Top Newsराजकारण

भाजपच्या सत्तापिपासू वृत्तीमुळे देशाचं राजकारण नासलं !

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची शेलक्या भाषेत टीका; शिवसेनाप्रमुखांचे विचार सोडले नाहीत; मात्र पिढीप्रमाणे बदल स्वीकारला !

मुंबई: मी पुन्हा येईन म्हणायचं आणि यायचंच नाही हे वाईट आहे. त्यापेक्षा पुन्हा येईन न म्हणता येण्यात गंमत आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला. दैनिक लोकसत्तानं आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. केंद्र वि. राज्य संघर्ष, भाजपचं राजकारण, शिवसेनेची वाटचाल यावर ठाकरेंनी सविस्तर भाष्य केलं. दरम्यान, सत्ता मिळवा पण ती लोकशाहीच्या मार्गाने मिळवावी. सगळं काही मलाच पाहिजे, सत्तेचा दुरुपयोग करुन पुन्हा सत्ता मिळवण्याच्या वृत्तीमुळे देशाचं राजकारण नासवलं आहे. हा सत्तापिपासूपणा जो काही आहे त्यामुळे केंद्र आणि राज्यांचे संबंध बिघडत आहेत अशी टीकाही उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केली आहे.

यापुढे भाजपसोबत युती करणार का, असा प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारण्यात आला. आता ज्या दिशेनं भाजपची वाटचाल सुरू आहे, जे काही राजकारण चाललं आहे, त्यात काही सुधारणा होणार आहे का, असा सवाल ठाकरेंनी उपस्थित केला. भाजपसोबतची युती वैचारिक होती. एक वैचारिक पातळी होती. आता ती पातळी कुठेतरी पाताळात गेली आहे. त्यांना कोणासोबतही युती केली. त्यांचाच कित्ता मग आम्ही गिरवला, असं मुख्यमंत्री म्हणाले.

गेल्या आठवड्यात तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव मुंबईत येऊन गेले. त्यांच्यासोबत विविध विषयांवर चर्चा झाली. केंद्र विरुद्ध राज्य संघर्षावर आम्ही बोललो. पण त्यात कुठेही कोणाचा द्वेष नव्हता. कारण आमच्यासाठी देश महत्त्वाचा आहे. सगळे एकत्र आले तर पुढे काय ते बघू, असं मुख्यमंत्री म्हणाले. राज्याचं हित लक्षात घेऊन निर्णय घेतला. आता देशाच्या हितासाठी योग्य तो निर्णय घेऊ, असं सूचक विधान त्यांनी केलं.

भाजपच्या दृष्टीने महाराष्ट्र देशातला सगळ्यात सडका भाग !

बंगाल आणि महाराष्ट्र सोडला, तर या केंद्रीय यंत्रणांकडे यंत्रणाच नाही का? गुजरातमध्ये मोठा घोटाळा बाहेर पडला. आपल्याकडे चिमूटभर सापडलं तर केवढा गहजब केला जातो. महाराष्ट्राला बदनाम करायचं हे षडयंत्र आहे. तुम्ही महाराष्ट्राचा आधार म्हणून उपयोग का करत नाही. महाराष्ट्र जणूकाही देशातला सगळ्यात सडका भाग आहे अशा पद्धतीने राजकारण चाललंय, अशी टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केली आहे.

भाजपने देशाचं राजकारण नासवलं !

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, संधी प्रत्येकाला मिळते, त्या संधीचं सोनं करायचं का माती करायची, हे ज्याचं त्यानं बघायचं असतं. ३०० पेक्षा जास्त जागा मिळाल्या. त्या संधीची माती करायची असेल, तर तुम्ही कपाळकरंटे आहात. प्रत्येकाचे दिवस असतात. दिवस बदलतात. ते लवकर बदलतील यासाठी प्रयत्न करू नका. सत्ता मिळवा पण ती लोकशाहीच्या मार्गाने मिळवावी. सगळं काही मलाच पाहिजे, सत्तेचा दुरुपयोग करुन पुन्हा सत्ता मिळवण्याच्या वृत्तीमुळे देशाचं राजकारण नासवलं आहे. हा सत्तापिपासूपणा जो काही आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्यांचे संबंध बिघडत आहेत, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केली आहे.

आमच्यावर कुणी राजकारण लादलेलं नाही. माझीही आदित्यसारखी राजकारणात सुरुवात होत होती. मला बाळासाहेब म्हणाले होते की उद्धव एक लक्षात ठेव. तू माझा मुलगा आहेस म्हणून मी तुला शिवसैनिकांवर लादणार नाही. जनतेवर लादणार नाही. पण तू माझा मुलगा आहेस म्हणून मी तुला अडवणार देखील नाही, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं. आवाज तोच आहे त्यातला खणखणीत पणा तोच आहे. पण पिढीप्रमाणे थोडा बदल व्हायला हवा. मी शिवसेनाप्रमुखांचे विचार सोडले नाहीत, ते कधीच सोडणार नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

जनतेची सेवा करणारी आमची सहावी पिढी आहे. त्याच्या आधीही आमचे पूर्वच धोडपच्या किल्ल्याचे किल्लेदार होते असं म्हणतात. माझ्यावर टीका झाली की याला बाळासाहेबांसारखं बोलता येत नाही. मला नाहीच येत. मी भाषण करतो असं मला वाटत नाही. मला भाषण करताच येत नाही हे तुम्ही लोकांनीच ठरवून टाकलं हे बरंच झालं, असंही उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितलं.

उद्धव ठाकरे म्हणाले की, देशाच्या राजकारणाला एक चांगली दिशा मिळाली पाहिजे. आम्ही गंगा स्नान करुन पवित्र आणि इतर सर्व गटारातले ही वृत्ती वाईट आहे. सत्तेसाठी हिदुत्वाचा वापर करणे हे चुकीचं आहे.

भविष्यात भाजप आणि शिवसेना पुन्हा एकत्र येणार का या प्रश्नाचे उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, ज्या पद्धतीने आज भाजप चाललं आहे त्या पद्धतीने गेल्यास युती होणार नाही. भाजपने वैचारिक पातळी गमावली आहे. कुणीच कुणाला बांधिल नसतं.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सध्या तरी शिवसेना ही भाजपसोबत जाण्याची शक्यता नसल्याचं आपल्या उत्तरातून स्पष्ट केलं आहे. काही दिवसांत सरकार पडणार असं विरोधक म्हणायचे, पण आपण तीन वर्षे पूर्ण केल्याचं ते म्हणाले.

उद्धव ठाकरे भाजपला उद्देशून म्हणाले की, तुम्ही देश सांभाळा, आम्ही राज्य सांभाळतो. पण देश, राज्य आणि पालिकाही तुम्हालाच हवी आहे. मग आम्ही काय धुणी-भांडी करायची का? मी पुन्हा येईन असं म्हणून न येणं हे वाईट असल्याचा टोलाही उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांना लगावला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button