मुंबई : केंद्रीय गृह विभागाने उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराच्या परिसरात आढळलेल्या स्फोटकांनी भरलेल्या कारचा तपास केंद्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) सोपविला आहे. सोमवारी त्याबाबतचे आदेश मिळाल्यानंतर एनआयएच्या अधिकाऱ्यांनी फेर गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. दहशतवादी संघटनांकडून हे कृत्य करण्यात आल्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. २५ फेब्रुवारीला घडलेल्या या प्रकाराबाबत गावदेवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सुरुवातीला त्याचा तपास मुंबई गुन्हे अन्वेषण शाखेकडून, तर मागील तीन दिवसांपासून दहशतवादी विरोधी पथकाकडून (एटीएस) करण्यात येत होता.
दक्षिण मुंबईतील पेडर रोडवरील अभेद्य सुरक्षाव्यवस्था असलेल्या अंबानी यांच्या अँटिलिया बंगल्यापासून काही मीटर अंतरावर एक निनावी महिंद्रा स्कार्पिओ आढळून आली होती. त्यामध्ये जिलेटीनच्या २५ कांड्या व अंबानी कुटुंबियांसाठी धमकीचे पत्र सापडले होते. त्याचे गूढ उलगडण्यापूर्वीच आरोपींनी वापरलेल्या त्या स्कॉर्पिओचे मूळ मालक मनसुख हिरेन यांचा ५ मार्चला मुंब्रा येथील रेतीबंदर खाडीत संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळला. त्यांच्या कुटुंबियांनी दिलेल्या तक्रारीनुसार एटीएसने अनोळखी इसमावर हत्येचा गुन्हा दाखल केला.
अँटिलिया बंगल्याच्या परिसरातील कॅमेऱ्यातील सर्व सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. परिसरातील नागरिक, तसेच कारमध्ये सापडलेल्या बनावट नंबर प्लेट व अन्य कागदपत्रांचा छडा लावण्यात येत आहे. मात्र, त्यातून कोणतीही ठोस माहिती अद्याप पुढे आलेली नाही. त्यामुळे विरोधी पक्षांनी केलेल्या मागणीनुसार हा तपास केंद्रीय गृह विभागाने एनआयएच्या मुंबई विभागाकडे सोपविण्याचा निर्णय घेतला.