मुंबई : राज्यभरात आजपासून बालवाडी ते इयत्ता बारावी पर्यंतच्या शाळा सुरु झाल्या आहेत. राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या दररोज वाढताना दिसत आहे. त्यामुळे पालकांमध्ये काहीशी धाकधूक आहे. चार दिवसांपूर्वी राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेऊन या संदर्भात माहिती दिली होती.
पहिली ते बारावीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. शाळा सुरू करण्याच्या संदर्भात एसओपी (मार्गदर्शक सूचना) दिल्या आहेत त्याचे पालन करुनच शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. शाळा सुरू करण्याच्या संदर्भातील सर्व निर्णय आम्ही स्थानिक प्रशासनाला दिले आहेत. पहिली ते बारावी आणि शिशू वर्ग सुरू करण्यासही मान्यता आहे.
शाळा सुरू करत असताना संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेऊन आणि काळजी घेऊनच शाळा सुरू करण्यात याव्यात. ज्या विद्यार्थ्यांचे पालक शाळेत विद्यार्थ्यांना पाठवण्यास संमती देतील असे विद्यार्थी शाळेत येतील. शिक्षण कुणाचंही थांबू नये अशी आमचा प्रयत्न आहे असंही शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे.
राज्यात आजपासून शाळा सुरु होत असल्याने आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सर्व पालकांना मुलांना शाळेत पाठवण्याची विनंती केली आहे. जगभरातील शाळांचा अभ्यास केल्यानंतरच सरकारने शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या.
सर्वच शाळा सुरु कराव्यात अशाच सुचना आहेत. पण ज्या जिलह्यांमध्ये अतिशय जास्त पॉझिटिव्ही रेट असेल त्या ठिकाणी स्थानिक प्रशासन आणि पालकमंत्र्यांनी निर्णय घ्यावा, असं ठरविण्यात आलं आहे. प्रशासनाने ठरवणं योग्य राहील. शाळा सुरु झाल्यानंतर कोरोनाचे सर्व नियम पाळावेत. मुलांकडे अधिक बारकाईने लक्ष दिलं पाहिजे. कुणी विद्यार्थी थोडासाजरी लक्षणे असलेला आढळला तर त्याच्याकडे लक्ष ठेवून त्याची पटकन तपासणी झाली पाहिजे. एखाद्या शाळेतला मुलगा पॉझिटिव्ह आढळला तर त्या लगेचच त्या वर्गाला सुद्धा ताबोडतोब सुट्टी दिली पाहिजे. सर्व विद्यार्थ्यांची तपासणी केली पाहिजे. कोरोना पसरण्यापासून थांबवलं पाहिजे. आपल्या सगळ्यांना तेच करायचं आहे. कोरोनाचा संसर्ग वाढणार नाही हे महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर मुलांच्या शिक्षणाचं नुकसान होऊ नये, या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. या दोन्ही गोष्टींचा मध्यबिंदू म्हणून एक गोष्ट करण्याची आपल्याला गरजेचं आहे. मुलांचं नुकसाण होऊ नये यासाठीच आम्ही मंत्रिमंडळाने आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही रिस्क घेतली, असं राजेश टोपे यांनी सांगितलं.