहिले जात आहे.
पंतप्रधान मोदींनी या पार्श्वभूमीवर रविवारी ट्विट करत म्हणटले आहे की, गुरु गोविंद सिंग यांची जयंती, प्रकाश पर्वा निमित्त, मला हे सांगताना अत्यंत आनंद होत आहे की, आता भारत दर वर्षी २६ डिसेंबरला ‘वीर बाल दिवस’ साजरा करेल. गोविंद सिंगांच्या चार साहिबजाद्यांना हीच खरी श्रद्धांजली ठरेल.
Today, on the auspicious occasion of the Parkash Purab of Sri Guru Gobind Singh Ji, I am honoured to share that starting this year, 26th December shall be marked as ‘Veer Baal Diwas.’ This is a fitting tribute to the courage of the Sahibzades and their quest for justice.
— Narendra Modi (@narendramodi) January 9, 2022
पंतप्रधानांनी आपल्या ट्विटमध्ये पुढे लिहिले, ‘वीर बाल दिवस, हा तोच दिवस आहे, ज्या दिवशी साहिबजादे जोरावर सिंग आणि साहिबजादे फतेह सिंग यांनी या देशासाठी बलिदान दिले आणि त्यांना भिंतीत जिवंत चिनून मारण्यात आले होते. या दोन महान व्यक्तींनी इतर कोणताही धर्म स्वीकारण्याऐवजी मृत्यू स्वीकारला होता. पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, माता गुजरी देवी, श्री गुरु गोविंद सिंग आणि त्यांच्या चार साहिबजाद्यांचे शौर्य भारतातील कोट्यवधी लोकांना धैर्य देते. ही थोर माणसे अन्यायापुढे कधी झुकली नाहीत. आता लोकांनी त्यांच्याबद्दल अधिकाधिक जाणून घेण्याचा प्रयत्न करण्याची वेळ आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी प्रकाश पर्वानिमित्त १० वे शीख गुरु गोविंद सिंगजी यांना श्रद्धांजली अर्पण केली आणि म्हणाले की, त्यांचे जीवन आणि संदेश लाखो लोकांना शक्ती देते. एवढेच नाही, तर गुरु गोविंद सिंग यांची ३५०वी जयंती साजरी करण्याची संधी आपल्या सरकारला मिळाली याचा मला नेहमीच आनंद वाटत राहील, असेही मोदी यावेळी म्हणाले.