नवरा भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यात आरोपी आणि चित्राताई विचारतात नवा वसुली मंत्री कोण?
रुपाली चाकणकर यांचा जोरदार पलटवार

मुंबई : चित्राताईंचा नवरा स्वतः भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यात अडकलेला आरोपी असून त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे आणि ताई विचारत आहेत नवीन वसुली मंत्री कोण?, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांच्यावर पलटवार केला आहे.
अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर नवा वसुली मंत्री कोण?, असा सवाल चित्रा वाघ यांनी विचारला होता. तसेच एखादा चेहरा बदलल्याने महाविकासआघाडी सरकारचा भ्रष्ट हेतू बदलणार नाही, अशी टीकाही चित्रा वाघ यांनी केली होती. त्यांच्या याच प्रश्नाला चाकणकर यांनी जोरदार प्रत्त्युत्तर दिलं आहे. “चित्राताईंचा नवरा भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यात आणि ताई विचारतायत नवा वसुली मंत्री कोण?, चित्रा ताई भावनेच्या भरात इतकंही वाहून जाऊ नका की अंगलट आलं की परत ‘पवार साहेब माझ्या वडिलांसारखेच आहेत’ हे म्हणायची वेळ येईल, असा सल्ला देताना थोडा धीरज रखो , सब सच सामने आयेगा.!!”, असा गर्भित इशाराही चाकणकर यांनी चित्रा वाघ यांना दिला आहे.