यूपीएससीचे निकाल जाहीर; महाराष्ट्राची मृणाली जोशी देशात ३६ वी
नवी दिल्ली : भारतीय प्रशासकीय सेवा, भारतीय पोलीस सेवा अशा अनेक देशपातळीवरच्या परीक्षांसाठी अधिकाऱ्यांची निवड करणाऱ्या यूपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेमध्ये शुभम कुमार देशात पहिला आला आहे. एकूण ७६१ उमेदवारांची यादी यूपीएससीकडून जाहीर करण्यात आली आहे. भोपाळच्या जागृती अवस्थीनं दुसरा क्रमांक पटकावला आहे. तर अंकिता जैननं तिसरा क्रमांक पटकावला आहे. मुलींमध्ये जागृती देशात पहिली आली आहे. २४ वर्षीय जागृतीनं इंजिनिअरिंग केलं आहे. महाराष्ट्राची मृणाली जोशी देशात ३६ वी आली असून विनायक नरवदे देशात ३७ वा आला आहे. ९५ व्या क्रमांकावर विनायक महामुनी आहे.
यूपीएससीकडून २०२० मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. यूपीएससीची वेबसाईट upsc.gov.in वर हे निकाल पाहता येणार आहेत. नियमाप्रमाणे वेबसाईटवर आत्ता फक्त निकाल पाहता येणार असून सविस्तर गुणपत्र १५ दिवसांत संकेस्थळावरच अपलोड केलं जाईल.
एकूण ७६१ उमेदवार उत्तीर्ण झाले असून त्यापैकी २६३ उमेदवार हे खुल्या प्रवर्गातील आहेत. ८६ उमेदवार मागासवर्गातील, २२९ ओबीसी, १२२ अनुसूचित जाती तर ६१ अनुसूचित जमाती प्रवर्गातील आहेत. याशिवाय १५० उमेदवार रिझर्व्ह यादीमध्ये आहेत. त्यामध्ये १५ आर्थिकदृष्ट्या मागास वर्गातील, ५५ ओबीसी, ५ अनुसूचित जाती तर एक उमेदवार अनुसूचित जमातीमधील आहे.
‘ट्रक दे इंडिया’ या बेस्टसेलर पुस्तकाचा लेखक रजत उभायकरचं मोठं यश
शुभम कुमार यूपीएससी परीक्षेत अव्वल आला आहे. यूपीएससीच्या निकालानुसार, नागरी सेवा परीक्षेत जागृती अवस्थी आणि अंकिता जैन यांनी अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक मिळवला आहे. यात ट्रक दे इंडिया या बेस्टसेलर पुस्तकाचा लेखक आणि पत्रकार रजत उभायकर यानेही घवघवीत यश मिळवलं आहे.
रजत यूपीएससी परीक्षेत ४९ व्या रँकने उत्तीर्ण झालाय. गेल्या वर्षी त्याची ३४८ वी रँक होती. सातारा सैनिक स्कूलचा विद्यार्थी आहे. रजत उभायकर ट्रक दे इंडिया या बेस्टसेलर पुस्तकाचा लेखक आणि आऊटलूक इंडियाचा वरीष्ठ प्रतिनिधीही आहे.
टॉपर शुभम कुमारने आयआयटी बॉम्बे मधून बी टेक (सिव्हिल इंजिनिअरिंग) केले आहे आणि तो बिहारच्या कटिहारचे आहेत. जागृती अवस्थीने भोपाळमधून B Tech (इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग) केले आहे.
निकाल कसा पाहावा ?
♦ सर्वात अगोदर upsc.gov.in या वेबसाईटवर जा
♦ वेबसाईटवर जाऊन निकालाच्या लिंकवर क्लिक करा
♦ तुमच्यासमोर एक पीडीएफ येईल
♦ यामध्ये तुमचा रोल नंबर तसेच नाव सर्च करा
♦ जर तुमचे नाव आणि रोल नंबर यामध्ये असेल तर तुम्ही उत्तीर्ण आहात.
♦ हे पीडीएफ डाऊनलोड करुन सेव्ह करा