
मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शुक्रवारी रात्री नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची सदिच्छा भेट घेतली. महाराष्ट्रात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या कार्यपद्धतीवर सत्ताधाऱ्यांकडून कडाडून टीका होत असतानाच ही भेट झाली आहे. या भेटीबाबतची अधिकृत माहिती राजभवनातूनच देण्यात आली आहे. पण भेटीमागचे नेमके कारण मात्र स्पष्ट होऊ शकले नाही. ही भेट केवळ सदिच्छा भेट होती असे राजभवनातून सांगण्यात आले आहे.
राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यापासून १२ नामनिर्देशित आमदारांच्या नियुक्तीवरुन राज्य सरकार आणि राज्यपालांमध्ये सुरु असलेल्या वादाचा नवा अंक आता पाहायला मिळू शकतो. कारण, मुंबई हायकोर्टाने १२ आमदारांच्या जागा अनिश्चित काळासाठी रिक्त ठेवता येणार नाहीत, असे शुक्रवारी स्पष्ट केले होते. त्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी तातडीने दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. ही केवळ सदिच्छा भेट असल्याचे सांगण्यात येत असले तरी या भेटीदरम्यान १२ आमदारांच्या मुद्द्यावर चर्चा झाल्याची शक्यता नाकारता येत नाही.
सध्या भाजपमध्ये पक्षीय स्तरावर अनेक महत्त्वाच्या घडामोडी सुरु आहेत. काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्रातील प्रमुख भाजप नेते दिल्लीत आले होते. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील खासदार आणि नवनिर्वाचित मंत्र्यांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या. यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान भाजप नेत्यांनी महाराष्ट्राच्यादृष्टीने नवी रणनीती आखण्यात आल्याची चर्चा आहे.
राज्यपालांच्या अधिकाराबाबत आम्ही काही गोष्टी विचारात घेतल्या आहेत. जर काही गोष्टी विशिष्ट कारणांसाठी होत असतील तर त्याची कारणमीमांसा होणं गरजेचं आहे. सुव्यवस्थेसाठी मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांच्यात समन्वय असायला हवा. अशाप्रकरे नामनिर्देशित जागा अनिश्चित काळासाठी रिकाम्या ठेवता येणार नाहीत, असे हायकोर्टाने नमूद केले. राज्यपाल महोदयांनी मुख्यमंत्र्यांना उत्तर द्यायला हवं. ते कधीपर्यंत द्यावे हे त्या परिस्थितीवर अवलंबून आहे. राज्यपाल कुणालाही उत्तर देण्यास बांधिल नाहीत. त्यामुळे त्यांना न्यायालयंही निर्देश देऊ शकत नाही. मात्र, परिस्थिती आणि जबाबदारीचं भान ठेवत याबाबत लवकरात लवकर निर्णय द्यायला हवा, असं सांगत हायकोर्टाने ही याचिका निकाली काढली आहे.




