दिल्लीच्या सीमेवर होणार कृषी कायद्याच्या प्रतींची होळी

नवी दिल्ली : आज २८ मार्च असून संपूर्ण देशात होळी सण साजरा केला जात आहे. या निमित्ताने दिल्लीच्या सीमेवर होलिका दहन करण्यात येणार आहे. या होलिका दहनाच्या कार्यक्रमात शेतकऱ्यांच्या वतीने केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याच्या कॉपी जाळण्यात येणार आहेत. गाझीपूर सीमेवर या आंदोलनाचे नेतृत्व करणारे भारतीय किसान यूनियनचे राष्ट्रीय प्रवक्ता राकेश टिकेत यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र सरकारच्या कृषी कायद्याच्या प्रती जाळण्याचा कार्यक्रम होणार आहे. आज टिकरी बॉर्डरवर शेतकऱ्यांनी होलिका दहनाचा कार्यक्रम ठेवला असून त्यामध्ये केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याच्या प्रती जाळण्यात येणार आहेत. त्यातून केंद्र सरकारला एक प्रतिकात्मक संदेश देण्यात येणार आहे.
नवीन कृषी कायद्यांच्या निषेधार्थ सुरू असलेले शेतकरी आंदोलन अद्याप काही थांबायचे चिन्ह नाही. शेतकरी आंदोलनाला ४ महिने झाले असून आज आंदोलनाचा १२२ वा दिवस आहे. यावेळी शेतकऱ्यांनी पुकारलेल्या बंदचा फारसा परिणाम दिसून आला नाही. आंदोलनकर्त्यांनी रस्ता व रेल्वे मार्ग अडविण्याचा आग्रह धरला, पण तो तितका यशस्वी झाल्याचे दिसले नाही. या बंदला पाठिंबा देण्यासाठी कोणतीही व्यापारी संघटना पुढे सरसावल्या नाही. असे असले तरी केंद्र सरकारने हे कायदे मागे घेतल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही असे शेतकरी नेत्यांनी स्पष्ट केले आहे.
गेल्या चार महिन्यापासून शेतकऱ्यांचं हे आंदोलन सुरु असून केंद्र सरकारने कृषी कायदे मागे घेतल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही, असे स्पष्ट केले आहे. याच पार्श्वभूमीवर या शेतकऱी आंदोलकांनी होळी हा सण साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. तर यावेळी ते एकमेकांनी मातीचा टिळा लावण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले जात आहे. तसेच या आंदोलनावेळी ज्यांनी आपला प्राण गमावला त्यांना श्रद्धांजली देखील देण्यात येणार आहे.