Top Newsराजकारण

उद्धव ठाकरेंनी दसरा मेळाव्यातील भाषणात भाजपला लगावलेले टोले…

मुंबई : शिवसैनिकांसाठी विचाराचं सोनं लुटण्याचा दिवस म्हणजेच शिवसेनेचा परंपरागत दसरा मेळावा यंदा मुंबईतील षण्मुखानंद सभागृहामध्ये आयोजित करण्यात आला होता. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या ५३ मिनिटं ३० सेकंदाच्या भाषणात बहुतांश वेळ भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. विविध मुद्द्यांना स्पर्श करत त्यांनी भाजपावर चौफेर टीका केली.

– उद्धव ठाकरेंनी भाषणाच्या सुरुवातीलाच देवेंद्र फडणवीसांच्या विधानाचा समाचार घेतला. मी राज्याचा मुख्यमंत्री आहे असं कधीच मला वाटू नये. माझ्या जनतेलाही तसं वाटू नये. कारण त्यांना मी त्यांच्या घरातला वाटलो पाहिजे. जे मी पुन्हा येईन पुन्हा येईन बोलत होते आता ते मी गेलोच नाही असं म्हणू लागलेत. आता तुम्ही बसा तिकडेच, अशी जोरदार सुरुवात उद्धव ठाकरेंनी केली.

– स्वतःच्या अंगात हिंमत असेल तर समोरुन लढा द्या. ईडी ,सीबीआयच्या माध्यमातून आव्हान देऊ नका. आव्हान द्यायचं आणि पोलिसांच्या मागे लपायचे हे मर्दाचे लक्षण नाही.

– तुमच्या आशिर्वादाने पुढील काही महिन्यांत महाविकास आघाडी सरकार दोन वर्षे पूर्ण करेल. सरकार पाडण्याचे अनेक प्रयत्न करण्यात आले. हिंमत असेल तर पाडून दाखवा. तसं करून पडत नाही म्हणून छापा-काटा सुरु झाला. छापा टाकायचा आणि काटा काढायचा. ही थेरं जास्त काळ चालू शकणार नाहीत.

– आज काही जण केवळ माझं भाषण संपण्याची वाट पाहताहेत. भाषण कधी थांबतंय आणि कधी एकदा चिरकतोय, अशी काहींची अवस्था आहे. कारण शिवसेना आणि ठाकरे कुटुंबावर टीका करणं, चिरकणं यातूनच त्यांना रोजगार मिळतो.

– तुमच्याकडे अपवित्र नेते आले की ते पवित्र होतात. तुमच्या पक्षात आले की गंगा आणि नाही आले की गटारगंगा.

– भाजपमध्ये गेल्यावर शांत झोप लागते, असं हर्षवर्धन पाटील म्हणाले. त्यांना भाजपनं ब्रँड अ‍ॅम्बेसेडर करायला हवं. काही जाहिराती असतात ना, तशी त्यांची आजची स्थिती आहे. आधी मला झोप यायची नाही. मग कोणीतरी सांगितलं भाजपमध्ये जा. आता मी कुंभकर्णासारखा झोपतो. दरवाजे कितीही वेळा ठोकला तरी उठत नाही, अशी काहींची आजची अवस्था आहे. ही काय लायकीची माणसं घेतली आहेत भाजपनं?

– महाराष्ट्रात लोकशाहीचा खून झाला भाजपचे लोक असा गळा काढत आहेत. मग उत्तर प्रदेशात लोकशाहीचा मळा फुललाय का?

– भाजप देशातील नव्हे, तर जगातील सर्वात मोठा पक्ष असल्याचा दावा करतं. पण यांच्याकडे पोटनिवडणुकीसाठी देखील उमेदवार नाहीत. यांना इथले तिथले उपरे उमेदवार शोधावे लागतात. भाजप म्हणजे नुसती प्लॅटफॉर्मवरची गर्दी आहे

– केंद्राचे अधिकार किती, राज्याचे अधिकार किती ते एकदा समजुद्या. केंद्राएवढीच सर्व राज्यं सार्वभौम आहेत आणि राहतील, असं बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्ट केलं होतं. राज्याला केंद्राच्या बरोबरीचे हक्क दिलेले आहेत. फक्त तीन अधिकार केंद्राला जास्त दिले आहेत. तसं होत नसेल तर घटनेची दुर्घटना होईल.

– हिंदुत्वाला जेव्हा धोका होता तिथे केवळ बाळासाहेब उभे राहिले होते. धमक्या आल्या.. पण कोणात ना धमक होती.. ना हिंमत होती. मुंबई पेटली, तेव्हा शिवसेना रस्त्यावर उतरली होती. बाबरी पाडली तेव्हा हे लोक बिळात होते. तेव्हा शेपट्या घातल्या होत्या.. तेव्हा बाळासाहेब ठाकरे उभे होते.. मुंबई आम्ही वाचवली होती.

– तुमची पालखी वाहत नाही म्हणून आज शिवसैनिक भ्रष्टाचारी झाला? तुमच्या पक्षाची पालखी वाहण्यासाठी शिवसैनिकाचा जन्म झालेला नाही. काटा कसा असतो हे एकदा बोचल्यावर कळेल तुमचं नशीब समजा अजून बोचत नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button